सिंहायन आत्मचरित्र : सिंहावलोकन

सिंहायन आत्मचरित्र : सिंहावलोकन

दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 'सिंहायन ः एक अक्षरगाथा' या सुमारे एक हजार पानांच्या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मधून प्रसिद्ध झाली आहेत. या आत्मचरित्रात गेल्या पन्नास वर्षांतील देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना आणि घडामोडींचा चिकित्सक इतिहास शब्दबद्ध झाला आहे. जागेअभावी सर्वच प्रकरणे प्रसिद्ध करता आली नाहीत. आत्मचरित्रातील 'सिंहावलोकन' या समारोपाच्या प्रकरणातील शेवटचा भाग प्रसिद्ध करीत आहोत. लवकरच हे आत्मचरित्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतून प्रसिद्ध होत आहे. आत्मचरित्राच्या मराठी आवृत्तीस ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक व डॉ. यु. म. पठाण यांची प्रस्तावना लाभली आहे. तर हिंदी आवृत्तीस 'इंडिया टुडे'चे माजी मुख्य संपादक आलोक मेहता, इंग्रजी आवृत्तीस ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर यांची प्रस्तावना लाभली आहे. – संपादक, बहार पुरवणी

कधी कधी एखादं आव्हान इतकं चिवट निघतं, की पाहता पाहता आणि त्याच्याशी झुंज देता देता ते आपली उमेदीची वर्षे कधी गिळंकृत करून टाकतं, याचा आपल्यालाच पत्ता लागत नाही. 'निर्णयसागर'चं शिवधनुष्य खांद्यावर घेतल्यानंतर मलाही तो अनुभव आला होता.

'निर्णयसागर'मध्ये काही अंतर्गत प्रश्न निर्माण झाले होते. ते सोडवण्यासाठी, 'निर्णयसागर'ला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी, मी मुंबईला प्रयाण केलं. त्यावेळी नुकतीच मी जर्मनीहून अत्याधुनिक छपाईची मशिनरी मागवून 'पुढारी'चा कायापालट केला होता. 'पुढारी'चा विस्तार करून पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करण्याचा त्यावेळी माझा होरा होता. मी तशी पावलं टाकायला सुरुवात केली होती आणि अगदी त्याच दरम्यान माझा विवाह झाला. मुंबईत माझ्या सासरेबुवांचा 'निर्णयसागर' हा प्रेस होता. त्यामुळे तिथेच 'पुढारी'ची छपाई करून मुंबई आणि पुणे आवृत्ती सुरू करता येईल, असं मला वाटलं होतं.

त्या कालखंडात 'निर्णयसागर'चा कार्यभार पत्नीचे मामा उदयसिंह काळे पाहत होते; पण त्यांचे अचानक निधन झाल्यामुळे सासरकडच्या लोकांच्या आग्रहाखातर नाइलाज म्हणून 'निर्णयसागर'चे शिवधनुष्यही मला उचलावं लागलं. त्यामुळेच मी मुंबईत जाऊन 'निर्णयसागर'चा कारभार हाती घेतला आणि आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलं आहे, याची मला कल्पना आली. खरं तर या विषयावर या आधी मी लिहिलेलं आहेच. परंतु, 'निर्णयसागर'चे प्रश्न सोडवता सोडवता माझी ऐन तारुण्यातील सात-आठ वर्षे खर्ची पडली. आर्थिक गुंतवणुकीपेक्षा आयुष्यातील अनमोल क्षणांची गुंतवणूक मला घाट्यात घेऊन जाणार आहे, हे त्यावेळी माझ्या ध्यानीही आलं नव्हतं. आपण भिडलोच आहे, तर तो प्रश्न सोडवूनच दम खायचा हा माझा खाक्या व 'निर्णयसागर'च्या बाबतीतही माझी तीच मानसिकता होती. परंतु, तो प्रेस सुरळीत चालावा म्हणून मला 'पुढारी'तून वेळोवेळी मोठ्या रकमा घेऊन जावं लागलं. परंतु, हाती मनस्तापाशिवाय काहीही लागलं नाही.

त्यावेळी मी 'निर्णयसागर'मध्ये अडकून पडलो नसतो, 'पुढारी'चा पैसा 'निर्णयसागर'मध्ये ओतला नसता आणि त्याऐवजी कोल्हापुरातच थांबून 'पुढारी'च्या विस्ताराकडे लक्ष दिलं असतं, तर तेव्हाच मी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 'पुढारी'ला नेऊन पोहोचवलं असतं! केवळ मी 'निर्णयसागर'मध्ये अडकून पडल्यामुळेच 'पुढारी' जवळजवळ दहा-पंधरा वर्षांनी पाठीमागे गेला. त्याच्या विकासाला ब्रेक लागला. वस्तुतः महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यांत 'पुढारी'च्या आवृत्त्या सुरू करायची माझी तीव्र इच्छा होती. तसं नियोजनही मी केलं होतं. परंतु, 'निर्णयसागर'नं मला जणू मुंबईत स्थानबद्धच करून टाकलं. माझ्या हातापायात मणामणाच्या बेड्याच घातल्या. अशा परिस्थितीत मी 'पुढारी'कडे कसा काय लक्ष देणार होतो? साहजिकच 'पुढारी'चा विस्तार करण्याकडे त्यावेळी मला वेळ देता आला नाही हे सत्य आहे.

तो काळ असा होता, की त्यावेळी मुंबईत नवाकाळ सोडल्यास अन्य प्रबळ दैनिकंच नव्हती. त्यामुळे त्या ठिकाणी 'पुढारी'चं बीज रुजवण्यासाठी जमीन अत्यंत सुपीक होती. परंतु, 'निर्णयसागर'च्या जबाबदारीनं त्यात कोलदांडा घातला. दरम्यानच्या काळात मुंबई-पुण्यातून निघणारी भांडवलदारांची वृत्तपत्रे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही आपले हातपाय पसरू लागली. म्हणूनच जर मी 'निर्णयसागर'ऐवजी 'पुढारी'वर लक्ष केंद्रित केलं असतं, तर भांडवलदारांच्या वृत्तपत्रांना नक्कीच पायबंद बसला असता, हे पूर्णसत्य आहे. तरीही नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल करणार्‍याही काही गोष्टी याच काळात घडल्या, हेही तितकंच खरं.

मुळातच मला वाचनाचं प्रचंड वेड. जे जे उत्तम ते ते वाचावे, हे माझं ब्रीद. 'निर्णयसागर'साठी मुंबईत अडकून पडलेलो असताना तिथे मला ज्ञानाचं भांडारच सापडलं. एक प्रकारे लॉटरीच लागली म्हणा ना. 'निर्णयसागर' ही फार जुनी प्रकाशन संस्था. तिनं असंख्य अभिजात संस्कृत ग्रंथांची छपाई केलेली. त्या संस्कृत ग्रंथांचं वाचन करण्याची संधी मला आपसूकच चालून आली. नुसतं वाचनच नव्हे, तर त्यावर चिंतन, मननही करता आलं. 'निर्णयसागर'चं भांडार कमी पडतं म्हणून की काय, कोलंबसाला अमेरिका सापडावी, तशी मला मुंबईतील एशियाटिक लायब्ररी सापडली. भक्ताचे मन जसे मंदिराकडे वळते, तसे माझे पाय एशियाटिक लायब्ररीकडे वळू लागले. तिथले दुर्मीळ ग्रंथ चाळताना, देश-विदेशातील नवप्रकाशित पुस्तकं हाताळताना तसेच वेगवेगळी साप्ताहिकं, पाक्षिकं आणि मासिकांचं अवलोकन करताना मला दिवस अपुरा पडू लागला. जगात साहित्य एवढं प्रचंड आहे, की आपण त्यामध्ये साधी डुबकी मारायची म्हटलं, तरी उभं आयुष्य पुरणार नाही, याची मला पहिल्यांदाच जाणीव झाली.

मात्र, तेव्हा मी त्यात मनसोक्त पोहून घेतलं. त्यातून मला जगभरातील तत्कालिक प्रवाहांची आणि नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती होत गेली. देशातील विविध प्रांतांतून प्रसिद्ध होणारी आणि त्याचबरोबर विदेशातील वृत्तपत्रंही चाळायला मिळाली. त्याचा फायदा मला पुढे 'पुढारी'चा विकास करताना निश्चितच झाला. त्यामुळे 'निर्णयसागर'साठी मी व्यतीत केलेला काळही माझ्या ज्ञानात चौफेर भर घालणारा आणि मला नवीन अनुभूती देणाराच ठरला, हे मला मान्य करावंच लागेल. त्याचबरोबर 'कठीण समय येता कोण कामास येतो,' या उक्तीचीही प्रचिती मला यावेळी आली.

त्याला कारणही तसंच होतं. 'निर्णयसागर' उभा करायचा, तर त्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज होती. परंतु, प्रयत्न करूनही अगदी बँकांपासून ते सत्ताधारी ज्येष्ठ राजकारण्यांपर्यंत कुणीही मदतीचा हात पुढे केला नाही. इतकंच नव्हे, तर संकटकाळी आपले आपले म्हणणारेसुद्धा कसे दूर पळ काढतात, हेही मी याच काळात अनुभवलं. त्यावेळी मराठी माणसांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक संस्थेला शासनाने मदत केली असती, तर 'निर्णयसागर'ने जगभर संस्कृत भाषेचा विस्तार केला असता हे सूर्यप्रकाशाइतकंच सत्य आहे. यातून मी मात्र एक महत्त्वाचा धडा घेतला. आपलं जीवन जर सुसह्य करायचं असेल, तर दुसर्‍यांच्या कुबड्यांची अपेक्षा करायची नाही. तसेच स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा फक्त प्रयत्नच करायचा नाही, तर विनाविलंब तशी वाटचालही सुरू ठेवायची. हा धडा मुंग्यांपासून घेण्यासारखा आहे. मुंगी हा अत्यंत नगण्य जीव. परंतु, तिचं वारुळ उद्ध्वस्त झालं तर ती डगमगत नाही, तर ती नव्या वारुळाच्या बांधणीला जुंपून घेते. मग त्यासाठी शंभर दिवस लागो वा शंभर महिने. पण ती स्वतःचं घरटं उभारल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. खरं तर ती कधीच स्वस्थ बसत नाही, हाही तिचा गुण घेण्यासारखाच आहे.

माणसाच्या आयुष्यातही असे अनेक दुर्धर प्रसंग येत असतात. त्यातले काही काही प्रसंग तर आपल्याच चुकांमुळे ओढवलेले असतात. परंतु, कोणतीही चूक ही भविष्यासाठी मार्गदर्शकच असते. ती दीपस्तंभाचं काम करीत असते. केलेल्या चुका सुधारून आपण पुढे वाटचाल करीत राहिलो, तरच आयुष्याचा मार्ग प्रशस्त होत असतो. आपल्याला यशस्वी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपण नुसतेच मनात मांडे खात बसून राहिलो, तर आपल्या हाती दुसरं काहीच लागणार नाही. पण, जिंकण्याची उमेद बाळगली, तर यश आपलेच असते.

एखाद्या लहान बालकाचं उदाहरणच पाहा… ते चालायला शिकताना अनेकदा पडतं. पण पुन्हा उठतं. पुन्हा चालण्याचा प्रयत्न करतं. पण, ते आपला प्रयास कधीच सोडत नाही आणि मग ते केवळ चालतच नाही, तर धावूही लागतं. नाचू लागतं. उड्या मारतं. साहजिकच बाळाला जे जमतं, ते आपल्याला का जमू नये? अन् धक्के, टक्केटोणपे खाल्ल्याशिवाय यशाची नजाकत कळून येत नाही, हेही तितकंच खरं आहे.

आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा

कवी जगदीश खेबुडकर यांच्या या काव्यपंक्ती मोठ्या आशयगर्भ आहेत. हातपाय न हालवता वडिलार्जित संपत्तीवर निष्क्रिय जगण्याचा उपहास या काव्यात आहे. हा कर्तृत्वशून्य पिंजरा सोडण्याचे आवाहन त्यात आहे आणि आकाशात झेप घेऊन स्वतंत्र विश्वनिर्मितीचा मंत्रही जपलेला आहे.

अनेकदा परिस्थितीच आपल्याला आपला गुरू होऊन बरंच काही शिकवून जात असते. त्याचा अनुभव मी वृत्तपत्र व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेमधूनच घेतला. भांडवलदारांची वृत्तपत्रं जिल्ह्याजिल्ह्यांत म्हणजे ग्रामीण भागात आली म्हणून आमच्यात सुधारणा झाली, हेही मान्य करावंच लागेल. त्यांनी जर स्पर्धा निर्माण केली नसती, तर आम्ही इतके प्रगल्भ झालो असतो का; हाही प्रश्नच आहे आणि त्याचं उत्तर नाही असंच आहे. स्पर्धा जिंकायची असेल, तर आपल्याला सर्वंकष तयारी करूनच मैदानात उतरावं लागतं, याची मला जात्याच जाण होती. मुळातच मी आक्रमक होतो. यशाचा गुलकंद चाखायचा, तर कितीही कष्ट उचलण्याची माझी नेहमीच तयारी असते. शिवाय भविष्याबाबतही मी नेहमीच सतर्क राहतो. साहजिकच भांडवलदारी वृत्तपत्रांच्या आक्रमणाचा मी प्रथम अंदाज घेतला आणि त्यानुसारच पावलं उचलली. म्हणजेच मी भांडवलदारी वृत्तपत्रांच्या आक्रमणाला एक संधी समजून, त्यांना सामोरा गेलो आणि यशाचा झेंडा फडकावला. एक युग निर्माण करण्यात यशस्वी झालो. माणूस जर सतर्क असेल, तर तो आपल्या क्षेत्रात स्वतंत्र प्रभुत्व निर्माण करू शकतो, या गोष्टीवर मी ठाम आहे.

