पुणे ; पुढारी वृत्तसेवा : अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणार्या आणि त्यांना मायेची सावली देणार्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर ठोसरपागा स्मशानभूमी येथे बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तत्पूर्वी, मांजरी येथील सन्मती बालनिकेतन संस्थेत कुटुंबीयांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर संपूर्ण शासकीय इतमामात सिंधुताईंच्या पार्थिवावर महानुभाव पंथाच्या रीतीनुसार दफनविधी करण्यात आला. अलोट गर्दीत साश्रुनयनांनी सिंधुताईंना अखेरचा निरोप देण्यात आला.
शासनाच्या वतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पोलिस दलातर्फे त्यांना शोकधून वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सिंधुताईंच्या कन्या ममता सपकाळ यांच्या ताब्यात राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला. सिंधुताईंच्या पार्थिवावर महानुभाव पंथाच्या रीतीनुसार दफनविधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले.