सिंहायन आत्मचरित्र : वक्तृत्वसाधना

दसरा चौकातील ऐतिहासिक मराठा आरक्षण मेळाव्यात भाषण करताना मी. समोर उपस्थित मराठा बांधव.
दसरा चौकातील ऐतिहासिक मराठा आरक्षण मेळाव्यात भाषण करताना मी. समोर उपस्थित मराठा बांधव.
Published on
Updated on

पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी 'पुढारी'ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

'Instructions for making a speech : be sincere, be brief, be seated.'

अमेरिकेचे सलग चार वेळा राष्ट्राध्यक्ष झालेले फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी उत्कृष्ट वक्ता होण्याचा सांगितलेला हा मूलमंत्र. अमेरिकेचा अध्यक्षच असं सांगतो म्हटल्यावर, आदर्श आणि उत्कृष्ट वक्ता होणं किती कष्टाचं काम आहे, हे कळून आल्याशिवाय राहात नाही. खरं तर आयुष्यात सगळ्यात अवघड गोष्ट जर कुठली असेल, तर ती म्हणजे भाषण करणं! श्रोत्यांसमोर भल्याभल्यांची भंबेरी उडालेली आपण कित्येकदा पाहत असतो. एरवी कुठल्याही विषयावर वारेमाप बडबड करणार्‍यांची माईकसमोर गेलं की बोलती बंद होत असते, असे अनुभव आपण अनेकदा घेतो. माझं आयुष्यच वृत्तपत्र व्यवसायात व्यतीत झाल्यामुळे असे खुमासदार किस्से माझ्याकडे भरपूर आहेत. अशा प्रसंगांचा साक्षीदार होण्याचा मला अनेकदा योगही आला.

मी अनेक विषयांवर असंख्य भाषणं दिली, मार्गदर्शन केलं; पण सुरुवातीपासूनच मी भाषणाच्या बाबतीत सावध राहिलो. त्यामुळेच ही कला माझ्या अंगात हा हा म्हणता भिनली. एकतर भाषणाच्या प्रांतात मी अल्प तयारीने कधी उतरलो नाही. त्याचा फायदा असा झाला, की पहिल्या भाषणापासूनच माझी माझ्या भाषणावर कमांड राहिली. त्याला मुद्देसूदपणाची जोड मिळाल्याने माझी सर्वच भाषणे ही प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरली. एक उत्कृष्ट वक्ता म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं; पण हा मानसन्मान मला सहजासहजी मिळालेला नाही. त्यासाठीही मला साधना करावी लागली. कष्ट उपसावे लागले व मी कष्टालाही घाबरलो नाही.

मी वक्ता कसा झालो; याचाही किस्सा खुमासदार आहे. शालेय जीवनात प्रबोधनकार ठाकरे यांचं 'वक्तृत्वाची कला आणि साधना' हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, 'भाषणाचा सराव करण्यासाठी शेतावर जायचं आणि बांधावर उभा राहून समोरच्या पिकाकडे पाहत, त्या पिकालाच श्रोता समजून भाषण ठोकायचं.' मला ती कल्पना आवडली आणि तो कित्ता मी गिरवला. मी रंकाळा तलावाजवळील मीरा बाग येथे असलेल्या आमच्या शेतात जायचो. त्यात उसाचं पीक होतं. मी त्या उसाच्या फडालाच श्रोते समजायचो आणि त्याच्यापुढे भाषण करायचो. तो फडही श्रोत्यांनी माना हलवाव्या तसा वार्‍यावर छान डोलायचा. माझ्या भाषणाचा मळा उसाच्या शेतात फुलला. तो गोडवा आजही माझ्यासोबत आहे. चिक्क्या गुळासारखाच तो मला चिकटलेला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

'If your actions inspire others to dream more, learn more, do more and become more, you are a leader.'
हे जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स यांचं भाष्य. ते मलाही तंतोतंत लागू पडतं. कुठल्याही कार्यक्रमाला जायचं झालं की, त्या ठिकाणी करावयाच्या भाषणाची तयारी मी आधीपासूनच केलेली असते. त्यासाठी मी बरेच वाचन करतो. आपलं भाषण मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण व्हावं, यावर माझा नेहमीच कटाक्ष असतो. भाषणाची कसून तयारी केलेली असेल, तर श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो, हा माझा अनुभव आहे.

उत्तम भाषणानं आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप श्रोत्यांवर पडत असते. वक्तृत्व कला ही अशी एक अप्राप्य कला आहे, की ती भल्याभल्या बुद्धिमंतांनाही जमत नाही. अनेक चांगले विचारवंत चांगलं भाषण करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या भावना शब्दांतून श्रोत्यांपुढे व्यक्त करता न येणं, यासारखी दुसरी शोकांतिका नाही.

सुदैवानं वक्तृत्व कलेचं ज्ञान उपजतच माझ्याकडे होतं. त्यात मी अभ्यासानं भर घालत गेलो. मी स्वतःला डेव्हलप करीत गेलो. तो व्यक्तिमत्त्व विकासाचाच एक भाग होता. माझ्यात मुळातच सभाधीटपणा होता. त्यामुळे अनेक सभांचे फड मी गाजवले. इतके की, कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकातही मी कित्येकवेळा भाषणानं फड गाजवला आहे. राजाराम कॉलेजमध्ये असतानाच मला वक्तृत्वाची अधिक गोडी लागली आणि पुढील आयुष्यात मी त्याची जोपासना केली.

महाविद्यालयीन निवडणुकांच्या निमित्तानं वर्गावर्गात जाऊन मी भाषणं ठोकत असे. पुढे मी 'पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी संघटने'ची स्थापना केली. त्यामुळे माझ्या वक्तृत्व कलेला बहरच आला. खरे तर, माझ्यामध्ये सभाधीटपणा यायचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे माझे आबा. लहानपणापासून त्यांच्याबरोबर मी सभा-संमेलनात वावरलो होतो. अनेक वक्ते वेगवेगळ्या पद्धतीनं कसे बोलतात, त्याचा मी बारकाईनं अभ्यास केला होता. त्याचा मला पुढे स्वतः भाषण करताना फायदा झाला.