'निर्णयसागर'च्या प्रकरणावरून मी एक गोष्ट शिकलो. माणूस कुठल्याही क्षेत्रात असो, तो छोटा असो वा मोठा, त्याला आयुष्यातील संघर्ष काही चुकत नाही. माणसाच्या आयुष्याचं वरवर दिसणारं चित्र किती जरी सुंदर भासलं, तरी त्याच्या अंतरंगात सदैव एक लाव्हारस धगधगत असतो. तो कधीच कुणाला दिसत नसतो. त्याचे चटके ज्याचे त्यालाच सोसायचे असतात.

'निर्णयसागर'च्या प्रकरणात मी चांगलाच तावून, सुलाखून निघालो. वेळेच्या अपव्ययाबरोबरच वित्तहानी तर झालीच; परंतु एका प्रचंड मानसिक दडपणाखाली मी तेव्हा वावरत होतो आणि मग त्याची परिणती शारीरिक पीडा उद्भवण्यात झाली. त्याचे चटके तर मी आजपर्यंत सोसतो आहे. साहजिकच त्याचा भविष्यातील प्रकल्पांवर विपरीत परिणाम झाला. त्याचबरोबर अनेक संकटांशी मला एकट्यालाच सामना करावा लागला, तो वेगळाच. मात्र, अदम्य उमेद, प्रचंड ऊर्जा आणि सळसळता उत्साह यामुळे मी त्यातून सहीसलामत बाहेर पडलो आणि पुढील वाटचालही जोमानं पार पाडली, हे मी आज मोठ्या अभिमानानं सांगू शकतो. माणसानं पाठीमागच्या चुका लक्षात घेऊन त्यामध्ये सुधारणा केल्या, प्रयत्नात सातत्य ठेवलं, तसेच आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करून त्याला तद्नुषंगिक अभ्यासाची जोड दिली, तर असाध्य गोष्टीही साध्य होतात, हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो.

'असाध्य ते साध्य, करितां सायास।
कारण अभ्यास, तुका म्हणे॥'

तुकारामांचे हे बोल खर्‍या अर्थानं बोलके आहेत, यात शंकाच नाही.
'पुढारी' हा माझा श्वास होता आणि आजही आहे. म्हणूनच त्याच्या उत्कर्षासाठी मी माझं सारं आयुष्य झोकून दिलं. आयुष्यातील सुमारे पन्नास वर्षे अविरत झटत राहिलो. परंतु 'पुढारी'चा विकास करणे, एवढंच माझं ध्येय होतं का? तर मुळीच नाही. कारण मला केवळ बोरूबहाद्दर संपादक कधीच व्हायचं नव्हतं. तर वेळप्रसंगी मैदानात उतरून, शड्डू ठोकून सामाजिक लढाया जिंकायच्याही होत्या. खरं तर, जनसेवा माझ्या रक्तातच भिनलेली. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर मी असंख्य वेळा रस्त्यावर उतरलो. आबांपासून चालत आलेला हा वारसा मीही खंबीरपणे पुढे चालवला. मग शिंगणापूर किंवा आमशी वगैरे ठिकाणी दलितांना उदरनिर्वाहासाठी जमिनी मिळवून देणे असो वा दलितांना अंबाबाई मंदिराचा गाभारा खुला करणे असो; तसेच ऊस, दूध दरवाढीचा प्रश्न असो; मराठ्यांना ओबीसी सवलत मिळवून देण्याचा प्रश्न असो; वा खंडपीठ, टोलचा प्रश्न असो… या प्रत्येक आंदोलनात मी अग्रभागी होतो. त्याचबरोबर जोतिबा डोंगर परिसराचा विकास आणि बालविकास संकुलाच्या (रिमांड होम) विकासासारखे जीवाभावाचे प्रश्नही मी अत्यंत तळमळीनं सोडवले.

