सिंहायन आत्मचरित्र पंतप्रधानांसमवेत त्रिदेश दौरा (भाग २) …

रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या समवेत पंतप्रधान राजीव गांधी.
रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या समवेत पंतप्रधान राजीव गांधी.
Published on
Updated on

पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्‍त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्‍नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

फ्रान्सनंतर रशिया! 15 जुलैच्या सकाळी आमच्या 'कृष्ण देवराय'नं आकाशात झेप घेतली, ती लाल तार्‍याच्या दिशेनंच! आम्ही मॉस्कोकडे उड्डाण केलं होतं!

पॅरिस ते मॉस्को हा आमचा प्रवास जेमतेम साडेतीन तासांचा. समानता आणि बंधुभावाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या देशातून आम्ही जगाला समाजवादी समाजरचना कार्यप्रणाली याचं दर्शन घडवणार्‍या लेनिन, स्टॅलिन यांच्या देशाकडे चाललो होतो. पॅरिसमध्ये आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीच्या द्विशताब्दी सोहळ्याचं दर्शन घेतलं होतं, तर आता आम्हाला हुरहूर होती ती रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह प्रणीत 'पेरिस्त्रोईका'च्या रूपानं होत असलेल्या सामाजिक क्रांतीची. फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला नव्या शक्‍तीची पहाट दाखवली, तर रशियातील ऑक्टोबर क्रांतीनं उगवल्या सूर्याची किरणं कुठंवर पोहोचू शकतात, याचं दर्शन जगाला घडवलं होतं.

भारतीय नेते आणि इथं होणार्‍या विविध सामाजिक आणि राजकीय चळवळींवर रशियाचा नेहमीच मोठा प्रभाव राहिलेला आहे. शिवाय भारत आणि रशियाचे मैत्रीसंबंध जगविख्यात! साहजिकच त्यामुळे रशियाबाबत मला कमालीचं आकर्षण होतं.

पॅरिस ते मॉस्को या विमान प्रवासादरम्यान विमानातील एकेका संपादकाला बोलावून राजीवजी त्यांच्याशी गप्पा मारीत असत. दिल्‍ली ते पॅरिस प्रवासातही त्यांनी असाच काही संपादकांशी संवाद साधला होता. पॅरिसहून विमानानं उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला नाष्टा देण्यात आला आणि त्याचवेळी राजीवजींनी मला बोलावल्याचा निरोप सचिवांनी दिला.

मी लगेचच राजीवजींच्या खास केबिनमध्ये गेलो. त्यांनी उठून माझ्याशी हस्तांदोलन केलं आणि मला बसायला सांगितलं. अवघ्या पंधरा-वीस मिनिटांच्या चर्चेतच त्यांनी माझ्याकडून महाराष्ट्रासमोरील प्रश्‍न आणि राजकारणाविषयी प्रदीर्घ माहिती घेतली. तसेच आस्थेवाईकपणे माझी कौटुंबिक माहितीही विचारली. त्या क्षणी राजीवजी मला अगदी घरच्यासारखेच वाटले. लोकांना आपलंसं करण्याची एक फार मोठी किमया त्यांच्याकडे होती. नंतर मी माझ्या सीटवर परत येऊन बसलो.

फ्रान्समध्ये राजीवजींची धावपळ मी पाहिली होती. विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी विविध विषयांवर आणि विविध समस्यांवर चर्चा करताना मी त्यांना पाहिलं होतं.साहजिकच त्याचा ताण त्यांच्यावर येत असणार, असा माझा होरा होता. परंतु, हा माणूस नेहमीच हसत-खेळत असायचा. ताण कसला असतो, हे जणू त्यांच्या गावीही नसायचं! हे कसं काय, असा प्रश्‍न मला पडला होता. परंतु, त्यांच्या सहवासात मला त्याचंही उत्तर मिळालं. राजीवजींच्याकडे जबरदस्त आत्मविश्‍वास होता. त्यांचं मन मोकळं होतं. स्वभाव निरागस होता आणि बोलणंही एकदम मिठ्ठास होतं.

त्यांच्या सहवासात जे कुणी यायचं, ते त्यांच्या या गुणांनी भारून जायचे. त्यांच्या सहवासात क्षणभरातच एक अकृत्रिम आंतरिक जवळीक निर्माण व्हायची. वातावरण अगदी स्वच्छ, खुलं आणि निर्मळ होऊन जायचं. त्यामुळेच पॅरिसमध्ये विविध देशांतील नेत्यांच्या भाऊगर्दीत ते सर्वांचे आकर्षण ठरले होते. चित्ताकर्षक व्यक्‍तिमत्त्व ज्याला म्हणता येईल, अशा अत्यंत दुर्मीळ व्यक्‍तिमत्त्वाचे राजीवजी होते. केवळ व्यक्‍तिमत्त्वाशीच तुलना करायची झाली, तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्याशी करता येईल. अर्थात, राजीवजी हे केनेडींंहून फारच वेगळे होते. शीलवान, चारित्र्यसंपन्‍न आणि सुसंस्कृत व्यक्‍तिमत्त्व म्हणून राजीवजींचं नाव केनेडींच्या खूप खूप आधी घ्यावं लागेल!

