सिंहायन आत्मचरित्र : आई कुणा म्हणू मी? भाग 2

सिंहायन आत्मचरित्र : आई कुणा म्हणू मी? भाग 2
Published on
Updated on

पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी 'पुढारी'ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

आईबरोबरची माझी अटॅचमेंट वेगळीच होती. तिला काही झालं की, मी विलक्षण बेचैन व्हायचो. 1970 मध्ये एकाएकी तिला गुडघेदुखीचा त्रास होऊ लागला. म्हणून तिला महाद्वार रोडवरील डॉ. वि. ह. वझे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी माझा आतेभाऊ वसंतदादा घेऊन गेला. डॉक्टरांनी तिच्या पायाची तपासणी करून गुडघ्यात हायड्रोकॉर्टिझॉन हे इंजेक्शन दिलं.जे इंजेक्शन ऑपरेशन थिएटरमध्ये मोठ्या काळजीपूर्वक द्यायचं असतं, ते त्यांनी बाहेरच दिलं. त्याचा परिणाम आईच्या गुडघ्यात सेप्टीक होण्यात झाला. तिचा संपूर्ण पाय सुजला. वेदना असह्य झाल्या.

गुडघ्याचा सांधाच सुजला आणि कायमचा खराब होऊन बसला. एक अखंड यातनापर्व सुरू झालं. त्यानंतर तिला आम्ही आर्थोपेडिक सर्जन डॉ. धनंजय गुंडे यांच्याकडे नेलं. त्यांचे उपचार दीड महिना सुरू होते. त्यांनी तिला अँटिबायोटिक्सची ट्रिटमेंट दिली; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. गुडघ्याचं दुखणं काही कमी झालं नाही. मिरजेचे आर्थो सर्जन डोनाल्डसन यांना दाखवले. मग माझे मेहुणे डॉ. अनिल शिंदे यांनी मुंबईचे प्रख्यात ऑर्थोसर्जन डॉ. चौबळ यांना कोल्हापूरला आणून आईचा गुडघा त्यांना दाखवला. डॉ. चौबळांनी गुडघा तपासून, आईला मुंबईला घेऊन यायला सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही तिला मुंबईला घेऊन गेलो. तिला बाच्छा नर्सिंग होममध्ये अ‍ॅडमिट केलं. डॉ. चौबळ यांनी तिच्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं. ते यशस्वी झालं. त्यानंतर पायाची हालचाल व्यवस्थित व्हावी, तो नीट वाकवता यावा, यासाठी फिजिओथेरपी सुरू केली; पण दुर्दैव काही तिची पाठ सोडायला तयार नव्हते. तिच्या पायात आता रक्ताच्या गुठळ्या होऊ लागल्या. त्यासाठी मग डॉ. टी. पी. कुलकर्णी या सर्जनना दाखवलं. त्यांनी गुडघ्याची तपासणी करून फिजिओथेरपी बंद करण्याचा सल्ला दिला.

कारण फिजिओथेरपीमुळे रक्ताची गाठ हृदयाकडे जाऊन हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका होता. त्यामुळे पाय सरळ राहिला, तो वाकवता आला नाही तरी चालेल; पण फिजिओथेरपी नको, त्यांनी असं स्पष्टच सांगितलं. तेव्हापासून आईचा पाय सरळच राहिला. तो तिला गुडघ्यातून कधीच वाकवता आला नाही. एका वैद्यकीय गोष्टीमुळे अशी अवस्था झाली. अविश्रांत काम करणारा एक जीव जणू अपंग होऊन पडला. ती कायमची अधू झाली. हे दुःख मनाला पोखरत राहिलं, ते कायमचंच!

असं झालं तरी आईनं धीर सोडला नाही. काठीच्या आधारानं ती चालण्याचा प्रयत्न करीत राहिली. आपल्या दुखण्यावर मात करण्याचा तिचा प्रयत्न आम्हाला चकित करणाराच होता. घरातील सर्व कामे ती आवडीनं करीत असे. आपल्या हातचं मुलांना मिळालं पाहिजे अशी तिची धारण होती. पण तिची ही जिद्दही नियतीला बघवली नाही. 1977 मध्ये तिला अर्धांगवायूचा झटका आला! तिच्या मेंदूत एम्बॉलिझम झाल्यामुळे तिचा डावा हात आणि डावा पाय पॅरालाईज झाला. मुंबईत ती अक्काकडे असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. त्यावेळीही ती कामातच होती. चपात्या करीत असतानाच तिला झटका आला होता.