महाराष्ट्रातील बहुतेक प्रमुख शहरांत माझी भाषणं झालेली आहेत. पुरस्कारांनिमित्त दिल्लीसह देशातील अनेक शहरांतही माझी भाषणं झाली. सियाचीनसारख्या उत्तुंग रणभूमीवर हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्तानं मला भाषण करण्याचा योग आला. तेही हिंदीमधून! उपस्थित जवान आणि लष्करी अधिकार्‍यांना माझं भाषण भावलं होतं. राजकीय, सामाजिक अशा विविध व्यासपीठांवरून.इतकेच नव्हे, तर वैद्यकीय व्यासपीठावरूनही मला भाषण करण्याचा योग आला आणि माझ्या असं लक्षात आलं की, प्रत्येकवेळी माझं भाषण अधिकच समृद्ध होत जातं आहे.

आता भाषण हा माझ्या आवडीचा विषय झाला आहे. भाषणातून व्यक्त होण्यानं आपण लोकांना कळतो आणि श्रोतेही आपल्याला कळत असतात. एक प्रकारची ही वैचारिक देवाणघेवाणच असते, अशी माझी धारणा आहे.

उत्तम वक्तृत्व एक दिवस तुम्हाला नेतृत्वाकडे घेऊन जातच असतं. वक्ता आणि नेता यांचा अनन्यसाधारण संबंध असतो. मग त्याला मी तरी कसा अपवाद ठरणार होतो? जगात अनेकांना नेता बनण्याचा शौक असतो, तर काही जणांकडे नेतृत्व आपल्या पायानं चालत येतं. माझ्याबाबतीतही तसंच झालं. महाविद्यालयीन जीवनात कोणत्याही समाजहितकारक बाबतीत आणि संघटनात्मक विषयात मी नेहमीच आघाडीवर असे. राजाराम कॉलेजमधील निवडणुकांच्यावेळी तर मला फार मागणी असायची. अण्णासाहेब आगलावे हे आमचे मित्र. ते एकदा राजाराम कॉलेजमध्ये निवडणुकीला उभा राहिले. त्यांनी मला त्यांच्या प्रचारासाठी भाषणे करण्याची विनंती केली. तेव्हा मी प्रचाराच्या भाषणाला वरच्या वर्गापासून सुरुवात केली.

एका वरच्या वर्गात मी आगलावे यांना घेऊन गेलो. त्यावेळी मी खिशातून काड्याची पेटी काढली व भाषणाच्या सुरुवातीलाच ती काडी पेटवली. काडी पेटवताना मी सर्वांना सांगितले, की 'हे आगलावे.' माझी ही कल्पना विद्यार्थ्यांना प्रचंड आवडली. त्यांनी बाके वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. आणि माझ्या त्या भन्नाट कल्पनाशक्ती आणि वक्तृत्वाच्या जोरावर आगलावे निवडून आले. तेव्हा आगलावेंनी माझे आभार मानले. माझ्या व्याख्यानाच्या, भाषणाच्या बाबतीत असे कितीतरी प्रसंग घडले आहेत.

मी माझ्या आजवरच्या आयुष्यात हजारो भाषणं दिली. परंतु, केवळ द्यायची म्हणून भाषणं दिली नाहीत, तर प्रत्येकवेळी सभागृह ताब्यात घेतलं. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'हास्ययोग संमेलना'मधलं माझं गाजलेलं भाषण हेही त्यापैकीच एक. यापूर्वी मी केलेल्या सामाजिक, धार्मिक किंवा क्रीडा यासारख्या निरनिराळ्या भाषणांशी श्रोते चांगलेच परिचित होते. विषयानुरूप माझ्या भाषणात गांभीर्य, सखोलपणा आणि आवश्यक तिथं विनोदाचाही शिडकावा असतोच. मात्र, हास्ययोग संमेलनातलं माझं विनोदाचं अंग खर्‍या अर्थानं पुढं आलं आणि श्रोत्यांची हसून हसून पुरेवाट झाली.

संगीताच्या मैफलीत बाजी मारून जाणारा गायक आणि सभागृहात आपल्या वक्तृत्वानं श्रोत्यांवर मोहिनी घालणारा वक्ता यांच्यामध्ये फारसा फरक नसतो. सभागृहातील वातावरण आणि श्रोत्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन दोघेही आपल्या सादरीकरणामध्ये बदल करत असतात. थोडक्यात म्हणजे गाणं काय नि भाषण काय, श्रोत्यांचं मानसशास्त्र लक्षात घेऊनच सादर करावं लागतं. कानसेनांच्या कानांवरून जाणारं गाणं आणि श्रोत्यांच्या डोक्यावरून जाणारं भाषण, दोन्हीही कुचकामीच असतात. आपलं गाणं किंवा आपलं भाषण फसलं तर गायव व वक्ता दोघानांही चुकल्यासारखं वाटतं.

मी आजवर हजारो व्याख्यानं दिली. वैद्यकीय विषयावरसुद्धा जसा मी अभ्यासूपणे बोललो आहे, तसेच दूध आणि उसाच्या आंदोलनात किंवा सीमाप्रश्नावरच्या चळवळीत तसेच हुंडाबळीसारख्या सामाजिक प्रश्नावर बोलताना आवेशपूर्ण भाषणंही ठोकलेली आहेत. आजपर्यंत अनेक समारंभांना मी प्रमुख पाहुणा म्हणूनही गेलो आहे. अध्यक्षस्थानही भूषवलं आहे.

मी फक्त मराठी भाषेतच व्याख्याने-भाषणे दिली नाहीत, तर हिंदी व इंग्रजीमध्ये प्रसंगपरत्वे केलेली माझी भाषणे चांगलीच गाजली. मग ते कारगिल येथे बांधलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असेल वा अहिंसा प्रसारक ट्रस्टने मला सन्मानित केले, तो 15 एप्रिल 2003 चा नवी दिल्ली येथील कार्यक्रम असेल… त्या त्या वेळी दिलेली हिंदी भाषणे श्रोत्यांच्या मनावर चांगलीच ठसा उमटवून गेली. इंग्रजी भाषेतील माझी अनेक भाषणे गाजली. त्या कार्यक्रमांना उपस्थित असलेल्या श्रोतृवृंदांपैकी कोणी भेटलं, तर आजही तितक्याच तन्मयतेनं त्याची आठवण करून देतात. त्या भाषणातील कोटेशन, मांडणी वगैरे बाबी सांगून कौतुक करतात.