आणि म्हणूनच युवा पिढीचे चतुर प्रतिनिधी तसेच विकसनशील देशांचे खंदे प्रवक्‍ते अशी त्यांची फ्रान्सच्या उत्सवात प्रतिमा तयार झाली होती. 'हिरो इज अलवेज हिरो' या सुप्रसिद्ध इटालियन तत्त्ववेत्ता अंबर्टो इको यांच्या उक्‍तीप्रमाणे राजीवजींचा प्रभाव फ्रान्सच्या दौर्‍यात सर्वत्र व्यापून राहिला होता.

साडेतीन तासांच्या प्रवासानंतर आमचं 'कृष्ण देवराय' मॉस्कोच्या धावपट्टीवर लँड झालं. या सार्‍या प्रवासात राजीवजी प्रसन्‍न मुद्रेनं वावरत होेते. पॅरिसमधील दगदगीचा कसलाही ताण त्यांना जाणवल्याचं दिसत नव्हतं. मॉस्को विमानतळावर रशियाचे परराष्ट्रमंत्री शेवर्दनात्झे यांनी राजीवजींचं हार्दिक स्वागत केलं.

'रशिया' या नावाशी साधर्म्य सांगणारं, 'रोशिया' हे मॉस्कोतील आलिशान हॉटेल. आम्हा संपादकांची व्यवस्था याच 'रोशिया'मध्ये करण्यात आलेली. विशेष म्हणजे जगातील हे सर्वात भव्य हॉटेल. तीन भागांत विभागलेल्या या हॉटेलची एक फेरी पूर्ण करणं म्हणजे एखाद्या गावालाच प्रदक्षिणा घातल्यासारखं! त्यावेळी रशियामध्ये मोठ्या प्रमाणात धु्रवीकरण सुरू होतं. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडाही दिसत होता. रेशन दुकानांसमोर आणि ब्रेडसाठी बेकरीसमोर लोकांच्या लागलेल्या रांगा बरंच काही बोलून जात होत्या!

माझं लक्ष लागून राहिलं होतं, ते राजीवजी आणि गोर्बाचेव्ह यांच्यामध्ये होणार्‍या नियोजित शिखर परिषदेकडे. ही शिखर परिषद क्रेमलिनमध्ये संपन्‍न होणार होती. रशियात सत्तर वर्षांपूर्वी झारशाही उलथून ऑक्टोबर क्रांती झाली. साम्यवादी राजवट आली. मात्र, आता गोर्बाचेव्ह यांनी साम्यवादी चौकट शिथिल करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यांचा 'पेरिस्त्रोईका' हा शब्द चर्चेचा बनला होता. 'पेरिस्त्रोईका' म्हणजे सुधारणा. या पार्श्‍वभूमीवर के्रमलिनच्या शिखर परिषदेकडे आम्हा सार्‍यांचं लक्ष लागून राहिलं होतं.

राजीवजी आणि गोर्बाचेव्ह यांची ही गेल्या चार वर्षांतील आठवी भेट. या शिखर परिषदेत प्रामुख्यानं भारत, रशिया आणि चीन असा संयुक्‍त मैत्री संघ निर्माण करण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली. त्याद‍ृष्टीनं राजीवजींनी आधीच चीनशी संवाद चालू केला होता. त्याचं गोर्बाचेव्ह यांनी मनापासून स्वागत केलं.

बड्या श्रीमंत राष्ट्रांची जी-7 ही संघटना दादागिरी करते. जागतिक अर्थकारण मुठीत ठेवायला बघते. यावर विकसित आणि विकसनशील देशांची संयुक्‍त शिखर परिषद घेण्याचा विचार राजीवजींनी फ्रान्समध्ये मांडला होता. राजीवजींच्या या कल्पनेचं मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी तोंड भरून कौतुक केलं. त्यावेळी ते म्हणाले,

'ॠशपशीरश्रश्रू र्ूेीी ेलीर्शीींरींळेपी रीश लेपीळीींशपीं ुळींह ाश.' (सामान्यतः आपली निरीक्षणं ही माझ्या निरीक्षणांशी सुसंगत अशीच आहेत.)

बड्या विकसित आणि विकसनशील राष्ट्रांची एखादी संयुक्‍त परिषद घेता येईल का, याविषयी राजीवजी आणि गोर्बाचेव्ह यांच्या चर्चेत चाचपणी करण्यात आली. श्रीलंकेत तेव्हा भारतीय शांतिसेना होती. त्याविरोधात श्रीलंकेचे अध्यक्ष प्रेमदासा यांनी कमालीचा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यासंदर्भात गोर्बाचेव्ह यांनी भारताची पाठराखण करण्याची भूमिका घेतली.