त्यावेळी मी मुंबईतच होतो. अक्काचा फोन येताच आम्ही धावत गेलो आणि तिला ताबडतोब 'बॉम्बे हॉस्पिटल'मध्ये दाखल केलं. सुप्रसिद्ध डॉ. सिंघल यांची ट्रिटमेंट सुरू झाली. वेळेवर उपचार चालू झाल्यामुळे तिचा जीव वाचला आणि मला माझी आई परत मिळाली. आईचा माझ्यावर आणि माझा आईवर फार जीव होता. आता 'बॉम्बे हॉस्पिटल'मध्ये आणि पायाच्यावेळी 'बाच्छा नर्सिंग होम'मध्ये तिला अ‍ॅडमिट केलं होतं. दोन्ही वेळी मी मुंबईतच होतो. तिच्या सेवेसाठी मी स्वतः जातीनं तिथं राहत होतो. गुडघ्याच्या ऑपरेशनच्या वेळी तिच्याजवळ माझा आतेभाऊ जयवंतदादा आणि आतेबहीण गयाताई हे दोघे राहत असत.

मी बाहेरून हॉस्पिटलमध्ये येत असे आणि माझ्या येण्याच्या वेळाही ठरलेल्या असत. मी येण्याआधी आई गयाताईकडून आपला चेहरा पुसून, स्वच्छ करून घ्यायची आणि आपण आनंदी आहोत, असं मला दाखवण्याचा प्रयत्न करायची. मला वाईट वाटू नये म्हणून आपल्या वेदना गिळून ती माझ्यासमोर खोटं खोटं चेहरा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायची. मला या गोष्टी जयवंतदादा आणि गयाताईकडून कळत असत. इतका प्रचंड त्रास होत असूनही ती आपलं दुःख कुणाला कळू नये, याची काळजी घ्यायची. खरोखरच माझी आई ही माझीच आई होती. मनानं तर ती आभाळाएवढी मोठी होती.

महिन्याभरात तिच्यात सुधारणा झाल्यावर तिला आम्ही अ‍ॅम्ब्युलन्सने कोल्हापूरला घेऊन आलो. दिवसा घरी नेलं, तर लोकांची गर्दी होईल म्हणून बाहेरच तासभर गाडी थांबवली आणि अंधार पडल्यावर तिला घरी आणलं. तिच्यासोबत मुंबईहून अक्काही आली होती. त्यावेळी माझी पत्नी गीता गर्भवती होती. आईला स्वतःच्या तब्येतीपेक्षा तिचीच चिंता लागून राहिली होती. योगायोग म्हणजे त्याच पहाटे योगेशचा जन्म झाला.

नंतरच्या काळातही आई घरात स्वस्थ पडून आहे, असं कधीच झालं नाही. तिचा पायांचा व्यायाम सुरूच असायचा. लसूण सोलण्यापासून ते ताक ढवळण्यापर्यंत सगळी बैठी कामं ती आनंदानं करीत असे. शीतल आणि योगेशसाठी गाजर किसून त्याचा रस काढून देणं तसेच भाजी निवडणं अशा कामात ती सतत व्यस्त असायची. हे सगळं करण्यातून स्वतःला कार्यक्षम ठेवण्याचा तिचा प्रयत्न चालू असायचा.

'पुढारी'च्या जबाबदारीमुळे कुटुंबाकडे लक्ष देण्याइतका वेळ आबांच्याकडे नसायचा. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारीचा सगळा भार आईवरच होता. तिच्या शब्दालाही आबा फार मान देत असत. विवाहासाठी मोठ्या बहिणीला एक स्थळ आलं होतं. आबांना ते पसंत होतं; पण आईला ते पसंत नव्हतं. आबांनी तिच्या इच्छेचा मान राखला. आबा किंवा आईनं कोणत्याच बाबतीत आमच्यावर त्यांचे निर्णय लादले नाहीत. आम्हाला नेहमीच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं. कुटुंबातले कोणत्याही प्रकारचे प्रश्न किंवा अडचणी आमच्यापर्यंत येणार नाहीत, याची दक्षता नेहमीच आई-आबांनी घेतली. दर महिन्याला आमच्या घरी प्रत्येकाचं वजन केलं जायचं. कोणी जरा बारीक वाटलं की, त्याला लगेच दूध, अंड्यांचा खुराक सुरू व्हायचा. इतकं त्यांचं आपल्या पोटच्या लेकरांवर प्रेम होतं.

