वसंतदादा पाटील आणि आबा यांच्यात अनेक वर्षांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. आबांच्या आमृतमहोत्सवी समारंभात आबांसमवेत गप्पांमध्ये रममाण झालेले वसंतदादा.
वसंतदादा पाटील आणि आबा यांच्यात अनेक वर्षांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. आबांच्या आमृतमहोत्सवी समारंभात आबांसमवेत गप्पांमध्ये रममाण झालेले वसंतदादा.

सिंहायन आत्मचरित्र : लोकनेते वसंतदादा

Published on

गतवर्षी पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

1 मार्च, 1989. सकाळी साडेअकराचा सुमार.
मी माझ्या कार्यालयात नित्य कामात गर्क होतो. तेवढ्यात फोनची रिंग झाली. मी रीसिव्हर उचलला आणि धक्काच बसला. बातमी अत्यंत दुःखद होती. ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांचं निधन झाल्याचं आमचा मुंबईचा प्रतिनिधी सांगत होता. माझ्यासाठी हा फार मोठा धक्का होता. दादांचे नि माझे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता, घरातलंच कुणीतरी गेल्यासारखा मी सुन्न झालो! एका वृत्तपत्राचा संपादक म्हणून लहान-थोरांच्या मृत्यूच्या बातम्या ऐकण्याची आणि त्या छापण्याची सवय अंगवळणी पडली असली, तरी जी माणसं आपल्या अत्यंत जवळची असतात, त्यांच्या मृत्यूची बातमी आपण किंवा त्यांच्यावर अग्रलेख लिहिणं किती कठीण असतं, हे दोन वर्षांपूर्वीच आबांच्या निर्वाणानं मी चांगलंच अनुभवलं होतं!

अखेर घट्ट मनानं हाती लेखणी घेऊन मी दादांवर अग्रलेख लिहायला बसलो आणि दादांच्या असंख्य आठवणी एकाचवेळी मनात दाटून आल्या…!

अलीकडे दादांची प्रकृती थोडी नरमगरम होती; पण ते अचानक जातील, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. परंतु, नियतीपुढे कुणाचंच काही चालत नाही, हेही तितकंच खरं! गेल्या डिसेंबर महिन्यात दादा अ. भा. शेतकरी संघटनेची स्थापना करण्यासाठी नागपूरला गेले होते. तिकडे ते आठवडाभर होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. चार दिवस उपचार घेऊन, तिथूनच ते सोलापूरला गेले. सोलापुरातील व्यापारी परिषदेचे ते प्रमुख पाहुणे होते.

तिथं भाषण करीत असतानाच त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. परंतु, आपल्याला मुंबईला न्या; हा त्यांचा आग्रह! त्यांना आपली अखेर कळली असेल का? आबांचं निधन झालं, तेव्हा त्यांनाही आपली अखेर जवळ आलीय, याची जाणीव झाली होती आणि त्यांनीही 'आपल्याला घरी न्यावं,' असा आग्रह धरला होता. तो प्रसंग सर्रकन माझ्या नेत्रपटलांवरून पुढे सरकला आणि मी अस्वस्थ झालो.

दादांना मुंबईला आणून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दादा जेव्हा राजस्थानचे राज्यपाल होते, तेव्हा तिथं चौधरी नावाचे त्यांचे एक स्वीय सहायक होते. आताही तेच चौधरी त्यांच्या जवळ होते. अखेरच्या क्षणी दादा चौधरींना म्हणाले,
"चौधरी, मैं जाता हूँ।"

हे शब्द दादांचे अखेरचे शब्द ठरले! एवढा मोठा माणूस. त्याचा तेवढाच मोठा गोतावळा. कुटुंबीय, नातेवाईक, अनुयायी, कार्यकर्ते आणि त्याहूनही त्यांच्यावर प्रेम करणारी महाराष्ट्राची कोट्यवधी जनता! एवढा सगळा कबिला असताना दादांनी अखेरचा निरोप घेतला तो स्वीय सहायक चौधरींचा! नियतीच्या या न्यायाला काय म्हणावं आणि त्या चौधरींच्या भाग्याला तरी काय नाव द्यावं?

1 मार्च, 1989 रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास या स्वातंत्र्ययोद्ध्यानं अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. मंत्री, आमदार, खासदारांसह सर्वसामान्य जनतेची रीघ लागली होती. आपल्या लाडक्या नेत्याचं अखेरचं दर्शन घेताना अनेकांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. दादा काँग्रेसचे नेते जरी असले, तरी ते अजातशत्रू होते. सर्व पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळेच अगदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सर्वच राजकीय प्रमुख दादांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण हे तर दिल्लीवरून अंत्यदर्शनासाठी येऊन पोहोचले होते. सार्‍या महाराष्ट्राला हा मोठाच धक्का होता.