विशेष म्हणजे हे सारं करीत असताना मी कसल्याही फळाची अपेक्षा केली नाही, की स्वतःचा डांगोरा पिटला नाही. नाहीतर आज आपण पाहतो, महापालिकेच्या खर्चानं फूटपाथवर साध्या फरशा जरी बसवल्या, तरी चौकाचौकात डिजिटल फलक लावून आपल्या कामाचा डिंडिम वाजवला जातो. त्यातूनच नगरसेवक, पंचायत वा झेडपी सदस्य किंबहुना आमदार, खासदार पदांच्या अपेक्षा बाळगल्या जातात. परंतु, माझं सामाजिक कार्य हे असं स्वार्थापोटी जन्माला आलेलं नव्हतं, तर तो मी ओढलेला जगन्नाथाचा रथच होता.

'आरोग्यम धनसंपदा' अशी उक्ती आहे. ती काही खोटी नाही. मीसुद्धा बालपणापासूनच सुद़ृढ होतो. आजोबांच्या प्रोत्साहनानं गंगावेस तालमीसारख्या आखाड्यात शड्डूही ठोकलेले. त्यामुळेच मुसमुसत्या तारुण्यातही ही तांबड्या मातीतील मस्ती माझ्या धमन्यांमधून सळसळत होती आणि त्याच मस्तीत मी बेळगावपर्यंत धडक मारून कन्नडिगांची तोंडं बंद केली होती.

'Take time to deliberate, but when the time for action comes, stop thinking and go in.' नेपोलियन बोनापार्टच्या या उक्तीप्रमाणेच मी त्यावेळी अ‍ॅक्शनमोडवर आलो होतो आणि बेळगावमध्ये घुसलो होतो. मैदानही मारलं होतं. माझ्या सामाजिक कार्याची चढती कमान अशीच वरवर गेली असती; पण चालत्या गाडीला घुणा लागावा, तसं 'निर्णयसागर'चं घोंगडं माझ्या गळ्यात येऊन पडलं आणि त्यानं माझ्या सामाजिक कार्याला खीळ बसलीच, तसाच 'पुढारी'च्या विकासालाही खोडा बसला. परंतु, त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे माझ्या तब्येतीलाही ग्रहण लागलं. त्या काळात झालेल्या तब्येतीच्या हेळसांडीमुळे पुढे मला पित्ताचा त्रास सुरू झाला. हा पोटाचा विकार माझ्या जीवनाला लागलेली जणू साडेसातीच ठरली. माझ्या खाण्यापिण्यावर बंधनं आली. आजही मी नेहमीचा आहार घेऊ शकत नाही. तिखट, खारट, आंबट आणि मसालेदार पदार्थ मला वर्ज्य आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यासाठी वेगळा पथ्यकर आहार बनवावा लागतो.

असं असूनही मी कार्यालयात दररोज सुमारे 16 ते 17 तास काम करीत असतो. दररोज रात्री एक वाजता सार्‍या कामकाजाचा आढावा घेऊन कार्यालयातील पदाधिकार्‍यांशी चर्चा करून बातम्यांचे अपडेटस् घेऊनच माझं त्या-त्या दिवसाचं चलनवलन थांबतं. अर्थातच कार्यरत राहणे, हे यशस्वी जीवनाचं गमक आहे आणि म्हणूनच ती सवय मी स्वतःला लावून घेतलेली आहे. हातात काम नसेल, तर मात्र मी प्रचंड अस्वस्थ होतो. अर्थात, तशी वेळ दुर्मीळच. तुम्हाला जर स्वतःला अपडेट ठेवायचं असेल, तर अंगावर घेतलेली जबाबदारी वेळच्या वेळी पार पाडावीच लागेल.