राजीवजी आणि गोर्बाचेव्ह यांच्यामध्ये झालेली शिखर परिषद तब्बल 3 तास 40 मिनिटे चालली. या परिषदेमध्ये उभय देशांतील व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढीवर आवर्जून भर देण्यात आला. नजीकच्या काळात उभय देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान स्तरावरही भरीव सहकार्य आणि वृद्धी करण्याचं ठरवण्यात आलं. विविध क्षेत्रांत संयुक्‍त प्रकल्पांची उभारणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला. उभय देशांतील उच्चाधिकार शिष्टमंडळांनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे 80 संयुक्‍त प्रकल्पांचा आराखडा पक्‍का केला. अशा तर्‍हेनं क्रेमलिन परिषद यशस्वी झाली. भारत आणि रशिया यांच्यातील ऐतिहासिक मैत्री संबंधाला आणखी एक मात्रेचा वळसा मिळाला.

फ्रान्स आणि रशिया दौर्‍यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की रशियासारख्या बलाढ्य शक्‍तीला आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न विकसित राष्ट्रं करीत होती. मात्र, एकंदरीतच गोर्बाचेव्ह यांचा आविर्भाव पाहता, विकसित राष्ट्रांना त्यात यश येणार नव्हतं. यावेळी माझ्या नजरेत आणखी एक गोष्ट आली. ती म्हणजे, भारत आणि चीनमध्ये स्नेहसंबंध निर्माण व्हावेत, असं रशियाला मनापासून वाटत होतं. त्यात त्यांना अधिक स्वारस्य होतं. त्यामुळेच राजीव गांधी यांनी बीजिंगला भेट दिली, तेव्हा गोर्बाचेव्ह या घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून होते.

भारत आणि चीन यांच्यामधील सर्वात मोठा वादाचा मुद्दा म्हणजे सीमाप्रश्‍न. मात्र, दोन्ही देशांनी सरहद्दीवर तणाव उद्भवू नये याची ग्वाही दिल्याने, हा प्रश्‍न मैत्री संबंधातील धोंड ठरेल, असं वाटत नव्हतं. साहजिकच भारत आणि चीन यांच्यातील या विधायक परिवर्तनाबद्दल गोर्बाचेव्ह यांनी राजीवजींचं स्वागत केलं. भारत, चीन आणि रशिया हे विशाल लोकसंख्येचे देश. त्यामुळे त्यांचे म्हणून काही समान असे वेगळे प्रश्‍न आहेत. शिवाय सद्यपरिस्थितीचा विचार करता जगातील प्रबळ आणि विकसित भांडवलशाही देश अविकसनशील देशांचं पद्धतशीरपणे शोषणच करीत आहेत.

अविकसनशील देशांच्या विकासाच्या नावाखाली त्यांना आपला दरारा कायम ठेवायचा आहे. त्यांना एक महासत्ता म्हणून उदयाला यायचं आहे, हे पॅरिसमधील जी-7 गटाच्या परिषदेमुळे अधिकच स्पष्ट झालं होतं. त्याची कल्पना जशी भारताला होती, तशीच ती रशिया आणि जगभरातील लहान-मोठ्या अविकसित राष्ट्रांनाही होती. विशेष म्हणजे याबाबतीतही राजीव गांधी आणि गोर्बाचेव्ह यांच्या शिखर परिषदेत सखोल चर्चा झाली.

याशिवाय रशिया-भारत-चीन यांनी संयुक्‍त क्षेत्रात प्रकल्प उभारावेत, असाही प्रस्तावात एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला. असं काही झालं तर जागतिक अर्थकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होतील, हेही तितकंच खरं होतं.

मॉस्को शहरात प्रचंड थंडी होती. आम्हाला गरम कपडे वापरण्यावाचून पर्याय नव्हता. फुरसतीच्या वेळात मी मॉस्कोचा फेरफटका मारला. इथले रस्ते तसे साधारणच होते. इथल्या मेट्रो मात्र कार्यक्षम असल्याचं दिसून आलं. रेशनसाठी लागलेल्या रांगा पाहून मला आश्‍चर्य वाटले.

पाच हेक्टर परिसरातील क्रेमलिनच्या ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा योग आला. या वस्तूंवर रशियन आणि इटालियन शैलींचा प्रभाव दिसतो. इथल्या लाल विटांच्या भिंती, उंच मनोरे आणि प्रचंड घंटा, बुरुज पाहून मन थक्‍क होऊन जातं. ऐतिहासिक लाल चौक आणि लेनिनची समाधीही पाहिली. मॉस्कोचं स्वरूप हे एखाद्या नदी बंदरासारखं आहे. मस्कव्हा ही आंक आणि व्होल्गा या दोन नद्यांची उपनदी.
मॉस्कोमध्ये मला खटकलेली बाब म्हणजे, इथले रस्ते जुनाट होते. इथली टापटीपही यथातथाच दिसली. पॅरिसचं सौंदर्य पाहून आलेल्या मनाला मॉस्को फारच खटकत होतं. मी मॉस्को विद्यापीठाबद्दल खूप ऐकलेलं होतं. साहजिकच ते पाहण्याची तीव्र इच्छा मनात होती. वेळात वेळ काढून मी मॉस्को विद्यापीठात पोहोचलो. जागतिक स्तरावरचं महत्त्वाचं आणि डाव्या विचारसरणीनं भारलेलं हे भव्य विद्यापीठ डोळ्यात आणि मनातही साठवताना मी पुरता भारावून गेलो.