1 डिसेंबर 2007 रोजी सेंट झेव्हियर्स हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मी केलेलं 'Courage, Conviction and Confidence' किंवा जायंट आंतरराष्ट्रीय परिषदेतील 22 डिसेंबर 2017 चं 'Vision Statement and firm Commitment' हे भाषण, तसेच 'Future of a Nation' हे 29 मार्च 2018 रोजी मला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने डी. लिट. देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी केलेले भाषण असेल… त्यामध्ये असलेला कंटेन्ट, मुद्देसूद मांडणी, मांडणीतला आक्रमकपणा, आदी बाबी श्रोत्यांना चांगल्याच भावलेल्या.

आजही त्याचा आवर्जून उल्लेख होतो. इंग्रजी, हिंदी भाषेतही मी अशी असंख्य भाषणं केली. ती समयोचित व मजकुरांनी परिपूर्ण होती. त्यामुळेच श्रोत्यांना ती भावली. सेंट झेव्हियर्समध्ये केलेल्या भाषणात मी देशातील सद्य:स्थितीतील शिक्षणाच्या विदारक प्रश्नावर आकडेवारीसह प्रकाश टाकला होता. शिवाय माझ्या तोंडी असलेली भाषा ही प्रकांड पंडिताची नव्हती, तर ती समोर बसलेल्या विद्यार्थी वर्गाची होती. त्यामुळेच त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला व वास्तव श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात मी यशस्वी ठरलो. मराठी भाषेत एक म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे.

तद्वतच मी पहिल्यांदा आपला श्रोता वर्ग कोण आहे, त्याला काय अपेक्षित आहे, आदी बाबींचा अगोदर अभ्यास करतो. त्यांच्या समस्या असतील, मते असतील… ती जाणून घेतो. त्यानुसार भाषणाची मांडणी करतो व तळमळीने ती मांडतोही. कसलेल्या वक्त्याला अशा बाबींचे व्यवधान हे सांभाळावेच लागते. मग, तुमचे भाषण का प्रभावी होणार नाही? त्याचा अनुभव मी नेहमीच घेत आलो.

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते मला नचिकेता पांचजन्य हा महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यावेळी भाषणात मी मांडलेल्या विचारांची खुद्द अटलजींनी दखल घेत माझ्याशी चर्चा केली होती. तसेच या भाषणाची पुढे अनेक दिवस चर्चा सुरू होती. त्यावेळी मी म्हणालो होतो, "प्रसारमाध्यम, साहित्य और कला मात्र आविष्कार नही होते। वे होते हैं राष्ट्रीयता के उद्गार और हुंकार भी। उनमें हम समाजमन की प्रतिछबि भी देख सकते हैं। समाजजीवन की तमाम त्रुटीयों पर बरस पडने का दायित्व समाचार पत्रोंका होता है। हमें यह देखना होगा की अपनी आलोचना का लक्ष्य रचनात्मक जरूर हो, हमारी समीक्षा ठेस पहुँचानेवाली, दिल कचोटनेवाली कतई नही होनी चाहिए।"

तर दुसरीकडे सीमा भागातील मराठी बांधवांवर होणार्‍या अत्याचाराबाबत 24 फेब्रुवारी 2009 रोजी झालेल्या सीमा परिषदेमध्ये मी केलेल्या भाषणात मराठी मुलखातील राजकीय नेत्यांची चांगलीच हजेरी घेतली होती. हे भाषणही चांगलेच तिखट, झोंबणारे झाले होते. मी म्हणालो होतो, "कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांनी हा लढा गेली 52 वर्षे जिवंत ठेवलेला आहे. पण, राज्यकर्त्या मराठी मंत्र्यांचा, लोकप्रतिनिधींच्या स्वार्थ सत्तालोलूप वृत्तीमुळे या प्रश्नाचा तिढा सुटलेला नाही.

सीमाप्रश्नी कर्नाटकातील नेते एकजुटीने कृती करतात आणि याउलट महाराष्ट्रातील मराठी लोकप्रतिनिधी सीमाप्रश्न फक्त तोंडी लावण्यापुरता वापरतात. या प्रश्नाची खरी आच त्यांना नाही. सीमा लढा जिवंत ठेवायचा असेल आणि हा तिढा खरोखरच सोडवायचा असेल, तर सार्‍या मराठी मंत्र्यांनी, आमदार-खासदारांनी तत्काळ राजीनामे द्यावेत आणि केंद्राचे नाक दाबावे," असे आवाहनही मी केले होते. पण मी दिलेले आव्हान सत्तेच्या कनवटीला बसलेले मराठी नेतृत्व पेलू शकलं नाही, हे दाहक वास्तव आहे. क्रांतीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शिक्षण प्रणालीबाबतही मी सडेतोड मते मांडली होती. 'गुरुकुल'च्या पहिल्या स्नेहसंमेलनात मी म्हणालो होतो, "गट परीक्षा ही आधुनिक पद्धत परदेशात राबवली जाते.

या पद्धतीनुसार घोळका करून परीक्षेला बसलेले विद्यार्थी चर्चा करून प्रश्न सोडवतात. अशा प्रकारची पद्धत राबवल्यास उत्तम गुणवत्ता निश्चितच प्रकाशात येऊ शकते. मात्र, आपल्याकडील शिक्षणात पुस्तकी ज्ञानावरच भर दिला जात आहे. वास्तविक, या ज्ञानाव्यतिरिक्त व्यक्तिमत्त्व विकास, समाजसेवा, देशभक्ती या विषयांनाही स्थान मिळायला हवे. या विषयांतून मिळणारे ज्ञान पुस्तकी नसते, तर ते स्वतःच्या अस्तित्वातून समोर येत असते. आयुष्यभर उपयोगी पडणार्‍या या ज्ञानाचा आणि शिक्षणपद्धतीचा अवलंब केल्यास निश्चितच शिक्षण क्षेत्राची विसंगती दूर होऊन क्रांती होईल."