आमच्या प्रेसमध्ये कामासाठी खूपच लोक होते. त्यात काही नातेवाईकसुद्धा होते. ते आईला येऊन काहीबाही गोष्टी सांगायचे. परंतु, सगळ्याच गोष्टींकडे बघण्याचा आईचा द़ृष्टिकोन सकारात्मक असायचा. ती नकारात्मक कधी बोलायचीच नाही. लोक पैसे खातात, गैरव्यवहार करतात, असं कुणी सांगितलं तर ती म्हणायची, 'खाऊ देत! माझ्या लेकाच्या नशिबातलं तरी कुणी काही हिरावून घेऊ शकत नाही!' आज तिचे शब्द खरे ठरले, याची प्रचिती येते.

खरं तर, आई हीच आमच्यापुढे आमचा आदर्श होती. तिचं वागणं-बोलणं याचा परिणाम कळत-नकळत आमच्यावर होत गेला. आईनं कितीतरी लोकांना सढळ हातानं मदत केली. चौगुले म्हणून एक मुलगा होता. त्याला पुस्तकांसाठी, शिक्षणासाठी तिनं सदैव मदत केली. या मदतीतूनच त्यानं मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलं. नंतर आईनं त्याला आमच्या प्रेसमध्येच लावून टाकला. आईनं दिलेला मदतीचा हात चौगुले कधीच विसरले नाहीत. त्यांनी टेंबलाईजवळ आपलं घर बांधलं. त्याला आमच्या आईंचंच नाव दिलं. इतकी त्यांची आमच्या आईवर श्रद्धा होती.

गल्लीत कुणाच्या घरी काही बरंवाईट झालं, तर ही मदतीला धावलीच म्हणून समजा. एखाद्याच्या घरी मुलीचं लग्नकार्य असलं की, ही त्यांना आवर्जून आर्थिक मदत करणार. इतकंच काय, पण अनेक गरिबांच्या अंत्यसंस्कारासाठीसुद्धा तिनं पैसे दिलेले आहेत. एक बेघर आजीबाई होती. तिला घरचे बघत नव्हते. ही आजी रोज आमच्या घरी यायची. ती आली की, आई तिला पोटभरून जेवायला घालायची. खाऊन तृप्त झालेली ती आजी, 'आता मला कुणाकडे भीक मागायची गरज नाही,' असं म्हणायची. जवळच यादवांचं घर होतं. तिथं बाहेरच्या बाजूला रात्री ती झोपत असे. असाच आणखी एक जण माधुकरी मागायला यायचा. तो जगद्गुरू मठात राहत होता. तो रोज फक्त पाच घरं मागून खायचा. ज्या घरांमध्ये जे मिळेल, तेवढ्यावरच तो भागवायचा. लोक त्याला अर्धी-चतकोर भाकरी द्यायचे; पण आई त्याच्यासाठी पूर्ण भाकरी, भात, भाजी असं पोट भरू शकेल, इतकं वेगळं काढून ठेवायची.

धाकट्या आत्याच्या शकुंतला या मुलीचा आईबरोबर विशेष जिव्हाळा. ती लहानपणापासूनच आमच्या घरीच वाढली. तिचं लग्नही आई-आबांनी करून दिलं. तिला मूलबाळ झालं नाही. तिचे पती आजारी होते. त्या काळात मीही माझ्या या आतेबहिणीला मदत केली. सर्वांना मदतीचा हात देण्याचं औदार्य माझ्या आईकडूनच मला मिळालं.