रशियन माणूस हा तसा मख्ख चेहर्‍याचा, कमी बोलणारा, हातचं राखून शब्द वापरणारा असं मी वाचलं होतं. मात्र, वस्तुस्थिती एकदम वेगळी असल्याचं इथं आल्यावरच कळलं. रशियन स्त्री-पुरुष धिप्पाड आणि दणकट. त्यांचे डोळेही स्वच्छ आणि वागणं प्रेमळ. भारताविषयी त्यांना जिव्हाळा असल्याचं मला जाणवलं. काही लोकांनी तर मला राज कपूरविषयी आस्थेवाईकपणे विचारलं. एका भारतीय कलाकाराचं रशियन नागरिकांवर गारुड असणं, ही अभिमानाचीच गोष्ट होती. रशियन नागरिक असो वा तिथला राजकारणी, त्यांच्या डोळ्यात भारताविषयी मला आपुलकी आणि सच्च्या भावनाच आढळल्या. एक वेळ चेहरा गंभीर करता येतो, पण माणसाला डोळ्यातले भाव बदलता येत नाहीत आणि रशियन माणसांच्या डोळ्यात तर भारतीयांबद्दल अपार स्नेह दाटून राहिला होता. या भेटीत रशियन माणसांविषयीच्या माझ्या गैरसमजाचं निराकरण झालं. रशियन आहार मात्र कच्चा आणि उकडलेलाच असल्याचं दिसून आलं.
विशेष म्हणजे रशियन लोकांनाही भारताबद्दल माहिती होती. प्राचीन रशियन वाङ्मयात भारताचं वर्णन एक दंतकथामय भूमी असं करण्यात आलं असल्याचं मला मॉस्कोतील मार्गदर्शकानं सांगितलं. त्या काळी रशियन वाङ्मयात भारताचं वर्णन साधू-तपस्व्यांचा देश असं करण्यात येत असे. प्राचीन रशियात गौतम बुद्धांविषयीची गाणी आणि दंतकथाही लोकप्रिय होत्या. इवान मिनामेव हा एक रशियन विद्वान होता. त्यानं आपल्या वेरूळच्या लेण्यांची भव्यता आणि सुंदरता नमूद करून ठेवलेली आहे. त्यावेळी त्यानं लिहून ठेवलंय, "आम्हाला आशिया जवळचा आहे. आशियामुळे रशियाची आठवण होते. मात्र, रोममुळे बिलकुल नाही."

मॉस्कोत क्रेमलिन इथं सर्वात मोठं वस्तुसंग्रहालय आहे. तिथं जडजवाहिरांचे अत्यंत सुंदर आणि अँटिक नमुने आहेत. इथं मूर्ती, धुपारती, ख्रिस्ती धर्मदंड आणि बिशपचा मुकुट पाहण्यासारखा आहे.

इकडे शिखर परिषदेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि त्रिदेश दौर्‍याच्या तिसर्‍या म्हणजे अंतिम टप्प्याचे वेध लागले. मात्र, रशिया सोडताना रशिया हा भारताचा मित्र आहे, याची जाणीव मनाला सातत्यानं होत राहिली. हे मैत्रिपूर्ण संबंध इंदिराजींनी त्यांच्या कारकिर्दीत निर्माण केले, हे विसरून चालणार नाही. जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका भारताला दुय्यम स्थान देऊ लागली, तेव्हा इंदिराजींनी रशियाशी जवळीक साधली होती आणि त्याचे कितीतरी चांगले परिणाम आजही आपल्याला पाहायला मिळतात. पुढे अमेरिकेशी भारताचे संबंध सुधारले; किंबहुना अमेरिकेला ते सुधारून घ्यावे लागले, तरीही रशियाच्या मैत्रीत कुठेही बाधा आलेली दिसली नाही. परंतु, त्यावेळी मात्र इंदिराजींवर रशियाधार्जिणी म्हणून आपल्याच देशातील विरोधकांनी टीका केली होती!

"इंदिराजी आयी है, रूस की रोशनी लायी है" हा त्यावेळी विरोधकांचा एकमेव नारा होता. विरोधासाठी विरोध करीत असताना त्याचे दुष्परिणाम आपल्या देशाच्या आंतरराष्ट्रीय हितसंबंधावर होत असतात. निदान याचं भान तरी विरोधकांनी ठेवणं आवश्यक असतं. एखाद्या देशाची लोकशाही विशाल असली, तरी ती प्रगल्भ असेलच असं नाही, हेच खरं!

16 जुलैला सकाळी आमच्या 'कृष्ण देवराय'नं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे उड्डाण केलं. रशिया ते पाकिस्तान, पाच तासांचा प्रवास. बघता बघता पाच तास निघून गेले आणि 'कृष्ण देवराय' पाकिस्तानच्या चकलाला विमानतळावर दाखल झालं. पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवताना एक वेगळीच भावना मनाला चटका लावून जात होती.