दुसर्‍या दिवशी सांगलीमध्ये सरकारी इतमामात दादांचा अंत्यविधी झाला. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत या ज्येष्ठ नेत्याला तुफान जनसागरानं साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आणखी एक मानाचं पान गळून पडलं! अनंतात विलीन झालं! स्वातंत्र्य लढ्यात तुरुंग फोडून जी कृष्णामाई ते पोहून गेले होते, त्याच कृष्णाकाठी त्यांचा पवित्र देह अग्निदेवतेला समर्पित करण्यात आला.

चंदनाच्या चित्तेवर चिरविश्रांती घेणार्‍या दादांच्या पार्थिवावर देशाच्या पंतप्रधानांनी सार्‍या देशाच्या वतीनं पुष्पचक्र वाहिलं! हे भाग्यसुद्धा भाग्यवंतालाच लाभतं! राजीवजींनी दादांच्या पार्थिवावर चंदनकाष्ठ ठेवल्यानंतर दादांचे सुपुत्र प्रकाशबापू यांनी चित्तेला मुखाग्नी दिला. लाखोंच्या जनसमुदायापुढे आदरांजली वाहताना पंतप्रधान राजीव गांधी यांचासुद्धा कंठ जडावला होता.

"दादा एक महान नेता थे। हमने एक नेता नहीं, बल्कि एक स्वातंत्र्ययोद्धा खोया है। वसंतदादा की कमी हमेशा महसूस होती रहेगी।"
अशा भावपूर्ण शब्दांत राजीवजींनी दादांना आदरांजली वाहिली.

या दुःखभरल्या क्षणांचा मीही एक साक्षीदार होतो. आता दादा आपल्याशी कधीच बोलणार नाहीत, या कल्पनेनंच माझं मन विव्हल झालं होतं. माझ्यासारखीच तिथं जमलेल्या सर्वांची अवस्था झालेली होती. पाच लाखांहून अधिक लोक दादांना अखेरची मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते. ते पाहून कृष्णामाईलाही दुःखाचं भरतं आलं होतं. महाराष्ट्रानं आपला नेता गमावला होता; पण कृष्णामाईनं आपला पुत्र गमावला होता! तिचं मूकरुदन कुणाला कसं कळणार?

"Leaders becoms great not because of their power, but because of their ability to empower others."

"नेते महान बनतात ते स्वतः सत्ताधीश असतात म्हणून नाही, तर दुसर्‍यांना सत्ताधीश बनवण्याची त्यांच्यात क्षमता असते म्हणून."
जॉनसी मॅक्सवेल या अमेरिकन साहित्यिकाचे हे विचार वसंतदादांना तंतोतंत लागू पडतात. वसंतदादा हे याच वर्गवारीतील लोकनेते होते, यात शंकाच नाही. दादा म्हणजे तडफदार आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व. त्यांनी 1985 च्या जूनमध्ये मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्या आधीही त्यांनी असाच तडफदारपणा दाखवला होता.

1975 मध्ये वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्रिपद आपल्याकडे येईल, अशी त्यांची स्वाभाविक अपेक्षा होती. पण तेव्हा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि दादांकडे पाटबंधारे खातं सोपवण्यात आलं. परंतु, सिंचनाच्या मुद्द्यावरून पहिल्यापासूनच त्यांच्यात आणि चव्हाणांच्यात मतभेद झाले. ते मतभेद इतके टोकाला गेले, की दादांनी केवळ मंत्रिपदाचाच नव्हे, तर आमदारकीचाही राजीनामा देऊन टाकला!

योगायोगानं त्या दिवशी दादांचा साठावा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्यांनी राजकारण संन्यास जाहीर करून केवळ पक्षालाच नव्हे, तर सार्‍या महाराष्ट्रालाच आश्चर्याचा धक्का दिला. दादांचा राजकारण संन्यास हा त्यांच्यावर प्रेम करणार्‍या त्यांच्या सर्वच चाहत्यांना हादरवून सोडणारी गोष्ट होती. राजीनामा देऊन जेव्हा ते सांगलीला आले, तेव्हा जनतेनं त्यांची उत्स्फूर्तपणे भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकीचं रूपांतर जेव्हा स्टेशन चौकातल्या भव्य सभेत झालं, तेव्हा सारी सांगली त्या चौकात दाटून भरली होती. जणू जनसागराला उधाण आलं होतं!