मात्र, ही मायाळू आई रागावली तर मात्र काही खरं नसे. तिनं नुसते डोळे मोठे केले, तरी आम्ही सगळे गप्प व्हायचो. घरात तसा तिचा दराराच होता. खूपदा तिनं आमच्यावर हात उगारला की, आजोबा लगेच धावत यायचे आणि आमची सुटका व्हायची. आमची आजी जेवढी खाष्ट, तेवढेच आमचे आजोबा प्रेमळ. शेवटच्या काळात या दोघांची आमच्या आईनं खूप सेवा केली. आजोबांचाही सुनेवर फार जीव होता. लेकच समजायचे तिला ते.

दोन वर्षे अर्धांगवायूमुळे आजोबा अंथरुणाला खिळून होते. नोकराकडून ते खायचे नाहीत. आईनं भरवलं तरच खायचे. त्यामुळे आई हातातील सगळी कामं बाजूला ठेवून आजोबांना खाऊ घालायची. आईचा शब्द ते कधी मोडायचे नाहीत. आईनं आम्हा सर्वांच्याच आवडी-निवडी मनापासून जपल्या.

आई आणि आबा यांच्यात कधी भांडण झाल्याचं मला आठवत नाही. नाही पटलं किंवा नाही आवडलं की बोलणं बंद, ही तिची राग किंवा नाराजी व्यक्त करण्याची पद्धत होती. मौन हेच आईचं प्रभावी शस्त्र! आईचा पायगुण चांगला होता, यात शंकाच नव्हती. हा अनुभव काही केवळ कौटुंबिक पातळीवरचा नव्हता, तर बाहेरचे अनेक लोकही हेच म्हणायचे. ती बाजारात भाजी आणायला गेली, तरी तिथल्या भाजीवाल्या बायका श्रद्धेनं म्हणायच्या, 'तुम्ही आमच्याकडं खरेदी केली, की आमचा माल लवकर संपतो.' त्यामुळे तिला काही घ्यायचं नसलं, तरी त्या बायका तिला म्हणायच्या, 'वहिनी, फक्त माझ्या टोपलीला हात लावा.' इतकी आईवर लोकांची श्रद्धा होती. आईजवळ पुस्तकाच्या आकाराची वाटावी अशी एक मनीपर्स होती. त्यात ती पैसे मोजून ठेवायची. हाच तिचा खजिना. हेच तिचं संचित.

पण तिला पैशांचा किंवा श्रीमंतीचा गर्व कधीच झाला नाही. खरं तर ती आबांशी लग्न करून जेव्हा त्यांच्या आयुष्यात आली, तेव्हा आबांची आर्थिक परिस्थिती सामान्यच होती. याउलट तिच्या बहिणी ज्या घरात दिल्या होत्या, तिथं सुखसमृद्धी नांदत होती. परंतु, कधी आपल्या बहिणींचा हेवा वाटला नाही की, आपल्या परिस्थितीबद्दल दुःखही झालं नाही. पुढे परिस्थिती सुधारून घरी लक्ष्मी पाणी भरू लागली; पण आईनं कधी त्याचा तोरा मिरवला नाही. उलट तिनं येणा-जाणार्‍यांचं मोठ्या मनानं आगत-स्वागतच केलं. धार्मिक सण असोत की उत्सव असोत. आमचं घर पै-पाहुण्यांनी आणि नातेवाईकांनी भरलेलं असायची. ही किमान चाळीसएक लोकांची मांदियाळी असायची. त्या सगळ्यांचं आदरातिथ्य ती तेवढ्याच उत्साहानं आणि नम्रतेनं करायची.

आई आणि आबा म्हणजे जणू विठ्ठल-रखुमाईचा जोडाच होता. एकावाचून दुसर्‍याला कधीच करमत नसे. मात्र, अखेरच्या काळात त्यांना जेव्हा मी दवाखान्यात अ‍ॅडमिट केलं, तेव्हा त्यांना पाहायला दवाखान्यात यायची इच्छा असूनही येता येत नव्हतं. ती अंथरुणावर होती. हा विठ्ठल-रखुमाईचा जोडा आयुष्यात पहिल्यांदा तेव्हाच विभक्त झाला. आबांना मी दवाखान्यात अ‍ॅडमिट केलं खरं; पण त्यांचे नेत्र जणू आईकडेच लागले होते आणि आई घरी अंथरुणावर पडून होती; पण तिचे नेत्रही आबांच्या दर्शनाचीच प्रतीक्षा करीत होते. आबा बरे होऊन लवकर घरी परत येतील, असं त्या भोळ्या जीवाला वाटत होतं.