'पंजाब, सिंध, गुजरात, मराठा' अशा राष्ट्रगीताच्या काव्यपंक्‍ती लिहिणार्‍या रवींद्रनाथांच्या स्वप्नातील अखंड भारताच्या सिंध भूमीवर पाय ठेवताना, ते स्वप्न भंग पावल्याची जाणीव मनाला डाचत होती. आपण नाईलाजानं दुसर्‍याला दिलेल्या राहत्या घरात, बराच काळ लोटल्यानंतर, पुन्हा पाऊल ठेवल्यावर ज्या भावना उचंबळून येतील, तशीच आमची मानसिक अवस्था पाकच्या भूमीवर पाऊल ठेवताना झाली होती.

मात्र, पाकिस्तानमध्ये राजीव गांधी यांच्या स्वागताची जय्यत तयारी दिसली. त्यांच्या स्वागताचे भव्य फलक सगळीकडे झळकत होते. खुद्द पंतप्रधान बेनझीर भुट्टो आपल्या सहकार्‍यांसमवेत स्वागतासाठी उपस्थित होत्या. राजीवजी आणि बेनझीर भुट्टो दोघेही तरुण! अर्थात, राजीवजी काकणभर अधिक असले, तरी दोघांचंही व्यक्‍तिमत्त्व तसं भारदस्तच. दोघांच्याही व्यक्‍तिमत्त्वात तरुणाईचा सळसळता उत्साह जाणवत होता. या भेटीतील नजाकत काही औरच होती. 'सलाम आलेकुम' म्हणत बेनझीरनी राजीवजी आणि सोनियांचं हार्दिक स्वागत केलं. त्यावेळी 19 तोफांची सलामीही देण्यात आली. स्वागत समारंभही जंगी झाला.

पाकिस्तान लष्करशाहीच्या जोखडातून मुक्‍त झाल्याची खूण पटली. लोकशाही रुजत असल्याची जाणीव झाली. जनरल झियांच्या निधनानंतर पाकिस्तानात निवडणुका झाल्या होत्या. या देशात दीर्घकाळ लष्करशाहीनं आपल्या पोलादी पंजानं जनतेला एकअर्थी गुलामगिरीत लोटलेलं होतं. या पार्श्‍वभूमीवर भुट्टोंच्या पीपल्स पार्टीनं निवडणुकीत यश मिळवलं. लोकशाहीचा पुनर्जन्म झाला आणि वृत्तपत्र, दूरचित्रवाणी, रेडिओ यांसारख्या माध्यमांनी मोकळा श्‍वास घेतला. जनतेला व्यक्‍त होण्याचा अधिकार मिळाला.

साहजिकच राजीव गांधी यांच्या भेटीला वृत्तपत्रांसह सर्वच माध्यमांनी ठळक प्रसिद्धी दिली होती. 'द पाकिस्तान टाइम्स' हे इथलं सर्वाधिक खपाचं दैनिक. त्यात राजीवजींच्या भेटीवर खास लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. भारत-पाकिस्तान संबंधात काहीतरी नवीन परिवर्तन घडेल, अशा प्रकारचं वातावरण तरी भासत होतं.

दुपारी राजीव गांधी आणि पाकिस्तानचे अध्यक्ष गुलाम इशाक खान यांच्यात औपचारिक चर्चा झाली. त्या चर्चेदरम्यान खान यांनी भीती व्यक्‍त केली, की "भारत विभागीय वर्चस्व गाजवू पाहात आहे, असं म्हटलं जातं. तसा समज पसरला आहे. तो दूर करण्यासाठी पावलं टाकली पाहिजेत."

मात्र, राजीव गांधी हे कमालीचे हजरजबाबी. त्यांनी तत्काळ खान यांना उत्तर दिलं, "पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचा भारत आदर करतो. त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याची भारताची इच्छा नाही."
राजीवजींच्या या सडेतोड उत्तरानं खान चूप झाले.

राजीव गांधी आणि खान यांच्या भेटीनंतर माझ्याकडे बर्‍यापैकी मोकळा वेळ होता. त्या वेळेत मी इस्लामाबादची सफर करायचं ठरवलं. 1970 पर्यंत रावळपिंडी ही पाकिस्तानची राजधानी होती. रावळपिंडी हे तसं ऐतिहासिक शहर. पूर्वी हिंदुस्थानवर परकीयांची अनेक आक्रमणं झाली. त्यामध्ये रावळपिंडीचं भौगोलिक स्थान महत्त्वाचं होतं. अनेक आक्रमणांना तोंड देता देता इथं घडलेले सामाजिक आणि सांस्कृतिक बदलही महत्त्वाचे होते. मात्र, असं असलं तरी पूर्वापार चालत आलेल्या नगरांसारखेच रावळपिंडी हेही जुन्या धाटणीचं