त्या क्षणाला साक्षी ठेवून दादांनी आपल्या मनातील भावना त्यांच्या लाडक्या जनताजनार्दनापुढे मोकळ्या केल्या. ते म्हणाले,
"महाराष्ट्रात बेरजेचं राजकारण व्हावं, या मताचा मी आहे. मी माणसं सांभाळणारा माणूस आहे. माणसं न सांभाळणार्‍याशी माझं पटत नाही. निवृत्तीचा निर्णय मी विचारपूर्वकच घेतलेला आहे. सत्ता नसतानाही समाजकार्य करता येतं, हे मी दाखवून देणार आहे!"

त्यांचे हे उद्गार भल्याभल्या राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते, यात वादच नाही. दादांनी पुन्हा राजकारणात सक्रिय व्हावं, यासाठी विलासराव शिंदे यांनी सांगलीत विराट मेळावा घेतला. परंतु, दादांनी आपला निर्णय अजिबात बदलला नाही!

मात्र, आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा जबरदस्त पराभव झाला. तेव्हा दादांनी, "काँग्रेसच्या घराला आग लागलेली असताना मी स्वस्थ राहू शकत नाही," अशी घोषणा करून राजकारण संन्यास सोडला आणि ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर दादा सन्मानपूर्वक मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीमध्ये विराजमान झाले! दादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न साकार झालं. महाराष्ट्रात पुन्हा बेरजेचं राजकारण आलं.

शरद पवारांनी राजकीय बंड करून 1978 मध्ये दादांची सत्ता उलथवून टाकली! वास्तविक दादा हे सरळ, साध्या स्वभावाचे गृहस्थ. राजकारणातले छक्केपंजे त्यांना कधी जमले नाहीत. त्यांना कूट राजनीतीचा तिटकारा होता.

खरं तर, जेव्हा शरद पवारांच्या बंडाचं वारं वाहू लागलं होतं, त्याचवेळी मी स्वतः दादांना भेटून, 'दादा, रात्र वैर्‍याची आहे, जागे व्हा' म्हणून सावध केलं होतं. परंतु, दादांचा पवारांवर दांडगा विश्वास होता. त्या विश्वासानंच त्यांचा विश्वासघात केला.

परंतु, लवकरच केंद्रात पुन्हा इंदिराजींची सत्ता आली आणि त्यांनी शरद पवारांचं 'पुलोद' सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली! आणि मग 1980 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दादांनी पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवून आय काँग्रेसला बहुमत मिळवून दिलं. शरद पवारांनी केलेल्या बंडाळीमुळे आपलं मुख्यमंत्रिपद गेलं होतं, याची खंत दादांच्या मनात सलत होती.

म्हणून यावेळी मुख्यमंत्रिपदावर आपलाच अधिकार आहे, असं दादांना वाटत होतं; पण त्यांचा पुन्हा एकदा विश्वासघात झाला! आणि मुख्यमंत्रिपदाची माळ बॅ. अंतुलेंच्या गळ्यात पडली. इतकं होऊनही दादा स्वस्थ बसले. पक्षाचं काम प्रामाणिकपणे करीत राहिले. कारण –
अखेर दादांची प्रतीक्षा संपली. अंतुलेंना लवकरच सिमेंट घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदावर आलेल्या बॅ. बाबासाहेब भोसलेंचा प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडे दादांना मुख्यमंत्री करण्यावाचून दुसरा सक्षम पर्यायच उरला नाही!

2 फेब्रुवारी, 1983 रोजी पुन्हा एकदा दादांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर जून 1985 पर्यंतची त्यांची कारकीर्द अत्यंत धडाक्याची गेली. त्या काळात त्यांनी अनेक धोरणात्मक आणि कल्याणकारी निर्णय घेतले. राज्यात विनाअनुदानित शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी उच्च शिक्षणाची गंगा सर्वसामान्य मराठी तरुणांच्या दारात आणून सोडली.

पण दादा हे स्वाभिमानी स्वभावाचे! त्यांना लांगूलचालन करणं किंवा बोटचेपेपणा स्वीकारणं कधीच पसंत नव्हतं. त्यामुळेच दादांचा सल्ला न घेताच मुंबई प्रदेशचं अध्यक्षपद प्रभा रावना दिल्याबद्दल दादांचं पक्षश्रेष्ठींशी मतभेद झाले आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडलं! श्रेष्ठींना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव असल्यामुळे एवढा मोठा नेता घरी बसणं योग्य नाही, हे ध्यानात घेऊन, त्यांनी दादांना राजस्थानचं राज्यपालपद बहाल केलं.