परंतु, आबांना मात्र आपल्या महानिर्वाणाची जाणीव झाली असावी. म्हणून ते मला एकसारखे, 'घरी घेऊन जा' म्हणत होते. त्यांना बहुतेक आईला अखेरचं भेटायचं होतं. तिचा निरोप घ्यायचा होता. त्यांनी तसं बोलून दाखवलं नव्हतं; पण त्यांच्या मनातले भाव त्यांच्या म्लान चेहर्‍यावर स्पष्टपणे उमटले होतेे आणि मी ते वाचू शकत होतो. परंतु, माझाही नाइलाज होता. त्यांना बरं करूनच घरी घेऊन जायची मी जिद्द पकडली होती; पण नियतीला ते मान्य नव्हतं आणि त्यांना उपचार अर्धवट टाकून घरी परत नेणं मला मान्य नव्हतं. परंतु, नियतीबरोबरच्या या लढाईत माझाच पराभव होणार होता, हे मला त्या क्षणी ठाऊक नव्हतं. आबा अखेर आईला शेवटचं न भेटताच, तिचा निरोप न घेताच कैवल्याच्या प्रवासाला निघून गेले! आबा आणि आईची शेवटची भेट झाली नाही, ही खंत आजही माझ्या मनाला कुरतडत असते.

आबा गेले. ते दुःख गिळून केवळ आमच्यासाठी आई जिवंत राहिली. तेही विकलांगपणे बिछान्यावर पडून. तशी ती 1977 ते 2009 पर्यंत म्हणजेच जवळजवळ 32 वर्षे बिछान्यावर झोपूनच होती. तिच्या शुश्रूषेसाठी चोवीस तास एक नर्स आणि आया मी ठेवली होती. शिवाय माझी पत्नी गीतादेवी तिची मनापासून काळजी घ्यायची. तरीही तिला दुःख एकाच गोष्टीचं होतं की, तिला घरातील कामं करता येत नाहीत या गोष्टीचं. आईला बाहेर घेऊन जाता येत नाही, ही खंत तर आम्हा बहिणी-भावंडांना नेहमी अस्वस्थ करीत होती. मात्र, आम्हाला वाईट वाटू नये म्हणून आईनं आपलं दुःख काळजातच दडपून टाकलं होतं आणि आमच्यासमोर ती सुखी, आनंदी असल्याचं नाटक करीत होती. इतकी वर्षे अंथरुणावर पडून राहूनदेखील तिनं कधी चिडचिड केली नाही. उलट हसतमुखानं ती घरावर लक्ष ठेवत होती.

तरीही प्रसंगानुरूप ती घराबाहेर थोडंफार पडायचा प्रयत्न करायची. परंतु, 1980 पासून तिला घराबाहेर पडणं अगदीच अशक्य झालं. आता 'इंदिरा निवास' हेच तिचं विश्व होऊन गेलं होतं. आबा होते तोपर्यंत त्यांच्या सहवासात तिच्या चेहर्‍यावर समाधान विलसत होतं; पण आबा गेल्यावर ते तिचं एकमेव समाधानही लोप पावलं. आपल्या जन्माचा जोडीदार आपली जीवनयात्रा संपवून निघून गेला, याचं दुःख तिच्यासाठी एखाद्या डोंगराहून कमी नव्हतं. तो दुःखाचा डोंगर छातीवर घेऊनच तिनं पुढचं आयुष्य जगून काढलं!

आपण आयुष्यभर सर्वांची सेवा केली; पण अखेरच्या दिवसात आपण आपल्या पतीची सेवा करू शकलो नाही, याची खंत तिला तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत बोचत राहिली. तिची नजर शून्यात गेली. तिचं जगणं एक शून्य होऊन गेलं. एक भयंकर शिक्षा तिच्या वाट्याला आली. तिनं ती निमूटपणानं सोसली. खरं तर, अमर्याद धनदौलत असूनही तिला तिचा उपभोग घेता आला नाही आणि आम्हीही तिच्यासाठी काही करू शकलो नाही.