माझं जायंट आंतरराष्ट्रीय परिषदेतील भाषणही असंच टाळ्यांच्या गजरात झालेलं व प्रेक्षकांनी उचलून धरलेलं. सामाजिक परिवर्तन व आव्हानांबाबत मी म्हणालो होतो, "We are all aware of the fact that development brings social changes and new social challenges. It is important that through self help groups we help those affected, to deal with and adjust change. It is need of the hour that Voluntary Organisations have to be socially conscious and social responsible as they have the ability to bring about social change and can help a society adjust to social change." एप्रिल 2014 मध्ये सर्जिकल ऑन्कॉलॉजी या विषयावर राष्ट्रीय परिषद झाली होती. तिचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले होते. त्यावेळी देशात दिवसेंदिवस वाढत असलेले कर्करोग रुग्णांचे प्रमाण, तसेच त्यानं लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत घातलेला विळखा याबाबत सविस्तर माहिती देऊन मी म्हणालो होतो, "These facts can make anyone restless. I sometimes wonder whether we are losing war on cancer. I know there is no easy answer for this. Therefore it is not surprising that it remains one of the most feared diseases, perhaps largely because of ignorance and misconceptions. Mere mention of the word to many reads like death warrant. That is why it is Herculean task to remove the misconceptions about this menace."

4 जुलै 2015 रोजी अबस्टेट्रिक आणि गायनॅकॉलॉजिकल सोसायटीने परिषदेचे आयोजन केले होते. त्यामध्येही माझे प्रमुख भाषण होते. या भाषणात मी बदललेल्या जीवनशैलीमुळे गर्भधारणामध्ये येणार्‍या बाधा, तसेच महिलांमधील बालमृत्यू यांविषयी आपले विचार मांडले होते. हा विषय एकूणच जागतिक पातळीवर चर्चिला जात असून त्याचे गांभीर्यही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याबाबत मी विचार प्रकट करताना म्हणालो होतो, "Inspite of great advances in the medical field and slightly improved quality of healthcare of our country, the maternal mortality in India is very high. Anemia and other factors are the most common causes of nearly 80 thousands deaths a year in India. I believe that the health status of Indians, specially that of the rural population is a matter of grave concern."

बिंदू चौक आणि गांधी मैदान ही कोल्हापुरातील जाहीर सभांची ठिकाणे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शहराच्या मध्यवर्ती असलेला ऐतिहासिक दसरा चौक हा केंद्रबिंदू बनला होता. मराठा आरक्षणाच्या लढ्यातील माझ्या कार्याविषयी आत्मचरित्रात स्वतंत्रपणे एक प्रकरण लिहिले आहेच. मराठा आरक्षणाच्या लढ्यातील सगळी भाषणे भाषण संग्रहात दिली आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मी पहिल्यापासून पुढाकार घेतला.

हा प्रश्न माझ्या जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा असल्याने प्रत्येक भाषण आकडेवारीसह मांडलेले असे. अभ्यासपूर्ण मांडणी आणि रोखठोक भूमिका यामुळं माझ्या भाषणांना प्रचंड प्रतिसाद मिळायचा. आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजाने राज्यभरात 58 मूक मोर्चे काढले. पण सरकारने त्याची दखल घेतली नाही. ऑगस्ट 2018 मध्ये कोल्हापूरसह महाराष्ट्रात ठिय्या आंदोलन झाले. दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने हे आंदोलन सुरू होते. 9 ऑगस्ट 2018 रोजी विराट जनसागरानं मराठा आरक्षणासाठी आरपारचा रणसंग्राम उभारण्याचा वज्रनिर्धार केला.

त्यावेळी भाषणात मी खूप आक्रमकपणे भूमिका मांडली. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी 26 जून 1902 ला आपल्या संस्थानात 50 टक्के आरक्षण दिले होते. तेव्हापासूनच्या आरक्षणाच्या इतिहासाचे संदर्भ देऊन मी भाषणात म्हणालो, "यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत 11 मराठा मुख्यमंत्री झाले. परंतु, त्यापैकी कोणालाच मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे का वाटले नाही? आम्ही आरक्षण मागतोय, भीक नाही." सरकारला इशारा देताना मी म्हणालो, "लाखो मराठ्यांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. हा आवाज तुम्ही ऐका. सनदशीर, लोकशाही मार्गाने आम्ही जात आहोत. पण प्रत्येकालाच एक मर्यादा असते.

कोणतीच गोष्ट तुटेपर्यंत ताणू नका. 1989 मध्ये तामिळनाडूत पेरियार समाजाने आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन केले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी ओबीसी वर्गात पेरियार समाजाचा समावेश करून ओबीसी आरक्षण पन्नास टक्केपर्यंत वाढवले. तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण द्या," अशी मागणी याच सभेत केली. यावेळी आयोजकांनी जाणीवपूर्वक कोणत्याही आमदार, खासदारला वा कोणत्याही राजकीय नेत्याला मंचावर येऊ दिले नव्हते. त्या राजकीय मंडळींना श्रोत्यांमध्येच बसावे लागले. मंचावर माझ्यासह श्रीमंत शाहू महाराज, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात, असे मोजकेच लोक होते.

या आंदोलनाची दखल त्यावेळच्या युती सरकारला घ्यावी लागली. मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर सकल मराठा समाजाच्यावतीनं 8 जुलै 2019 रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात माझा कृतज्ञता सत्कार सोहळा झाला. त्यावेळच्या भाषणात आरक्षणाच्या प्रश्नावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केलेली चर्चा कशी फलदायी ठरली, याची आठवण करून दिली. आरक्षणाचे समर्थन करताना मराठा समाजाचे वास्तव चित्र मांडले.

मराठा समाजात शेतकरी म्हणजे कुणबी आणि लढवय्या असे दोन प्रकार आहेत. शेतकर्‍यांचे कुटुंब वाढत गेले, त्यामुळे शेतीचेही विभाजन झाले. आता अनेक मराठा कुटुंबांकडे अर्धा गुंठाही जमीन नाही. मराठा समाजातील 70.56 टक्के लोकांकडे राहण्यासाठी पक्की घरे नाहीत. 62.78 टक्के लोक अल्पभूधारक आहेत. बेरोजगारामध्ये सर्वाधिक तरुण मराठा समाजातील आहे. आता मराठा समाजातील प्रत्येक तरुणाला सुशिक्षित केले पाहिजे. मराठा समाजाच्या लढाईत दै. 'पुढारी' सदैव अग्रभागी राहील, अशी ग्वाही मी या समारंभात दिली.