दादांची किती रूपं आठवावीत! ते धडाडीचे स्वातंत्र्ययोद्धे होते. सांगलीचा तुरुंग फोडून त्यांनी तेव्हा पलायन केलं होतं, त्यावेळी तुरुंगाच्या पहारेकर्‍यांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गोळी लागली होती. परंतु, तशा जखमी अवस्थेतही त्यांनी कृष्णामाई पार करून पोलिसांच्या हातावर तुरी ठेवल्या होत्या. स्वातंत्र्य लढ्यातच त्यांनी पहिली संघटना उभी केली होती. पुढे तर त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांची बांधणी केली. त्यांच्यासारखा संघटक विरळाच! सहकाराचे तर ते अध्वर्यूच होते.

आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना त्यांनी उभा केला. सहकारी संस्थांचं तर त्यांनी जाळंच विणलं. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी छोट्या छोट्या शेतकर्‍यांचं जीवन फुलवलं. त्यांच्या जगण्याला बळ दिलं. 'सहकारसिंह' ही पदवी त्यांना उगीच नाही मिळाली! त्यांच्या राजकीय संघटन करण्याच्या कार्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे 'कामराज' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यांनी काँग्रेस संघटना भक्कम केली. काँग्रेसचे सरचिटणीस असताना त्यांनी 1980 साली दिल्लीत विराट किसान परिषद भरवली होती. त्या परिषदेला तब्बल 25 लाख शेतकरी उपस्थित होते! अशा या महान नेत्याचा 'पद्मभूषण' पुरस्कारानं गौरव करण्यात आला.

मंत्री असताना शेती, सहकार, पाटबंधारे, उद्योग आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत दादांनी आपला ठसा उमटवला. त्यांच्या कामाची पद्धत अनवट आणि थेट पारदर्शी होती. ते पाटबंधारे मंत्री असताना त्यांना महाराष्ट्रातील शेती पाण्याखाली आणण्याचा ध्यासच लागला होता. त्यावेळी पाटबंधारे खात्याकडे चाफेकर नावाचे एक चीफ इंजिनिअर होते. त्यांच्याकडून माहिती घेताना दादा त्यांना विचारायचे,

"अमुक अमुक खोर्‍यात किती पाणी आहे."
"अमुक अमुक टीएमसी आहे." असं उत्तर चाफेकर द्यायचे. त्यावर दादा लगेच म्हणायचे, "मला तुमचं टीएमसी सांगू नका. किती एकर जमीन भिजेल ते सांगा!" असा दादांचा खाक्या होता.

मराठीतून केवळ इयत्ता चौथीपर्यंत शिकलेल्या दादांचं शिक्षण असून नसल्यासारखं होतं. परंतु, पुस्तकी शिक्षणापेक्षा अनुभवाचं शिक्षण दादांकडे इतकं होतं, की त्यांच्यापुढे भले भले बॅरिस्टरही निष्प्रभ होत असत. त्यांना इंग्रजी फारसं कळत नव्हतं. हिंदीही गरजेपुरतंच येत होतं. परंतु, गल्लीपासून दिल्लीपर्यंत वावरताना त्यांचं भाषेवाचून कुठेही अडलं नाही. कारण भाषेच्या शुद्धतेपेक्षा विचारांचं आदानप्रदान (Communication) महत्त्वाचं असतं, यावर त्यांचा विश्वास होता.

एकदा तर विधिमंडळात घडलेला एक किस्सा त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक उत्तम नमुना म्हणून सांगता येईल. त्यावेळी हशू अडवाणी नावाचे जनसंघाचे एक आमदार होते. त्यांना मराठी येत नव्हतं. त्यामुळे सभागृहात बोलताना ते हिंदीचाच आधार घेत. त्यांनी एकदा एक प्रश्न उपस्थित केला.

"मुख्यमंत्रीजी, केंद्र सरकारने महाराष्ट्र के लिए इतनी सारी राशि देने के बावजूद भी राज्य सरकार ये राशि क्यों नही उठा रही है?"
त्यावर दादांनी उठून उत्तर दिलं, "अध्यक्ष महाराज, ऐसा है, अंथरूण देख के पाय पसरना मंगता है।"
दादांच्या या विधानावर सभागृहात खसखस पिकली. मिश्कीलतेबद्दल प्रसिद्ध असलेले आमदार केशवराव धोंगडे यावर उठून म्हणाले,

"अध्यक्ष महाराज, हे उत्तर कुठल्या भाषेत आहे?"