शहर होतं. अरुंद रस्ते, गल्ल्या, यथातथाच नगररचना अशा स्वरूपात इतिहासाच्या खुणा अंगाखांद्यावर खेळवत हे शहर उभं होतं.
साहजिकच पाकिस्तानी राजवटीनं नवी दिल्‍लीप्रमाणेच आखीव-रेखीव, देखणे शहर उभारून तिथं राजधानी करावी, असं ठरवलं. हे काम एका ग्रीक फर्मकडे सोपवण्यात आलं. त्यांनी इस्लामाबादचा आराखडा बनवला. अध्यक्षीय प्रासाद, संसद भवन, सरकारी कार्यालयं अशा भव्य इमारती, प्रशस्त रस्ते, दुतर्फा हिरवीगार झाडी यामुळे हे शहर डौलदार आणि आकर्षक झालं होतं. इथं पन्‍नास एकरांमध्ये एक प्रशस्त गुलाबाचं उद्यान आहे. ते मी मुद्दाम जाऊन पाहिलं. छान वाटलं.

इस्लामाबादमधील 'शाह फैजल' ही अतिभव्य मस्जिद पाहायला पर्यटकांची गर्दी होते. ही मस्जिदही पन्‍नास एकर जागेत बांधण्यात आलेली आहे. तिच्या प्रांगणातच इस्लामी विद्यापीठ उभं आहे. शिवाय 'दामन ई कोह' या डोंगराईतील उद्यानालाही मी धावती भेट दिली. लोककलेची जपणूक करणारं, 'लोक वारसा केंद्र', 'कलादालन' यातून पारंपरिक संस्कृतीचं जतन केल्याचं दिसून आलं. अनेक बाबतीत भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांच्या वागण्यातील साम्य दिसून आलं. इथंही एस.टी.च्या टपावर बसून लोक प्रवास करताना दिसले.

मी हाडाचा संपादक. माझ्या नसानसांत पत्रकारिता ठासून भरलेली. मग माझं लक्ष पाकिस्तानी वृत्तपत्रांकडे न जाईल, तरच नवल! मी मुद्दामच पाकिस्तानातील प्रमुख इंग्रजी आणि उर्दू वृत्तपत्रांच्या कार्यालयांना भेट दिली.त्यांची वृत्तपत्रं डोळ्याखालून घातली. त्यात मोठ्या प्रमाणात मतमतांतरं दिसून आली. भारतातील वृत्तपत्रांपेक्षा पाकिस्तानी वृत्तपत्रे किमतीत महाग असल्याचं माझ्या लक्षात आलं. बॅ. जिना यांनी स्थापन केलेल्या 'द पाकिस्तानी टाइम्स'ची पानं दहा होती; पण त्याची किंमत मात्र अडीच रुपये होती. तेवढ्याच पानांच्या भारतीय वृत्तपत्रांची किंमत त्या काळी फक्‍त सव्वा रुपया असायची. मला किमतीतल्या या तफावतीचं खूपच आश्‍चर्य वाटलं.

राजीव गांधी यांच्या सन्मानार्थ बेनझीर भुट्टो यांनी रात्री खास मेजवानी आयोजित केली. त्यावेळी दोन्हीही नेत्यांनी आपल्या भाषणातून दोन्ही देशांत मैत्री संबंध निर्माण व्हावेत, यावर भर दिला. यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांसह उभय नेत्यांनी तब्बल पावणेतीन तास चर्चा केली. त्यानंतरही दोन्ही नेत्यांनी सहायकाशिवाय सव्वा तास चर्चा केली.

या चर्चेमध्ये सियाचीन हा कळीचा मुद्दा होता. झियांच्या कारकिर्दीत पाकिस्तानी लष्करानं या उत्तुंग भूमीवर आक्रमणाचा प्रयत्न केला होता. या संवेदनशील प्रश्‍नावर अधिक चर्चा आणि लष्करी अधिकार्‍यांच्या पातळीवर सविस्तर वाटाघाटी करण्याचा निर्णय झाला. तसेच दोन्ही देशांच्या जनतेमध्येही स्नेहसंबंध स्थापन करण्यावर एकमत झालं. बेनझीर भुट्टो यांनी राजीवजींच्या सन्मानार्थ दिलेल्या मेजवानीवर तेथील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बहिष्कार घातला. एक तर पाकिस्तानच्या राजगादीवर प्रथमच बेनझीर भुट्टोंच्या रूपानं एक महिला विराजमान झाल्या होत्या. त्याचा राग या पुरुष संस्कृतीत वाढलेल्या नेत्यांना होता आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भारताबाबत असलेला त्यांचा कलूषित द‍ृष्टिकोन! नवाझ शरीफ हे तेव्हा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. ते बेनझीर यांचे प्रमुख स्पर्धक मानले जात. त्यांनाही मेजवानीचं निमंत्रण होतं. मात्र, मेजवानीला दांडी मारता यावी, म्हणून त्यांनी हज यात्रेचा बहाणा शोधून काढला. वरिष्ठ राजनीतिज्ञ वाबझादा नसरुल्‍ला खान तसेच संसदेतील संयुक्‍त विरोधी पक्षनेते गुलाम मुस्तफा जटोई या नेत्यांनी निमंत्रण मिळूनही त्यांनी मेजवानीकडे पाठ फिरवली. सयेदा अबीदा हुसेन हे नॅशनल असेम्ब्लीचे एक सदस्य. राजीवजींच्या पाकभेटीवर त्यांनी मारलेला शेरा अजबच होता. ते म्हणाले, 'पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1960 मध्ये पाकिस्तानला भेट दिली आणि जाताना आमच्या दोन नद्या घेऊन गेले!'