एकंदरीतच, लढे आणि आंदोलनांतील भाषणांबरोबरच वैद्यकीय, क्रीडा, बँकिंग, कला, संगीत, अशा अनेक विषयांवर माझी असंख्य समयोचित अभ्यासपूर्ण भाषणं झाली. त्याद्वारे मला विविध क्षेत्रातील दिग्गजांशी संपर्क साधता आला. आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवता आले. तरुण पिढीशी नाळ जोडता आली. गाडगेबाबा, क्रांतिसूर्य नाना पाटील यांच्यासारख्या समाजसेवा, स्वातंत्र्य चळवळीतील महननीय व्यक्तींचे विचार समाजापर्यंत घेऊन जाता आले. परंतु, वक्तृत्व कला ही सहजसाध्य होणारी गोष्ट नव्हे. त्यासाठी कष्ट उचलल्यानंतरच मला प्रेक्षकांना खिळवून ठेवता आलं.

तशी, हायस्कूल जीवनापासूनच माझी वाचनाशी नाळ जुळलेली होती व ती आजही कायम आहे, हे मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. वाचनामुळे तुमच्या जाणिवा वाढतात, माहिती कळते, त्यामध्ये असलेले विविध कंगोरे लक्षात येतात, विषयातील विरोधाभास समजून येतो… अन् हे तर प्रथितयश वक्त्याला आवश्यकच असते. म्हणूनच यशस्वी वक्ता व्हायचं असेल तर बोलण्याची नुसती स्टाईल निर्माण करून उपयोग नाही, तर त्याला परिपूर्ण ज्ञानाची जोडही हवी. शेतकरी मोर्चा-प्रश्न असो, व्यापार्‍यांच्या समस्या असोत; पत्रकारिता, राजकारण, विज्ञान, क्रीडा, आरोग्य अशा विविध विषयांवर मी हजारो व्याख्यानं दिली आहेत. पण विषयाची तयारी केल्याशिवाय मी मैदानात कधी उतरलो नाही. श्रोत्यांना गृहीत धरण्याची वृत्ती मी कधीही जोपासली नाही. मात्र त्यांना काहीतरी बोध व्हावा, ज्ञान मिळावे ही काळजी मात्र मी नेहमीच घेतली.

ज्याप्रमाणं वैद्याला रुग्णाची नाडी बघून त्याचा आजार कळतो, अगदी तसंच वक्त्यालाही श्रोत्यांची नाडी कळावी लागते. अन्यथा, 'रात्रभर रामायण ऐकून रामाची सीता कोण,' अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मी जशी प्रेक्षकांची नाडी समजून घेतली, तशी भाषणाची कलाही अवगत केली. भाषण ही खरोखरीच वक्त्याची कसोटी पाहणारी एक कला आहे. गंभीर विचार मांडतानाही प्रसंगानुरूप विनोदाची किंवा काव्याची आणि समर्पक सुभाषितांची पेरणी भाषणामध्ये केल्यास त्याचा श्रोत्यांवर चांगला प्रभाव पडतो, याचा अनुभव मी पदोपदी घेतला आहे.

थोडक्यात म्हणजे सुगरणीला जसं तेल, तिखट, मीठ प्रमाणबद्धपणे घालून स्वयंपाक चवदार बनवायचा असतो, तसेच वक्त्यालाही योग्य तो मालमसाला प्रमाणशीरपणे घालूनच भाषण चवदार बनवावं लागतं. तसेच श्रोते हे केवळ श्रोतेच नसतात तर ते प्रेक्षकही असतात, याचं भान ठेवावं लागतं. त्यामुळे वक्त्याच्या वक्तृत्वशैलीबरोबरच त्याची देहबोलीही तेवढीच महत्त्वाची असते. थोडक्यात म्हणजे वक्ता हा काही प्रमाणात अभिनेताही असावा लागतो.

आमचं वृत्तपत्र हे असं एक माध्यम आहे की, तिथं ठायी ठायी अनेक विनोदी प्रसंग घडत असतात. मुद्राराक्षसाचे हे घोटाळे अनर्थ घडवणारेही असतात. अनुभवाचे असले बोल रंजकपणे सांगितले की, श्रोत्यांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. ते भाषणात अधिकच रंगून जातात. माझ्या नशिबानं आचार्य प्र. के. अत्रे आणि पु. ल. देशपांडे यासारख्या वक्त्यांची अनेक विनोदी भाषणं ऐकण्याची संधी मला मिळाली. त्याचा मला खूप फायदा झाला.

मात्र आता मी जी आठवण सांगणार आहे, ती माझ्याच एका रंगलेल्या विनोदी भाषणाची आहे. माझं हे भाषण इतकं सुंदर झालं की, त्या विषयावर बोलण्यासाठी आणलेल्या प्रमुख वक्त्याची चांगलीच पंचाईत झाली. त्यांना आपलं भाषण आवरतं घ्यावं लागलं.

सन 2002 ची गोष्ट आहे. कोल्हापुरात महाराष्ट्र हास्य उत्सव साजरा झाला होता. 23 मार्चचा तो दिवस. या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष होतो. प्रमुख उपस्थिती होती ती डॉ. मदन कटारिया यांची. डॉ. कटारिया हे एक मोठं प्रस्थ. जागतिक हास्य चळवळीचे जनक आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते. सहसा कुठल्याही सभा-समारंभात अध्यक्षानं शेवटी बोलायची प्रथा असते. परंतु, प्रमुख वक्ता हाच जेव्हा महत्त्वाचं आकर्षण असतं, तेव्हा अध्यक्षाला सुरुवातीलाच त्याचं भाषण आटोपायला लावण्याचीही प्रथा प्रचलित आहेच. त्याप्रमाणंच संयोजकांनीही मला प्रथमच भाषण करावयास सांगितले.