त्यावर हजरजबाबी दादांनी पटकन उत्तर दिलं, "हशूजीकरता हिंदीत आणि तुमच्याकरता मराठीत! हशूजी, समझ गये ना?"
त्यावर हशू अडवाणींनीही मान हलवली आणि सभागृह हशानं दणाणून गेलं.

असे हे मिश्कील स्वभावाचे परंतु ताठ कण्याचे दादा एकदा-दोनदा नाही, तर चारवेळा मुख्यमंत्री झाले. दादांची प्रशासनावर मजबूत पकड होती.

दादांचे कितीतरी निकटवर्ती! कोल्हापूरचे भाई मोहिते हे त्यापैकीच एक. दादांचे चिरंजीव प्रकाशबापू यांच्या पत्नी शैलाताई. भाई मोहिते हे त्यांचे काका. ते राजारामपुरीत राहत असत. ते नेहमी मुंबईत दादांच्यासमवेत असत. मंत्रालयात त्यांचा नेहमी वावर होता. दादांच्यावर त्यांची फार निष्ठा होती. मुंबईत असताना आणि कोल्हापुरातही त्यांची माझी भेट आणि गप्पागोष्टी होत.

दादा कमी बोलत आणि समोरच्याचं जास्त ऐकत. सविस्तर ऐकून घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करीत. स्टीफन कोव्ही नावाचा सुप्रसिद्ध विचारवंत एके ठिकाणी म्हणतो,

'चेीीं शिेश्रिश वे 'Most people do not listen with the intent to understand; they listen with the intent to reply.' 'बहुतांश माणसं ही समोरच्याचं समजून घेण्यासाठी त्यांचं बोलणं ऐकतच नसतात, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीच ऐकत असतात.'
परंतु, दादा मात्र, 'Listen with the Intent to understand' या प्रकारात मोडणारे सद्गृहस्थ होते.

दादा जनता जनार्दनावर निस्सीम प्रेम करीत. त्याची प्रचिती त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आल्यावाचून राहत नसे. दादांवर अलोट श्रद्धा असणार्‍या एका सांगलीच्या चित्रपट निर्मात्यानं त्यांना आपल्या चित्रपटात छोटीशी भूमिका करण्याचा आग्रह केला. पंढरीच्या मंदिरात विठ्ठलाची पूजा करताना दादांना त्याला दाखवायचं होतं. त्यावेळी दादा मुख्यमंत्री होते, तरीही दादांनी त्या निर्मात्याच्या प्रेमापोटी त्याची विनंती मान्य केली आणि ते पंढरपूरला गेले! इतकेच नव्हे, तर स्वतःला वारकर्‍याची वेशभूषा आणि रंगभूषाही करून घेतली आणि मुख्यमंत्री असतानाही क्षणभर मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला काढून ठेवून, त्यांनी त्या निर्मात्याची इच्छा पुरी केली. आजही 'पंढरीची वारी' या चित्रपटातील क्लायमॅक्सच्या द़ृश्यात दादांचं विठ्ठलाची पूजा करणार्‍या वारकर्‍यांच्या वेशात दर्शन होतं. दादांनी आयुष्यभर असाच प्रत्येकाशी मनस्वी जिव्हाळा सांभाळला.

आबांचं आणि दादांचं असंच जिव्हाळ्याचं नातं. ते नातं तसंच त्यांनी माझ्याशीही ठेवलं. ते माझ्याशी घरच्याच माणसाशी बोलल्यासारखं मनमोकळेपणानं बोलत असत. गप्पा मारीत. मी काही प्रश्न मांडले किंवा कल्पना मांडली, तर ते उत्सुकतेनं ऐकत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. मोठी माणसं मोठी का होतात, याची सुंदर व्याख्या महात्मा गांधींनीच केलेली आहे.

'इन्सान महान पैदा नहीं होता है, उसके विचार उसे महान बनाते है। विचार और काम की शुद्धता और सरलताही महान लोगों को आम लोगों से अलग करती है। वे वही काम करते हैं, जो दुसरे करते हैं, लेकिन उनका मकसद समाज में बदलाव लाना होता है।'

महात्माजींचे हे विचार वसंतदादांना तंतोतंत लागू पडतात. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात दादांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल, यात शंकाच नाही. वसंतदादांचं एकाच वाक्यात वर्णन करायचं झालं, तर फार न शिकलेला महाराष्ट्राचा 'शहाणा माणूस' असंच करावं लागेल.

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news