या अजब शेर्‍यामागचं वास्तव वेगळंच होतं. भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये जो 'इंडस' पाणीवाटप करार झाला होता, त्याला अनुलक्षून हे विधान होतं. हा करार 1960 साली नेहरू आणि अयुब खान यांच्यामध्ये झाला. या करारानुसार भारताला रावी नि सतलज या नद्यांचं पाणी वापरण्याची मुभा मिळाली.

हा संदर्भ देऊन हुसेन पुढे म्हणाले, "आता जवाहरलाल यांचे नातू इथे आलेले आहेत. कोणी सांगावं, ते जाताना काय घेऊन जातील ते!"
यालाच रडीचा डाव खेळणं असं म्हणतात.

इस्लामाबादहून मायदेशी रवाना होण्याची वेळ आली तरीही राजीवजी आणि बेनझीर यांच्यातील अनियोजित चर्चा चालूच होती. ती संपल्यानंतर दोन्ही नेत्यांची संयुक्‍त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये दोघांनीही दिलखुलास उत्तरं दिली. तरीही राजीवजींचा हजरजबाबीपणा उठून दिसत होता.

एका प्रश्‍नाचं उत्तर देताना राजीवजी म्हणाले, "भारताचा अणुकार्यक्रम संसदेला बांधिल आहे. पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमावर लष्कराचं वर्चस्व आहे."

राजीवजींच्या या टिपणीवर पाकिस्तानी पत्रकार गडबडले. त्यावर, "आता तसं नाही. आता लष्कराचं नियंत्रण नाही," असा खुलासा करीत बेनझीर भुट्टो यांनी सावरून घेण्याचा प्रयत्न केला.

अणुकार्यक्रमासह अन्य काही बाबींवर चकमक झाली खरी; पण त्यात कटुता मुळीच नव्हती. एका पत्रकारानं राजीवजींना थेट प्रश्‍न केला, की "तुम्ही संरक्षणावर एवढा खर्च का करता?"

त्यावर राजीवजी पटकन उतरले, "भारताचा संरक्षण खर्च फक्‍त चार टक्के आहे. याउलट पाकिस्तानचा आठ टक्के आहे."

राजीवजींच्या सडेतोड आणि वस्तुस्थिती विशद करणार्‍या उत्तरानं तो पत्रकार निरुत्तर झाला. अनेक प्रश्‍नांवर बेनझीर भुट्टो आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना माहिती विचारत आणि मगच उत्तर देत. परंतु, राजीवजींनी मात्र स्वतःच सारी उत्तरं दिली. त्यांना परराष्ट्र मंत्र्यांच्या मदतीची मुळीच गरज भासली नाही. अगोदरच भारदस्त व्यक्‍तिमत्त्व, उत्साहानं भरलेलं. शिवाय प्रश्‍नांची अभ्यासपूर्ण उत्तर दिल्यामुळे संयुक्‍त पत्रकार परिषदेचे ते 'हिरो' न ठरतील तरच नवल!

या दौर्‍यामध्ये पाकिस्तानसोबत कोणतेही करार-मदार झाले नाहीत. तरीही दोन देशांमध्ये ताणलेले संबंध कमी होण्यास नक्‍कीच मदत झाली. भारत-पाकिस्तानमध्ये 'सियाचीन' हा एक कळीचा मुद्दा आहे. या प्रश्‍नावर राजीवजी आणि बेनझीर भुट्टो यांच्यामध्ये चर्चा होऊन तोडगा काढण्याचं ठरवण्यात आलं. त्यासाठी लवकरच दोन्ही देशांच्या लष्कर प्रमुखांमध्ये चर्चा होईल, असं स्पष्ट करण्यात आलं.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर जवळजवळ तीस वर्षांनी पाकिस्तानला भेट देणारे राजीव गांधी हे पहिलेच पंतप्रधान होते. त्यांच्या भेटीनं दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावात सैलपणा आला, हेही तितकेच खरं. या भेटीत राजीवजींनी बेनझीर भुट्टोंना भारत भेटीचं निमंत्रण दिलं. ते त्यांनी स्वीकारलं.