'थांबला तो संपला,' अशा अर्थाची एक म्हण आहे, ती उगाच नव्हे. माणूस थांबतो म्हणजे काय होतं? तर तो त्याच्या कार्यप्रवणतेपासून दूर फेकला जातो. असं जीवन म्हणजे तंदुरुस्त असूनही लोध भरल्यासारखंच. असलं जिणं स्वीकारून आपण जिवंतपणी मरण का पुढ्यात वाढून घ्यायचं? आपल्याला एवढं सुंदर जीवन मिळालेलं आहे. ते खचितच असं वाया घालवण्यासाठी नाही, ही गोष्ट एकदा मनानं घेतली, की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होतात. आरोग्याच्या तक्रारी असूनही मी घरी न थांबता आजही माझ्या कामाला प्राधान्य देतो. कारण एकदा कामाला जुंपून घेतलं, की आपोआपच शरीराच्या कुरबुरींचा विसर पडतो. मी कामात इतका बुडून जातो, की आपल्याला एक देह आहे आणि त्याला काही व्याधी आहेत, हेच माझ्या ध्यानी राहत नाही. खरं तर कामाच्या धबडग्यात मला माझ्या प्रकृतीचा विचार करायला वेळच मिळत नाही. तसे मनाचे खेळ तरी कधी कुणाला उमगले आहेत! कदाचित मला माझ्या आजारपणाचा विसर पडावा म्हणूनच माझं सुप्त मन मला सदैव कामात गुंतवून ठेवत असेल. याचा अर्थ आजारपण हे एका द़ृष्टीने माझ्यासाठी आव्हान ठरलेलं आहे, असंच म्हटलं तरी चालेल.

वस्तुतः पर्यटन हा माझा आवडता छंद आहे. देश-परदेशातील पर्यटनस्थळं, वा काही कारणांनी प्रकाशझोतात आलेली ऐतिहासिक स्थळं, अशा ठिकाणी भेट देण्याची मला अनिवार इच्छा असते. परंतु, आरोग्याच्या तक्रारीमुळे त्याला आता मर्यादा पडलेल्या आहेत. तसेच माझ्या वृत्तपत्रीय पेशाला अनुसरून मला परदेशातील अनेक महत्त्वाच्या स्थळांना भेटी देणं अनिवार्य असतं. परंतु, तब्येतीमुळे माझ्यावर बरीच बंधने आली आहेत. पोटाच्या विकारामुळे मला कुठेही फिरायला जाणं अशक्य होऊन बसलंय. कारण बाहेरचं खाल्लं की पोट बिघडतं. त्यामुळे मला पाहुण्यांकडेही जाता येत नाही. कुठे जायचंच झालं, तर माझ्यासोबत मला माझा आचारी आणि स्टाफ ठेवावा लागतो. माझ्यासाठी वेगळं जेवण शिजवावं लागतं. एक प्रकारे मी ब्लॅण्ड डायटच करतो, म्हणा ना!

माझा आजवरचा जीवनप्रवास हा विविध पातळ्यांवर झाला. तो करीत असताना मी मानवी मनाचे अनेकविध कंगोरे अनुभवले. त्यातून मी या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलो, की माणसाजवळ जर ध्येय आणि धैर्य ही दोन अस्त्रं असतील, तर यश त्याच्यापासून फार काळ लांब राहू शकत नाही. आपल्याला नक्की काय करायचंय, हे जर निश्चित केलं आणि त्याप्रमाणे वाटचाल सुरू केली, तर आयुष्याचा प्रवास नक्कीच सुखाचा होतो. मात्र, त्याला स्वतंत्र बाण्याची जोडही हवी. कारण तुम्ही जर दुसर्‍याच्या ओंजळीनं पाणी पिऊ लागलात, तर तुमच्या पायात गुलामीच्या बेड्या पडल्याच म्हणून समजा!

ऐन तारुण्यात मी आव्हानं स्वीकारली. त्यांच्यावर मांड ठोकून स्वार झालो आणि यशस्वीही झालो.
त्यावेळी माझी धडाडी ही तारुण्याला साजेशीच होती. मी वेळोवेळी आव्हानांना सामोरं जाऊन त्यांचा सामना केला नसता, तर मला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा किंवा राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वारसा सांगण्याचा हक्कच उरला नसता. केवळ हातात तलवार घेऊन गल्लीत उतरलं म्हणजे कुणी शूरवीर होत नसतो. आपल्या कर्तृत्वातून आणि पराक्रमातून शौर्य दिसलं पाहिजे. त्या शौर्यानं इतिहास घडवला पाहिजे. त्याचे पोवाडे तयार झाले पाहिजेत. 'If you want a thing done well, do it yourself.' असं नेपोलियन बोनापार्ट उगाच म्हणाला नव्हता.

'पुढारी'ला मोठं करण्याची माझी महत्त्वाकांक्षा ही केवळ माझ्या कुटुंबाच्या उद्धारासाठीच होती का? तर तसं मुळीच नव्हतं. 'पुढारी'चं आधुनिकीकरण किंवा 'पुढारी'चा विकास हे एक सार्वजनिक आणि सामाजिक कार्य होतं, असं मी मानतो. 'पुढारी' मोठा व्हायला हवा होता. तो सर्वसामान्य वाचकांसाठी, हीच माझी धारणा होती आणि 'पुढारी'च्या विकासामागे माझ्या मनात तोच कार्यकारणभाव होता, हे मला इथे मुद्दाम नमूद करावंसं वाटतं. कारण सकाळी हातात पेपर आला, की वाचकांच्या मनात पहिला विचार येतो, 'पुढारी काय म्हणतोय!'

