साहित्‍य : वेगळ्या विचारांची गळचेपी का..?

साहित्‍य : वेगळ्या विचारांची गळचेपी का..?
Published on
Updated on

अरविंद जोशी : कोबाड गांधी यांच्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार' महाराष्ट्र सरकारनं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पुस्तक नक्षलवादाचा तसेच हिंसाचाराचा पुरस्कार करणारे असल्याचा आरोप करण्यात आला असला; तरी त्याचे कसलेही समर्थन या पुस्तकात केलेले नाही. या पुस्तकात कोबाड गांधी यांनी तात्त्विक चर्चा केलेली असून, स्वदेशीचा पुरस्कार केलेला आहे. वेगळ्या विषयावरचे हे पुस्तक म्हणून त्याचे स्वागत केले गेले पाहिजे.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेले आहे आणि या स्वातंत्र्याचा लाभ सामान्य माणसाला घेता येतो, असे आपण बोलतो, ऐकतो आणि लिहीतसुद्धा असतो. परंतु, हे स्वातंत्र्य निखालस नाही. ते दुभंगलेले आहे. आपण ज्याला स्वातंत्र्य म्हणतो ते स्वातंत्र्य देशातल्या गरीब माणसाला उपभोगता येत नाही. न्यायालये आपल्याला न्याय देतात हे खरे आहे; परंतु तो न्याय मिळवण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. वकिलांची फौज उभी करावी लागते. आधी खालच्या न्यायालयात न्याय मिळाला नाही तर उच्च न्यायालयात जावे लागते आणि उच्च न्यायालयात नाही मिळाला तर सर्वोच्च न्यायालयात जावे लागते. अशाप्रकारची कोर्टबाजी एखाद्या गरीब माणसाला करायची असेल; तर त्याने त्यासाठी लागणारा प्रचंड पैसा कुठून उभा करावा? तो तेवढा पैसा उभा करू शकत नाही आणि त्यामुळे तो गुन्हा केलेला नसतानासुद्धा तुरुंगात खितपत पडतो. ही स्वातंत्र्याची कुचेष्टा नव्हे काय? अशा स्थितीत कायद्याने आणि घटनेने दिलेले स्वातंत्र्य हे निखालस ठरत नाही.

सामाजिक कार्यकर्ते कोबाड गांधी यांनी या विषयावर लिहिलेल्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला राज्य सरकारचा पुरस्कार जाहीर झाला आहे. परंतु, हा पुरस्कार म्हणजे शहरी नक्षलवाद्याला जाहीर झालेला पुरस्कार आहे आणि हे पुस्तक नक्षलवादाचा तसेच हिंसाचाराचा पुरस्कार करणारे असल्यामुळे या पुरस्काराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने ही मागणी मान्य केली. या पुस्तकाची आणि पुरस्काराची चौकशी करण्याचे आश्वासनसुद्धा दिले. त्यानंतर हा पुरस्कार मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याच्या निषेधार्थ शरद बाविसकर, आनंद करंदीकर यांनीही आपापले पुरस्कार परत केले आहेत. याखेरीज प्रज्ञा दया पवार आणि नीरजा यांनी साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे; तर लक्ष्मीकांत देशमुख यांनी भाषा समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, या संबंधात तक्रार करणार्‍यांपैकी किती जणांनी कोबाड गांधी यांचे हे पुस्तक खरोखरच वाचले असेल? अशी शक्यता फार कमी वाटते. कोबाड गांधी यांच्यावर शहरी नक्षलवादी असा शिक्का मारणार्‍या लोकांनी त्यांच्या पुस्तकाला पुरस्कार जाहीर होताच ही आरडाओरड सुरू केली आहे. वास्तविक, या पुस्तकात शहरी नक्षलवाद किंवा नक्षलवादी करत असलेला हिंसाचार, याची कसलीही चर्चा किंवा समर्थन केलेले नाही.

'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' हे कोबाड गांधी यांचे पुस्तक त्यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईची हकिकत सांगणारे आहे. त्यांना 17 सप्टेंबर 2009 रोजी दिल्लीमध्ये हिंसाचाराच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. त्यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले, त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आणि हे गुन्हे ओडिशा, दिल्ली शहर, महाराष्ट्र, झारखंड, तेलंगणा आधी राज्यांतील घटनांच्या संदर्भात होते. त्यामुळे त्यांच्यावर एकामागे एक खटले चालले. 9 वर्षांच्या या खटल्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. या काळात त्यांना विविध राज्यांतल्या न्यायालयांत आणि तुरुंगांत जावे लागले. 9 वर्षे न्यायालयीन कारवाईतून पिळून निघाल्यानंतर त्यांना निर्दोष जाहीर करण्यात आले; मग ते न्यायालयाच्या द़ृष्टीने निर्दोष होते, तर त्यांना 9 वर्षे हा तुरुंगवास का सोसावा लागला?

कोबाड गांधी हे फार श्रीमंत नाहीत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी अनुराधा हिने मुंबईतल्या आणि नंतर आदिवासी भागातील तसेच नागपूरच्या परिसरातील गरीब, आदिवासी आणि दलित समाजात काम केलेले आहे. या समाजाला त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा या पती-पत्नीच्या कामामागचा हेतू होता.

कोबाड गांधी आणि त्यांच्या पत्नी अन्यायाच्या विरोधात नेहमीच अस्वस्थ होत असत आणि त्यातून त्यांनी हे काम हाती घेतले. अनुराधा गांधी यांचे निधन झाले. नंतर कोबाड गांधी यांच्यावर कारवाई झाली. त्यांना हिंसाचारामध्ये दोषी दाखवून त्यांच्यावर खटले भरण्यात आले. त्याची सारी हकिकत, तुरुंगातील वास्तव्य, तुरुंगाची स्थिती, याचे सविस्तर वर्णन या पुस्तकात केलेले आहे. कोबाड गांधी फार श्रीमंत नसले, तरी त्यांच्या पारसी नातेवाईकांनी, मित्रांनी आणि हितचिंतकांनी त्यांच्यावरील कारवाईच्या संदर्भात त्यांना मदत केली. एवढे करूनसुद्धा त्यांना न्यायासाठी 9 वर्षे झगडावे लागले. त्यांच्याजागी एखादा गरीब माणूस असता, तर त्याने काय केले असते? याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्यामुळे हे पुस्तक वस्तुस्थितीचे दर्शन घडवणारे आहे. या पुस्तकात त्यांनी चुकून एका शब्दानेसुद्धा हिंसाचाराचे समर्थन केलेले नाही. त्यामुळे या पुस्तकावर शहरी नक्षलवादाचे समर्थन करणारे पुस्तक म्हणून शिक्का मारून त्याच्या पुरस्काराची चौकशी करण्याची मागणी करणे चुकीचे आहे. या पुस्तकात कोबाड गांधी यांनी तात्त्विक चर्चा केलेली असून, स्वदेशीचा पुरस्कार केलेला आहे. शिवाय त्यांना तुरुंगात ज्या कैद्यांचा सहवास लाभला त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध राज्यांतील नक्षलवादी चळवळ कशी भरकटली आहे, हेच दाखवून दिले आहे.

एका वेगळ्या विषयावरचे हे पुस्तक म्हणून त्याचे स्वागत केले गेले पाहिजे. थोडा आपल्यापेक्षा वेगळा विचार मांडला की, त्या विचाराची अशी गळचेपी करणे हे सहिष्णुतेचे लक्षण नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news