ज्या परोपकारी स्त्रीनं कधी कुणाला उपाशी ठेवलं नाही. जिनं नेहमीच तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेल्याला दोन घास खायला दिले, कित्येकांना आसरा दिला; त्याच पतिपरायण आणि दयाळू स्त्रीवर एवढा मोठा दुःखाचा पहाड कोसळावा, याहून नियतीचा निष्ठुरपणा आणखी कोणता असणार? तिला तिच्या यातनांमधून बाहेर काढू शकत नाही, याचं आम्हालाही होत असलेलं दुःख भयंकरच होतं. तिच्या दुखण्यावर योग्य उपचार झाले असते, तर तिच्यावर ही वेळ आलीच नसती. परंतु, शेवटी जे घडायचं ते घडून गेलं होतं. आबा नेहमी म्हणायचे, 'शेवटी नशिबाचे भोग भोगावेच लागतात!' आम्ही सर्व कुटुंब तिला दररोज भेटत असू. माझी मोठी बहीण अक्का व मेहुणे डॉ. शिंदे हे तर जवळ जवळ एक दिवसाआड येऊन आईंना भेटून जात असत. माझ्या सर्व बहिणी, सर्व मेहुणे, त्यांची मुलं, मुली, नाती, नातवंडं… सर्वांना आईचा ओढा होता. डॉ. शिर्के व हेमाताई यांनीपण आईची विशेष सेवा केली.

अशीच वर्षामागून वर्षे सरत गेली. 2007 च्या सप्टेंबरमध्ये आईला कफाचा त्रास सुरू झाला. ब्राँकायटिस चेस्ट इन्फेक्शन झालं. त्याचा तिच्या किडनीवर परिणाम झाला. ती आणखीनच विकलांग झाली. मी माझ्यापरीनं सर्व ते प्रयत्न करीत होतो. तरीही 3 जानेवारी 2009 ला तिला पुन्हा चेस्ट इन्फेक्शन होऊन ब्राँको स्पाझमचा त्रास सुरू झाला. तिला श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होऊ लागला. डॉ. मोहन पोतदार, डॉ. विनोद वागळे, डॉ. विद्याधर शिंदे आणि डॉ. अभय शिर्के अशी डॉक्टरांची पलटणच प्रयत्न करत होती. त्यांनी अविश्रांत प्रयत्न सुरू केले. सर्वानुमते येट्रल ही गोळी सुरू करण्यात आली. घरीच ऑक्सिजन सुविधेसहित अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला. उपचारामध्ये कसलीही उणीव राहिलेली नव्हती; पण वय 91 झालेलं. त्यातच अनेक व्याधींनी शरीरात ठाण मांडलेलं! त्यामुळे तिच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. 8 जानेवारीला तर तिला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं. आम्ही उपलब्ध होतील तिथून औषधं मागवली. अगदी अमेरिकेतूनही!

काही झालं तरी ती माझी आई आहे. ती मला कुठल्याही किमतीवर हवी होती. त्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. तिचा प्रत्येक श्वास वाटेल ते मोल देऊन विकत घ्यायची माझी तयारी होती. परंतु, जगाच्या बाजारात सगळं विकत मिळतं; पण श्वास विकत मिळत नाहीत, हे मला त्या दिवशी कळून चुकलं. तो दुर्दैवी दिवस होता, 26 जानेवारी 2009! सकाळचे अकरा वाजून गेले. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. प्रार्थना सुरूच होत्या. परंतु, या सर्वांहून काहीतरी श्रेष्ठ होतं. आमच्या प्रयत्नांना यश येऊ नये, अशीच नियतीची इच्छा होती! अखेर तो क्षण आलाच! सारा परिवार निःशब्द सुन्न होऊन बसला होता. मी व्याकूळ होऊन फक्त पाहात राहिलो. आता काहीच करणं आमच्या हाती राहिलं नव्हतं. हळूहळू माझ्या आईच्या डोळ्यांची उघडझाप थांबली. श्वासोच्छ्वास थांबला. प्राणानं कुडीचा त्याग केला!