समारंभ हास्य उत्सवाचा असल्यामुळे अभ्यासपूर्णच, पण विनोदी बोलायचं असं मी ठरवलं होतं. माझ्या भाषणाची सुरुवातच मी, आपल्या जीवनात हास्य किती आवश्यक आहे इथून केली. तसेच ते अनेक रोगांवरचा एकमात्र इलाज कसा आहे, हे तपशीलवार विशद केलं. मी म्हणालो, "हसण्यात हिलिंग पॉवर आहे, याचा शोध नॉर्मन कुजीन या अमेरिकन पत्रकारामुळे वैद्यकीय जगताला लागला. कुजीन यांना मणक्याचा असाध्य रोग झालेला होता. मन रिझवण्यासाठी म्हणून त्यांनी विनोदी चित्रपट पाहायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचं दुखणं कधी पळून गेलं, हे त्यांचं त्यांनाच समजलं नाही. 'अ‍ॅनॉटॉमी ऑफ इलनेस' या त्यांच्या पुस्तकामुळे जगभरातील संशोधकांचं लक्ष हास्योपचाराकडे वळले. परंतु, याला खर्‍या अर्थानं मूर्तरूप दिलं, ते आजचे प्रमुख पाहुणे डॉ. कटारिया यांनी! हास्यक्लबच्या संकल्पनेसाठी त्यांनी आपलं सारं आयुष्य वाहून घेतलं."

भाषणात मी पुढे म्हणालो, "प्रत्येक व्यक्तीला स्फूर्ती ही पाहिजेच असते. आपल्याकडच्या राजकीय व्यक्तींना तर आपल्या बातम्या दररोज वृत्तपत्रात किंवा चॅनेलवरती याव्यात, असं वाटत असतं. त्यामुळे आपण लोकांच्या नजरेत सातत्यानं राहू, अशी त्यांची धारणा असते. खरं तर, देवालाही स्तुती आवडतेच की! म्हणून तरी आपण त्याची आरती करीत असतो. तसंच या लोकांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपली स्तुती करावी तसेच कार्यक्रमाच्या बातम्या वृत्तपत्रात छापून याव्यात, असं वाटतच असतं. त्यासाठी त्यांच्या नाना खटपटी चालू असतात. वृत्तपत्रातून किंवा चॅनेलवरून त्यांच्या प्रसिद्ध होणार्‍या बातम्या या त्यांच्यासाठी जणू प्राणवायूच असतो. त्यातून अनेक किस्से घडत असतात. त्यातले एक-दोन किस्से आज मी तुम्हाला सांगणार आहे."

"हे किस्से म्हणजे पत्रकारितेत ज्याला आम्ही उपसंपादकाच्या डुलक्या म्हणतो, त्या होत्या. त्यासंबंधी बोलताना मी म्हणालो, "आपल्याला हे माहीतच आहे, की कोल्हापुरात काही गादी कारखाने आहेत. त्यामुळे त्यांच्यात व्यावसायिक चढाओढ ही नेहमीच चालत असते. अर्थात, ती कुठल्याही व्यवसायात असतेच. त्यामुळे त्यात चुकीचं काही नाही. तर, ते गादी कारखानदार आपल्या मालाची आकर्षक जाहिरात पहिल्यापासूनच 'पुढारी'मधून करीत असतात. त्यातल्या एका गादी कारखान्याच्या मालकांना एक विचित्र सवय होती. ते नेहमी 'पुढारी' ऑफिसमध्ये यायचे आणि त्यांनी दिलेली जाहिरात व्यवस्थित कम्पोज केली आहे की नाही, हे कम्पोज विभागात जाऊन स्वतःच तपासायचे. ते नेहमीच येत असल्यामुळे जाहिरात विभागापासून संपादक विभागापर्यंत ते सर्वांच्याच ओळखीचे झाले होते."

"आमच्या पत्रकार मंडळींचा दररोज विविध बातम्यांशी आणि लोकांशीही संंबंध येत असतो. त्यामुळे त्यांना बहुप्रसवी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. शिवाय हे पत्रकार लोक टर उडवण्यातही चांगलेच माहीर असतात. झालं! आमच्या कार्यालयातील काही प्रूफरीडर आणि संपादकीय विभागातील लोकांनी या कारखानदाराची टोपी उडवायचं ठरवलं! आणि प्रूफ तपासून ते निघून जाताच, त्यांच्या जाहिरातीत थोडासा बदल केला."

"दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळीच मला त्या गादी कारखानदाराचा फोन आला. त्यावेळी मोबाईल नव्हते. जे काही असेल ते लँडलाईनवरूनच बोललं जायचं. त्यांचा फोन आला तेव्हा मी घरीच होतो. ते मला फोनवरून म्हणाले, "अहो, तुमच्या 'पुढारी'तून आज आमची जाहिरात आलेली आहे. ती जाहिरात वाचल्यानंतर सकाळपासून मला लोकांचे इतके फोन येत आहेत की, फोनची रिंग थांबतच नाही!"

"मलाही खूप आनंद झाला. आपल्या वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून एखाद्या कारखानदाराला इतका प्रतिसाद मिळत असेल, तर आनंद होणं स्वाभाविकच आहे. मग त्यांना उत्तरादाखल मी म्हणालो, "अहो, खूपच छान! चांगलाच प्रतिसाद आहे की मग!" त्यावर ते कारखानदार म्हणाले, "ते ठीक आहे हो! पण जाहिरातीत जे म्हटलं आहे, तो माल मी पुरवू शकत नाही ना!"

"त्यांचं ऐकून मीही जरा कोड्यातच पडलो. कारण माल त्यांचा आणि जाहिरातही त्यांचीच. मग माझ्या डोक्यात असा विचार आला की, कदाचित माल कमी पडत असावा. आमच्या पेपरमधील जाहिरातीचा चांगलाच परिणाम होतो आहे म्हटल्यावर मी त्यांना म्हणालो, "मालाला एवढी प्रचंड मागणी आलेली आहे? अरे वा!"

"आता मात्र ते मूळ मुद्द्यावर आले आणि म्हणाले, "साहेब, तुम्हाला कसं सांगू? मी जाहिरात दिली होती, ती म्हणजे आमच्याकडे मऊ मऊ, गुळगुळीत व उबदार गाद्या मिळतील म्हणून! पण तुमच्या लोकांनी 'गा' ऐवजी 'मा' हे अक्षर वापरल्यानं 'गाद्या'ऐवजी 'माद्या' मिळतील असं प्रसिद्ध झालं आहे! त्यामुळे त्याचा अर्थ वेगळाच झाला ना! आणि त्यामुळेच मला सकाळपासून लोकांचे फोन यायला लागलेत!"

