ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : सिक्कीम येथे पर्यटनासाठी गेलेल्या ठाण्यातील पाच जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. शनिवारी रात्री हा अपघात झाला. सुरेश पुनमिया (40), तोरन पुनमिया, (37), हिरल पुनमिया (15), देवांशी पुनमिया (10), जयन परमार (14) अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.
ठाण्यातील सुमारे अठरा जणांचा समूह तीन दिवसांपूर्वी पर्यटनासाठी सिक्कीम येथे गेला होता. यात सुरेश पुनमिया (40), त्यांची पत्नी तोरन, दोघी मुली हिरल व देवांशी यांचाही समावेश होता.
शनिवारी रात्री ते गाडीने हॉटेलमध्ये परतत होते. त्याचवेळी नॉर्थ सिक्कीम येथे खेडुगजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गाडी दरीत कोसळली. या अपघातात गाडीत असणार्यांना एस. विश्वकर्मा या स्थानिक चालकासह सहा जणांचा मृत्यू झाला. या गाडीत सुरेश पुनमिया यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या व्यतिरिक्त जयन परमार या ठाण्यातील एका युवकाचा समावेश आहे. जयन हा सुरेश यांच्या मित्राचा मुलगा असून तोही त्यांच्याच गाडीतून प्रवास करत होता.
या अपघाताच्या वेळी एकूण तीन गाड्या हॉटेलमध्ये परतत होत्या. यावेळी दोन गाड्या हॉटेलवर परतल्या. मात्र सुरेश पुनमिया यांची गाडी न परतल्याने. त्यांच्या इतर सहकार्यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही. अखेर याबाबत लष्कराला माहिती देण्यात आली.
त्यानंतर लष्काराच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य सुरु केले. त्यानंतर रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. सोमवारी सकाळी विमानाने या सर्व पाच जणांचे मृतदेह मुंबईत आणण्यात येणार आहेत. तेथून ते ठाण्यात आणले जातील. सुरेश पुनमिया हे सोन्याचे व्यापारी असून ते टेंभी नाका परिसरात राहात होते. या घटनेने ठाण्यात शोककळा पसरली आहे.