हे उगाच घडत नसतं. 'पुढारी'नं जनसामान्यांचा आरसा बनून त्यांच्या मनात घर केल्याचंच हे द्योतक नाही का? आणि हे असं आरसा बनणे किंवा वाचकांच्या मनात घर करून राहणे तितकं सोपं नसतं. अथक परिश्रम, प्रचंड ऊर्जा, आभाळाएवढा उत्साह आणि टोकाचा संघर्ष यांच्या व्यामिश्र परिमाणातून आणि परिणामातून व वाचकांच्या, विक्रेत्यांच्या आधारामुळेच 'पुढारी' उभा राहिला. मोठा झाला. वाढला आणि त्यानं आकाशाला गवसणी घातली! आबांचा 'पुढारी' जसा आहे तसा स्वीकारून मी आरामात संपादकाच्या खुर्चीत बसलो असतो, तर हे 'सिंहायन' आपल्या हाती देण्याच्या पात्रतेचा तरी मी राहिलो असतो का? हस्तिदंती मनोर्‍यात बसून केवळ पूर्वजांचे गोडवे गात ऐशोआरामात राहायचं, की उन्नतीसाठी योद्धा होऊन रणांगणात उतरून पराक्रम गाजवायचा, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. बापजाद्यांचे केवळ गोडवे गात पराच्या गादीवर लोळत पडणार्‍यांना काळ कधीच माफ करीत नाही. पुढील पिढ्या अकार्यक्षम निघाल्यामुळे वर्तमानपत्रांपासून विविध क्षेत्रांतील असंख्य उद्योग कसे लयाला गेले, याची असंख्य उदाहरणं आपल्या आजूबाजूलाच पाहायला मिळतील. त्याकडे मी कधीच दुर्लक्ष केलं नव्हतं. मिळालेल्या संधीचं सोनं करणं, हे माझं कर्तव्यच होतं आणि ते पार पाडण्यात मी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. त्याबद्दल मी स्वतःच समाधानी आहे.

एक पत्रकार, एक संपादक म्हणून काम करीत असताना, मी मानवता आणि मानवी मूल्ये कधीच नजरेआड होऊ दिली नाहीत. त्यामुळेच तर 'पुढारी' जनसामान्यांच्या मनात आपलं धु्रवासारखं अढळ स्थान निर्माण करू शकला. ऊस, दूध दरवाढ आंदोलनाच्या यशस्वी सांगतेनंतर असंख्य शेतकर्‍यांनी माझे फोटो आपल्या घरात लावले. हे कशाचं द्योतक होतं?

सामाजिक कार्य करताना माझं क्षेत्र मी केवळ कोल्हापूर किंवा दक्षिण महाराष्ट्रच निवडला असं नव्हे, तर माझ्या कार्याच्या कक्षा गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नव्हे, तर त्याच्या पलीकडे जाऊन सियाचीनपर्यंत पसरलेल्या आहेत. राष्ट्रप्रेमाच्या आणि मानवतेच्या भावनेतून मी पुढाकार घेऊन सियाचीन येथे फौजी जवानांसाठी अद्ययावत हॉस्पिटल उभारले. तसेच गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला, तेव्हाही अधोई-राजर्षी शाहूनगर येथे माझ्याच पुढाकारानं रुग्णालय उभे केलं. 'सियाचीन अस्पताल भारतीय सेना के लिए संजीवनी है,' हे उद्गार या हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी काढले होते. ते स्वयंस्पष्ट आणि सार्थ आहेत.

सियाचीनचं हॉस्पिटल हे आज सार्‍या जगभरात कौतुकाचा विषय होऊन राहिले आहे. त्या हॉस्पिटलकडे पाहून, प्रत्येक भारतीयाची मान अभिमानानं उंचावल्याशिवाय राहत नाही. या माध्यमातून 'पुढारी' आणि 'कोल्हापूर' ही दोन नावं भारतीयांच्या हृदयसिंहासनावर कायमची कोरली गेली आहेत. सांगण्याचं तात्पर्य इतकंच, की आपलं ध्येय एकदा निश्चित झालं, तर आपल्या हातून असं एखादं ऐतिहासिक कार्य व्हायलाही वेळ लागत नाही.

