सायबर सुरक्षेमध्ये नोकरीच्या संधी

file photo
file photo
Published on
Updated on

सायबर सुरक्षा हे आजच्याच नव्हे तर उद्याच्या काळातही महत्त्वाचे करिअर असणार आहे. संगणक तंत्रज्ञानात रुची असणार्‍या तरुणांनी या क्षेत्राकडे आवर्जून वळायला हवे.

सायबर सुरक्षा या क्षेत्रात येण्यासाठी तरुणांना काही मूलभूत गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जसे माहिती तंत्रज्ञान, नेटवर्क व्यवस्थापन आणि ऑपरेटिंग सिस्टीमची माहितीही त्यांना असली पाहिजे. मोठ्या पदांसाठी नियुक्ती करताना उमेदवाराकडे पदवी किंवा सायबर सुरक्षा आणि त्या संबंधित क्षेत्रामधील पदवीची अपेक्षा करतात.

ज्या तरुणांकडे तांत्रिक पार्श्वभूमी नाही त्यांनी सीआयएसए (सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिटर), सीआयएसएसपी (सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिस्टीम सिक्युरिटी प्रोफेशनल) सारख्या प्रतिष्ठित सर्टिफिकेशन केल्यानंतर या क्षेत्रात संधी मिळू शकतात. जर उमेदवार व्यवस्थापन किंवा विनाप्रोग्रामिंग माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित असेल तर या प्रमाणपत्रांव्यतिरिक्त मान्यता प्राप्त सर्टिफिकेशन जसे सीआयएसएम (सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजर) व आयएसओ 27001 करू शकतो.

कॉम्प्युटर शास्त्राशी निगडित प्रशिक्षण अभ्यासक्रम करणारे तांत्रिक ज्ञान असणारे तरुण ओएससीपी (ऑफेन्सिव्ह सिक्युरिटी सर्टिफाईड प्रोफेशनल), जीएसईसी ( सिक्युरिटी इसेन्शिअल सर्टिफिकेशन) व सीईएच (सर्टिफाईड एथिकल हॅकर) सारखे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करूनही या क्षेत्रात रोजगार संधी मिळवू शकतात. काही प्रमुख पदे ः सध्या हरेक कंपनी आपल्या इंटरनेट सेवा देताना आणि ऑनलाईन माहिती सुरक्षित राखण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेते. मात्र, या क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्तींच्या कामाची वेळ ही ठराविक म्हणजे 9 ते 5 अशी नसते. त्यांच्या कामाची वेळ कंपनी, तिचा आकार आणि व्यवस्थापन यावर अवलंबून असतो.

सायबर सुरक्षेशी निगडित कंपन्यांमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे आकलन करण्यासाठी टीम असते. ही टीम सातत्याने ग्राहकांना सायबर धोक्यांविषयी विस्तृत माहिती देत असते. इच्छुक तरुण आपल्या रुचीनुसार आवडीच्या क्षेत्राची निवड करू शकतात.

सायबर सुरक्षेशी निगडित काही क्षेत्रे जाणून घेऊया…

नेटवर्क सिक्युरिटी तज्ज्ञ : आज जवळपास सर्वच मोठ्या कंपन्यांमध्ये कॉम्प्युटरचे एक स्वतःचे नेटवर्क किंवा जाळे असते. त्या कंपन्यांना या नेटवर्कचा व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रयत्नशील असतात, त्यामुळे सायबर सुरक्षेतील व्यावसायिकांंच्या सेवेचा वापर करतात. या क्षेत्रात येण्यासाठी ओएससीपीसारखे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे नक्कीच उपयुक्त ठरते.

सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञ : या व्यावसायिकांचे काम सुरू होते ते सायबर गुन्हा घडून गेल्यानंतर. सर्व कॉम्प्युटरचे नियंत्रण स्वतःच्या हाती घेऊन प्रकरणाची तपासणी करतात आणि चोरी झालेली माहिती किंवा डाटा पुन्हा परत मिळवण्याचा प्रयत्न करतात.

मोबाईल सुरक्षेचे ऑडिटिंग : हल्ली स्मार्ट फोन्समुळे व्यवहार मोबाईलवरून केले जातात. मोबाईल सेवा देणार्‍या कंपन्या ग्राहकांच्या मोबाईलची सुरक्षा आणि त्यातील अ‍ॅप्सची सुरक्षा यासाठी व्यावसायिक व्यक्तींची सेवा घेताना दिसून येतात.

वेब सिक्युरिटी ऑडिटर : या व्यावसायिकांची नेमणूक ऑनलाईन देण्या-घेण्याचे व्यवहार करणार्‍या कंपन्या जसे बँका किंवा क्विक हिलसारख्या सायबर सुरक्षेमध्ये काम करणार्‍या कंपन्या करतात.
या क्षेत्रात बीटेक आणि कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी या क्षेत्रात येण्याचे प्रमाण अधिक आहे. सतत नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत स्वतःला अद्ययावत ठेवावे.

वेतनश्रेणी : कोणत्याही कंपनीत अनुभवावर आधारित पद आणि वेतन दिले जाते. सर्वसाधारणपणे सुरुवातीला एखाद्या व्यावसायिकाला वार्षिक काही लाख रुपयांचे पॅकेज मिळते. जर चांगल्या संस्थेतून अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर वेतनात थोडीशी वाढ मिळू शकते. तरुण विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून प्रमाणपत्र मिळवल्यास त्याचे महत्त्व वाढू शकते आणि चांगले पॅकेज मिळवता येते.

विधिषा देशपांडे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news