आमचं मातृछत्र हरपलं! सार्‍या 'पुढारी' परिवाराचीच मायेची सावली निघून गेली. माझी वात्सल्यसिंधू आई, प्रेमस्वरूप आई हे जग सोडून गेली होती. जिनं आपल्या नेत्रांची निरांजनं करून माझं औक्षण केलं, तळहातांचा पाळणा करून मला जोजवलं, मला लहानाचं मोठं केलं, ती माझी आई आज मला पोरकं करून अनंतात विलीन झाली होती! जिनं माझे सगळे लाड पुरवले, सगळे हट्ट पुरवले, प्रसंगी कठोर होऊन मला शिस्त लावली; ती माझी प्रेमळ आई मला कायमची अंतरली होती. ज्या घराचं जिच्या वास्तव्यामुळे मातृमंदिर झालं, त्या मातृमंदिरातील मातृदेवता आज निघून गेली होती. देव्हारा रिकामा झाला होता!

त्यावेळी आम्हा सर्वांच्याच लक्षात एक गोष्ट आली. आजारपणामुळे, शारीरिक व्याधीमुळे, तसेच कायम एकाच खोलीत बेडवर झोपावे लागल्यामुळे शेवटी शेवटी आई जगण्याला कंटाळली होती. त्यामुळे तिचा चेहरा त्रासिक झालेला दिसायचा. परंतु, कुडीतून पंचप्राण निघून गेल्यानंतर तिचा चेहरा एखाद्या देवतेसारखा शांत, निरामय आणि प्रसन्न दिसू लागला होता. जणू वेदनांचा मृत्यू झाला होता आणि प्रसन्नतेनं पुन्हा जन्म घेतला होता. तिनं तृप्त मनानं आणि समाधानानं या जगाचा निरोप घेतला, असाच त्याचा अर्थ नव्हता काय?

दुपारी आईची भव्य अंत्ययात्रा निघाली. 'इंदिरा निवास'ला अखेरचा निरोप देऊन आई अनंताच्या प्रवासाला निघाली. पंचगंगा नदीच्या काठावर 'मुक्तिधाम' स्मशानभूमीत आईवर समंत्रक अग्निसंस्कार करण्यात आले. तिच्या पवित्र देहातील अणुरेणू अग्निज्वालांवर आरूढ होऊन पंचत्वात विलीन झाला. माझ्या जीवनातील एका महान पर्वाचा अंत झाला. आज आईला जाऊनही एक तप झालं; पण तिच्या विरहाचं दुःख तसूभरही मनातून कमी झालेलं नाही. आजही ती घरी असेल या भावनेनंच मी घरात पाऊल ठेवतो आणि ती नसल्याच्या जाणिवेनं मन खट्टू होतं.

'आई, आई, आई,
पुन्हा परतुनी येशील का?
मायेच्या पदराखाली
पुन्हा एकदा घेशील का?
सर्व जगाला आईसाहेब,
आम्हांसाठी केवळ आई
भुकेजल्यांची तू अन्नपूर्णा
तहानेल्यांची गंगा-यमुना…
आज पुन्हा तू कुशीत घेऊन
चिमणाचारा देशील का?
विचार नाही कधी स्वतःचा
सदैव केला जनहिताचा
आज आम्हाला तुझी तहान
आई आमुची अशी महान
वात्सल्याचा वर्षाव करण्या
लवकर लवकर येशील का?
कधी न होता मनात स्वार्थ
जगणे तव ठरले परमार्थ
युगायुगांची तू पुण्याई
परमभक्तीची तूच विठाई…
मनामनातून दरवळ पसरत
पुन्हा गंध तू देशील का?
एकरूप तू ह्या संसारी
मनात होती नित्यच वारी
सोसलेस तू भोगलेस तू
व्यथा न कसली दाखवशी तू
अनाथ झाली भावंडे ही
आई पुन्हा तू होशील का?
धागा तुटला आयुष्याचा
आम्ही जाणले पथ मोक्षाचा
क्षितिजकडेला सूर्य लोपला
अमुचा प्रेमळ दिन मावळला
स्मृतीत तर तू आहेसच पण
सत्य होऊनी येशील का?'

माझी लहान बहीण हेमलता शिर्के यांनी आम्हा सर्व परिवाराच्यावतीने आईला अर्पण केलेली ही आदरांजली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news