सातारा : सिंचन मंडळाचा वैद्यकीय बिलांत ‘झोल’

सातारा : सिंचन मंडळाचा वैद्यकीय बिलांत ‘झोल’

Published on

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा सिंचन मंडळाने वैद्यकीय बिलांमध्ये केलेला 'झोल' समोर आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या खोट्या सह्या व बोगस शिक्के वापरून वैद्यकीय परिपूर्ती देयके सादर केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी दोषी अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ आणि जलसिंचन मंडळाच्या भानगडींचा पर्दाफाश होऊ लागला आहे. अभियंत्यांनी कागदोपत्री केलेले 'उद्योग' समोर येऊ लागले आहेत. सातारा जलसिंचन मंडळाने केलेला कारनामा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. दैनंदिन कामकाजातील कागदपत्रांवर कार्यालयीन शिक्क्यांचा वापर केला जातो. कार्यालयीन पत्रव्यवहार चालणार्‍या बारनिशीत आवक-जावक रजिस्टर हमखास ठेवले जाते. बाहेरून आलेली आणि कार्यालयातून जाणार्‍या पत्रव्यवहारांच्या नोंदी या आवक-जावक रजिस्टरमध्ये ठेवल्या जातात. याच आवक-जावक रजिस्टरमुळे जलसिंचन मंडळाची चोरी उघडकीस आली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांचा मराठी रजिस्ट्रेशनमधील चौकोनी व गोल शिक्का नेहमीच्या ठिकाणी बारनिशी विभागातील कर्मचार्‍याला दिसला नाही. कार्यालयात शोधाशोध सुरू झाली. मात्र, शिक्के मिळून न आल्याने त्याबाबतची पहिली तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली. ही घटना मागील जुलै महिन्यातील. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात सातारा सिंचन मंडळाकडून उपअधीक्षक अभियंत्यांच्या नावाने सिव्हील हॉस्पिटलमध्ये टपाल आले.

याच दिवशी वैद्यकीय देयकातील आदेशावरील स्वाक्षरी पडताळणीबाबतचे पत्रही सिव्हील कर्मचार्‍याला मिळाले. सिंचन विभागाकडून आलेल्या टपालासोबत दोन कर्मचार्‍यांची तीन वैद्यकीय बिले पाठवण्यात आली होती. या बिलावरील आवक व जावक क्रमांक आणि त्यावरील स्वाक्षरी ही जिल्हा शल्य चिकित्सकांचीच आहे का? याची तपासणी करण्यासाठी कोषागार कार्यालयातून आलेले पत्र सिव्हील हॉस्पिटलला मिळाले.

कोषागार कार्यालयाला वैद्यकीय बिलांवर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सह्याबाबत शंका आली होती. त्यामुळे या कार्यालयाने जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जलसिंचन मंडळाला पत्र देवून सह्यांची खातरजमा करण्यास कळवले होते. त्यानंतर जलसिंचन विभागाकडून आलेल्या या देयके व आदेशाच्या सिव्हील हॉस्पिटलच्या आवक जावकमध्ये नोंदी तपासण्यात आल्या.

मात्र आवक-जावक क्रमांक हा कुठेही सापडला नाही. कारण तशी नोंद सिव्हील कर्मचार्‍याला रजिस्टरमध्ये कुठेही दिसून आली नाही. सिंचन मंडळातील कर्मचार्‍यांनी पाठवलेली वैद्यकीय देयके तसेच देयकांच्या आदेशावर जिल्हा शल्य चिकित्सकांची स्वाक्षरी नसून ती अन्य कुणाचीतरी स्वाक्षरी असल्याची माहिती उपअधीक्षक अभियंत्यांना देण्यात आलीच पण जिल्हा शल्य चिकित्सकांनी पोलिस ठाण्याकडेही तक्रार केली.

याप्रकरणी गुन्हा दाखल न करता सध्या चौकशी सुरु असल्याचे पोलिस सांगत आहेत. जवळपास तीन महिने होवूनही पोलिस चौकशी पूर्ण न झाल्याने केवळ वेळकाढूपणा सुरु असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी पोलिस गुन्हा दाखल करणार का? असा सवाल केला जात आहे. जलसिंचन मंडळाची ही फसवेगिरी उघडकीस आल्यानंतर सिव्हील हॉस्पिटलमधून अचानक गायब झालेले शिक्के चोरीस गेल्याचे संबंधित कर्मचार्‍याचे म्हणणे आहे. कोषागार कार्यालयाच्या सतर्कतेमुळे जलसिंचन विभागाने केलेला झोल उघडकीस आला.

वैद्यकीय परिपूर्तीचे प्रस्ताव वरिष्ठ अभियंत्यांकडून सादर केले जातात. त्यामुळे या फसवेगिरीत वरिष्ठ अभियंत्यांचाही सहभाग दिसून येतो. सिंचन मंडळाकडून आलेल्या सर्वच वैद्यकीय परिपूर्ती बिलांची तसेच त्यावरील आदेशाची कसून तपासणी होणे आवश्यक आहे. असाच प्रकार सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याही मंडळाकडून सादर झालेल्या वैद्यकीय परिपूर्ती बिलांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
(क्रमश:)

तर मग सिंचन मंडळ कार्यालयात काय चालत असेल?

वैद्यकीय परिपूर्तीची बिले ही जिल्हा शासकीय रुग्णालयाला सादर करावी लागत असल्यामुळे त्याची तपासणी झाली. आपण सादर केलेले वैद्यकीय बिलांचे प्रस्ताव तपासले जाऊ शकतात, याचा अंदाज असतानाही सिंचन मंडळाकडून बिनदिक्कत संशयास्पद आढळलेले प्रस्ताव सादर झाले. इतर शासकीय कार्यालयांना कागदोपत्री बनवण्याचा प्रयत्न होत असेल तर सातारा सिंचन मंडळ किंवा सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळात काय काय सुरू असेल. न केलेल्या कामाची भरमसाठ बिले काढली जातात, अशी चर्चा आहेच. आता मात्र शंका घ्यायलाही वाव मिळाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news