"माझ्या या किस्सा कथनावर सभागृह हसून हसून अगदी लोटपोट झालं. सुमारे पाच मिनिटं तरी हा हास्यकल्लोळ सुरूच होता आणि मला पुढे बोलता येत नव्हतं. हसण्याचा भर ओसल्यानंतर मी पुढे म्हणालो, "अर्थात गाद्यांचं माद्या झाल्याचं ऐकून मलाही आता तुम्हाला आली तशीच हसण्याची उबळ आली. ती कोणालाही येणं साहजिकच होतं; परंतु मी माझं हास्य अक्षरशः दाबून ठेवलं आणि त्यांना विश्वास देत म्हणालो, "काळजी करू नका. मी पाहून घेतो काय चूक झाली आहे, ती."

"अर्थात, मी आता काय करू शकणार होतो? एकदा धनुष्यातून सुटलेला तीर, बंदुकीतून सुटलेली गोळी आणि वर्तमानपत्रातून छापून आलेली माहिती, यातलं पुन्हा काहीच परत घेता येत नाही." या पहिल्या किश्श्यातून हसून हसून अद्याप आमचा श्रोतृजन सावरलाही नव्हता, तोच मी दुसरा एक विनोदाचा बॉम्ब फोडला आणि सभागृह हास्यसागरात वाहून गेलं. तो किस्सा मी सांगू लागलो."
"आता सांगितलेल्या प्रसंगासारखाच एक भन्नाट प्रसंग एका मंत्र्यांबाबतही घडला होता. हा किस्साही खासच आहे."

मी एवढं बोलताच सभागृहातून 'सांगा! सांगा!' असा एकच गलका झाला. मग मी हसत हसतच तो किस्सा सांगायला सुरुवात केली. "आपल्याला माहीतच आहे, की कोल्हापूर जिल्ह्याला बरेच मंत्री होऊन गेले आहेत. त्यात असे एक मंत्री होते, की त्यांना आपल्या बातम्या दररोज छापून याव्यात, असं वाटायचं. तशी त्यांची इच्छाच. त्यासाठी दैनिकांच्या कार्यालयात ते स्वतः फोन करायचे. आपल्या बातम्यांबाबत ते फारच आग्रही असायचे. समजा, एखाद्या दिवशी त्यांची बातमी किंवा फोटो आला नाही, तर ते अस्वस्थ व्हायचे आणि त्यांचा लगेच फोन यायचा."

"तर, बातम्यांचा हव्यास असलेल्या या मंत्रिमहोदयांची गंमत करायची, असं एकदा आमच्या संपादकीय विभागातील लोकांनी ठरवलं. साधारणतः प्रत्येक शहरात वारांगनांची वस्ती ही असतेच. कर्मधर्म संयोगानं कोल्हापुरातील या वस्तीत या मंत्र्यांच्या उपस्थितीत एक उद्घाटन कार्यक्रम होता. ते त्या कार्यक्रमाला गेले. उद्घाटन पार पडलं. त्यांनी मस्तपैकी भाषणही ठोकलं. दुसर्‍या दिवशी या कार्यक्रमाची 'पुढारी'त बातमीही छापून आली. आपली बातमी वाचून अनेकदा कार्यालयात आभाराचे फोन येत असतात. मात्र, मंत्रिमहोदयांच्या बाबतीत उलटच घडलं."

"त्यांची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्याऐवजी त्यांच्या धर्मपत्नीचाच मला फोन आला. मीही अचंबितच झालो. कोल्हापुरात ज्या महिला राजकारणात आहेत, तेवढ्या सोडल्या तर इतर राजकारण्यांच्या स्त्रिया या नेहमी बॅकफूटवरच असतात. साहजिकच त्या मंत्र्यांच्या पत्नीचा फोन का असावा, याचा विचार करीतच मी फोन घेतला आणि क्षणार्धातच माझा भ्रम दूर झाला."

'ते मंत्रिमहोदय ज्या कार्यक्रमासाठी गेले होते, तिथं त्यांना पाच वारांगनांनी ओवाळलं होतं. ओवाळणं वगैरे प्रकार तसे अनेक कार्यक्रमात घडतच असतात. तर कार्यक्रमाचा तोच पदर पकडून त्या मंत्रिमहोदयांच्या पत्नी मला म्हणाल्या, "साहेबांच्या कालच्या कार्यक्रमाची बातमी आज 'पुढारी'त आलेली आहे. त्यात थोडीशी गडबड झालेली आहे. आता मला हे कळेना की, मंत्रिमहोदयांच्या पत्नीनं फोन करण्याइतपत त्यात काय गडबड झाली आहे? त्यावर त्यांनीच पुढे खुलासा केला, "साहेब ज्या कार्यक्रमाला गेले होते, तेथील पाच वारांगनांनी साहेबांना निरांजनानं ओवाळलं. परंतु, प्रसिद्ध झालेल्या बातमीत, 'ओवाळले' यातील 'ओ' वरचा मात्रा आणि 'वा' या अक्षराचा काना छापलेलाच नाही. त्यामुळे पाच वारांगनांनी 'ओवाळले' याऐवजी 'आवळले' असा शब्द प्रसिद्ध झाला आहे!"
पुन्हा एकदा सभागृहात हास्याचे अ‍ॅटमबॉम्ब उडाले. मग मीही त्या हास्यात बुडालो.

"त्यांच्या पत्नीनं मला हे सांगितल्यावर मलाही हास्याची उबळ रोकता रोकता नाकीनऊ आले होते." मी पुढे सांगू लागलो, "संपादक या नात्यानं, ज्येष्ठत्वाच्या नात्यानं अशा वेळी काही बोलताही येत नाही आणि उघड हसताही येत नाही." मग मी त्यांना म्हणालो, "काळजी करू नका. कोणाची चूक आहे ते मी पाहतो."

"असे असंख्य किस्से सांगता येतील. काही वेळा अनावधानानं चुका होतात, तर काही वेळा त्या जाणीवपूर्वकही केल्या जातात. जाणीवपूर्वक होणार्‍या चुकांमध्ये शक्यतो त्या संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला धरूनच अनेकदा असं घडवलं जातं. तरीही हे किस्से 'उपसंपादकाच्या डुलक्या' या नावाखालीच संबोधले जातात."