या भेटीनं दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याला प्रारंभ होईल, अशी आशा बाळगतच 'कृष्ण देवराय'नं नवी दिल्‍लीकडे झेप घेतली. तब्बल बारा दिवसांच्या या त्रिदेश दौर्‍यात मी तीन भिन्‍न राजवटी, तीन वेगवेगळ्या संस्कृती आणि तीन समाजांचं डोळस अवलोकन केलं. कितीतरी नवं पाहिलं. ज्ञानाच्या कक्षा रुंदावून द‍ृष्टी विशाल होण्यासाठी त्याची मदत झाली. आपण ऐकतो, वाचतो ते परराष्ट्र धोरण आणि पडद्यामागचं धोरण यामध्ये जमीन-अस्मानचं अंतर असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. साहजिकच त्रिदेश दौरा माझ्यासाठी एक समृद्ध करणारी अनमोल अनुभूती होती, यात शंकाच नाही.

राजीव गांधी यांच्या समवेतच्या त्रिदेश दौर्‍यात माझी त्यांच्याशी जवळीक वाढली. विमान प्रवासातही त्यांनी माझ्याशी अनेक गोष्टींवर अनेकदा चर्चा केली. पुढे भारतात परतल्यानंतरही मी जेव्हा जेव्हा दिल्‍लीला जात असे, तेव्हा तेव्हा मी त्यांना आवर्जून भेटत असे. असं भेटताना घरच्याच एखाद्या आपल्या प्रिय माणसाशी भेटल्याचा आनंद मला होत असे आणि त्यांनीही ती आपुलकीची भावना अखेरपर्यंत जोपासली.

आमच्या भेटीत अनेक विषयांवर ते माझ्याशी बोलत. महाराष्ट्रातील राजकारणाची बारीकसारीक माहिती घेत. वेगवेगळे प्रश्‍नही जाणून, समजून घेत. राजकारणातील एखाद्या व्यक्‍तीनं त्यांना पुरवलेल्या माहितीपेक्षा माझ्यासारख्या एका पत्रकारानं दिलेली माहिती, त्यांना अधिक पारदर्शी आणि ऑथेंटिक वाटत असावी. त्यामुळेच माझं बोलणं ऐकून घेण्यात त्यांना अधिक रुची, अधिक स्वारस्य वाटत होतं. राजीवजींचं व्यक्‍तिमत्त्व अतिशय प्रभावी होतं. त्यांच्याकडे पाहताना, हा माणूस आयुष्यात कधीच खोटं बोलला नसावा, याची प्रचिती येत असे आणि म्हणूनच देशातील तरुण वर्गाला त्यांच्याविषयी खूप आकर्षण होतं. भारतातील नव्या दूरसंचार युगाचे ते उद‍्गाते होते. सॅम पित्रोदासारख्या आपल्या विश्‍वासातील व्यक्‍तीवर त्यांनी दूरसंचार क्रांतीची जबाबदारी सोपवली आणि पित्रोदांनी ती यशस्वीही करून दाखवली. या क्रांतीमुळेच भारतात नवतंत्रज्ञानाला चालना मिळाली, ही बाब नाकारता येणार नाही.

विन्स्टन चर्चिल यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, 'Courage is what it takes to stand up and speak, courage is also what it takes to sit down and listen.' (उभं राहून बोलण्यासाठीच धैर्य लागतं असं नाही; तर खाली बसून दुसर्‍याचं बोलणं शांतपणे ऐकून घ्यायलाही धैर्य लागतं.)

आणि राजीव गांधींची विचारसरणी याच पद्धतीत बसणारी होती आणि ती आपल्या अनुभवात भर टाकणारीच होती. राजीवजी लॅपटॉप वापरत असत आणि त्यामध्ये राजकीय आणि सामाजिक नोंदीबरोबरच अन्य माहिती नि विविध संदर्भही डाऊनलोड करून ठेवलेले असत. त्या काळात दुसरा कोणताही राजकीय नेता कॉम्प्युटरचा वापर करीत नव्हता. किंबहुना कॉम्प्युटर कशाशी खातात, हेही त्यांना ठाऊक नव्हतं, तेव्हा राजीवजी कॉम्प्युटर वापरत होते. त्यांच्या दूरद‍ृष्टीची ती साक्षच म्हणावी लागेल. ते कॉम्प्युटर क्रांतीचे महत्त्व जाणून होते आणि देशानं या क्रांतीला सामोरं जावं, यासाठी ते प्रयत्नशील होते.

देशाच्या सम्यक विकासाचा विचार करणारा आणि काळाच्या पुढे दहा पावलं चालणारा राजीव गांधी यांच्यासारखा नेता विरळाच! या माणसाला तितक्याच तोलामोलाचे सहकारी लाभले असते, तर आपल्या देशाचं आजचं चित्र काही वेगळंच दिसलं असतं. काँग्रेस पक्षात 'किचन कॅबिनेट'ची संस्कृती इंदिराजींच्यापासून उदयाला आली. त्यातून पक्षीय आणि प्रशासकीय पातळीवर सल्‍ले देणारे आतल्या गोटातले सल्‍लागार जन्माला आले. असो. एकूणच हा त्रिदेश दौरा माझ्या 'मर्मबंधातील ठेव' ठरला, यात संशय नाही.

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव
मुख्य संपादक, दैनिक पुढारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news