वाचक व विक्रेते यांच्या सहकार्यामुळेच मी आयुष्यभर महापूर, दुष्काळ, भूकंप आणि महामारीसारख्या अनेक संकटांना सामोरा गेलो. प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये मानवतावादी द़ृष्टिकोनातून मी धावून गेलो. जनतेला मदतीचा हात दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील आमशी गावात दोन जमातींमध्ये रक्तपात घडून मुडदे पडले. जाळपोळ होऊन संसार उद्ध्वस्त झाले. मी हिरिरीनं पुढे झालो. दोन्ही समाजात एकोपा घडवण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. अर्थात, हे एक छोटंसं उदाहरण. प्रत्यक्षात अशा असंख्य घटनांचा मी केवळ साक्षीदारच नाही, तर त्यातून मार्ग काढणारा भागीदारही आहे.

अगदी घरगुती वादांपासून समाजा-समाजात रुंदावलेल्या दरीपर्यंत आणि रस्त्यावरच्या आंदोलनापासून थेट सत्तासंघर्षापर्यंत, प्रत्येक प्रश्नात मी स्वतःला झोकून दिलं. अर्थात, हे सर्व करताना मी माणसातलं माणूसपण कटाक्षानं जपलं. मानवतेवर कधीही अन्याय होऊ दिला नाही, याचं मला अतीव समाधान वाटतं. माझी देवावर श्रद्धा आहे व देवानेच माझ्या हातून सर्व सामाजिक कामे करवून घेतली, ही माझी भावना आहे. कर्ता- करविता परमेश्वर असतो, आपण एक निमित्त असतो, अशी माझी धारणा आहे.

अखेर सुख हे माणसाच्या मानण्यावर असतं. प्रत्येक माणसागणिक सुखाची परिभाषा बदलत असते. नवनवीन आव्हानं स्वीकारणं आणि ती तडीस नेणं, यामध्ये माझं सुख दडलेलं आहे. त्याद़ृष्टीनं मी माझ्या आजवरच्या वाटचालीवर समाधानी आहे. अखेर कर्तृत्वाचा कितीही हव्यास बाळगला, तरी शेवटी प्रत्येक माणसाला नैसर्गिक मर्यादा असतातच. त्या मर्यादेपलीकडे कुणालाच जाता येत नसतं. या गोष्टीचं भान ठेवूनच मी आयुष्यभर कार्यरत राहिलो आणि यशही मिळवलं. जोपर्यंत माणूस जिवंत आहे, तोपर्यंत समस्या त्याची पाठ सोडत नसतात. फक्त कालानुरूप त्याचं स्वरूप बदलत असतं, इतकंच!

आज मागे वळून पाहताना माझं मलाच थक्क व्हायला होतं. आपण वयाची 75 वर्षे ओलांडून आता 80 कडे चाललो आहोत. केवढा मोठा हा आयुष्याचा प्रवास! कुठून सुरू झाला? कुठे येऊन थांबलो! पण थांबलो तरी कसं म्हणायचं? मी थांबलोयच कुठे? माझी वाटचाल तर अविरत चालूच आहे. हा कदाचित माझ्या आत्मचरित्राचा उपसंहार असेल; पण माझ्या जीवनप्रवासाचा मुळीच नाही. मला अजून खूप खूप चालायचं आहे. सांजसावल्या लांबल्या, तरी सूर्यास्तापूर्वी माझ्या ध्येयाप्रती पोहोचायचं आहे.

जीवन हे जगण्यासाठी असतं आणि जगण्यासाठी सततची कार्यतत्परता हवीच असते, हे बाळकडू माझ्या अंगी बालपणापासूनच भिनलेलं आहे. या गोष्टीची जाण आणि भान मनात बाळगूनच मी सिंहाच्या चालीनं आयुष्यभर चालत राहिलो आणि यशस्वीही झालो. पुढेही वाटचाल त्याच तोर्‍यात सुरू राहील. 'सिंहायन'च्या निमित्तानं मी इतकंच म्हणेन, की जे काल झालं, आज सुरू आहे, तसेच उद्याही सुरू राहील. त्याला विराम नाही. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची एक कविता मला माझ्या वाटचालीत नेहमीच प्रेरणा देत आलेली आहे. माझ्या या आत्मवृत्ताचा उपसंहार करताना ती येथे उद्धृत करण्याचा मोह मला टाळता येत नाही.

Woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep
And miles to go before I sleep.

॥ शुभास्ते पंथानः संतु॥

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news