त्या दिवशी त्या हास्यक्लबमध्ये सुमारे तासभर माझं भाषण रंगलं होतं. रुईकर कॉलनीमध्ये असलेला हा हॉल भरगच्च भरला होता. माझ्या भाषणादरम्यान कधी हास्याची कारंजे उडाली, तर कधी कधी धबधबे कोसळले. शेवटच्या किश्श्यानं हास्याचा गिरसाप्पा कोसळला, असं म्हटलं तरी ते मुळीच अतिशयोक्तीचं होणार नाही.

माझ्या भाषणानंतर प्रमुख वक्ते डॉ. कटारिया भाषणाला उभे राहिले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगून टाकलं, "या कार्यक्रमात मी हास्याचं महत्त्व सांगणार होतो. परंतु, जे मी बोलणार होतो, तेच श्री. जाधव यांनी मोठ्या खुमासदार शैलीत सोदाहरण सांगून टाकलं. त्यामुळं मी काही बोललो, तर ते आता उगाच त्यांचं रीपिटिशन केल्यासारखं होईल. एक मात्र खरं, की हास्य हे आपोआपच निर्माण झालं पाहिजे. ते आपण जाधव यांच्या भाषणात पाहिलं, अनुभवलं आणि खळाळून हसलोही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्यानं श्री. जाधव यांनी आपल्याला जवळजवळ तासभर इतकं हसवलं, की मला तर वाटलं, ते ट्वेंटी-ट्वेंटी मॅचमध्ये चौकार आणि षटकारच मारीत आहेत. श्री. जाधव यांच्या या बहुआयामी भाषणामुळे मला काही बोलायला शिल्लक राहिलंच नाही."
असं म्हणून डॉ. कटारिया यांनी आपलं भाषणच आवरतं घेतलं!

डॉ. कटारियांना आपलं भाषण का आवरतं घ्यावं लागलं? मुळातच मी समाजाकडे, माणसांकडे डोळसपणे पाहत आलो आहे. जीवनातला विनोद शोधत आलो आहे. कारण मला पुरेपूर ठाऊक होतं, की जीवन जर निरामय ठेवायचं असेल, तर त्यावर विनोदाच्या च्यवनप्राशचीच मात्रा तंतोतंत लागू पडू शकते.

आतापर्यंत मी जी भाषणं केली, मग ती कोणत्याही विषयावरची असोत, त्या विषयाचा अभ्यास केल्याशिवाय मी कधी व्यासपीठाची पायरी चढलो नाही. साहजिकच लोकांना हे ठाऊक असण्याचं कारण नव्हतं आणि एखाद्या वृत्तपत्राचा संपादक म्हटलं, की तो धीरगंभीर मनोवृत्तीचाच असला पाहिजे, असा लोकांच्या नजरेचा एक विशिष्ट साचा ठरून गेलेला असतो. त्यामुळेच लोकांना कल्पनाच नव्हती, की मी त्यांना इतकं हसवेन!

ज्यांनी विनोदाचं अंग-प्रयांग जनतेसमोर आणलं, त्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डॉ. कटारियांनाही माझ्या भाषणानंतर आवरतं घ्यावं लागलं, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. 'जोसेफ स्टोरी' या इंग्लिश विचारवंतानं उत्कृष्ट भाषणाबाबत काही निरीक्षणं नोंदवली आहेत. त्या आधारे आदर्श वक्त्यानं काय केलं पाहिजे, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचेही गृहपाठ मी केलेले आहेत.

माझे आचार्य अत्रे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या फर्ड्या वक्त्यांशीही जवळून संबंध आले. मी त्यांच्या भाषणांचं रसग्रहण करीत आलो आणि ते माझ्या अंगी मुरवत गेलो. त्यामुळेच ही भाषणकलेची गुटी मला चांगलीच मानवली आणि माझ्यातला वक्ता अधिकाधिक सुद़ृढ होत गेला. अर्थात, तुम्हाला भाषणात यशस्वी व्हायचं असेल तर कष्ट, प्रयोग आणि सराव याला मात्र पर्याय नाही. त्याबरोबरच आपल्याला योग्य-अयोग्य याचंही बोलताना भान ठेवावं लागतं.

भाषण करणं ही एक कला आहे. त्याहून विनोदी भाषणं करणं ही अवघड कला आहे. त्यासाठी आधी विनोद कळावा लागतो. कळल्यानंतर त्याला अचूक पकडावा लागतो. पकडल्यानंतर खुमासदार शैलीत तो सादर करावा लागतो. त्यासाठी 'टायमिंग सेन्स' हे महत्त्वाचं कौशल्य तुमच्या अंगी असायला हवं. त्याहूनही वक्त्याकडे आत्मविश्वास असणं, हे अधिक महत्त्वाचं असतं. या सर्व गोष्टी जन्मजातच माझ्या अंगी असल्यामुळे आणि त्यांच्यावर श्रम घेऊन, त्या मी अधिक परिणामकारक करू शकल्यामुळे, त्या दिवशी त्या हास्ययोग संमेलनात मी बाजी मारून नेऊ शकलो आणि प्रमुख वक्त्यालाच चितपट करून नामानिराळा झालो. त्यामुळेच मला वक्ता म्हणून सर्वच कार्यक्रमांना बोलावलं जातं, हेच याचं गमक आहे. मी नेहमीच व्याख्यानाची चांगली तयारी करून जात असतो.

मग वाचन, टिपणं काढणं, लेखन, मुद्दे काढणं, मोठ्यानं वाचणं, प्रसंगी आधी ध्वनिमुद्रण करून ते ऐकतो, त्यात सुधारणा करतो आणि मगच व्याख्यानाला जातो. त्यामुळे अर्थातच माझं व्याख्यान अभ्यासपूर्ण आणि तितकेच आवेशपूर्णही होत असते. पण कधी कधी ध्यानीमनी नसताना ऐन वेळी मला व्यासपीठावरून बोलावं लागतं. तेव्हा मी उत्स्फूर्तपणे भाषण करतो. माझं वाचन अफाट असल्यानं संदर्भ डोक्यात तयार असतात, आत्मविश्वास पुरेपूर असतो आणि वाणी तर ओघवती आहेच. त्यामुळं मग कोणत्याही विषयावरलं माझं भाषणं प्रभावीच होतं.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news