सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी नगर विकास आघाडी क्षमता व लोकसंपर्क असलेले स्वच्छ उमेदवार देणार आहे. गेल्या पाच वर्षांत सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी व त्यांच्या नगरसेवकांनी सत्तेचा वापर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केला नाही. नुसतंच खायचं आणि लुटायचं या भ्रष्ट्र कारभाराला सातारकर कंटाळले आहेत, अशा शब्दांत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी साविआवर हल्लाबोल केला. अजिंक्यतारास सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवारी अंतिम मुदत होती. अर्ज भरल्यानंतर आ. शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या 'सुरुची' या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
आघाडीची पुढील भूमिका काय असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, ओबीसी आरक्षण मिळावे असे सर्वांनाच वाटत आहे. आताच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचा इम्पिरिकल डेटा कोर्टाकडे कधी जाईल हे माहित नाही. नगर पालिका प्रभागांची आरक्षण सोडत झाली असून प्रत्येक प्रभागात आमच्याकडे तगडे उमेदवार आहेत. गेल्या पाच वर्षांत सातारा विकास आघाडीने केलेल्या भ्रष्टाचारी कारभाराला सातारकर कंटाळले आहेत. नुसतंच खायचं आणि लुटायचं एवढंच काम झालं आहे. शहराचे प्रश्न किंवा हद्दवाढ भागातील समस्यांत सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या नगरसेवकांनी लक्ष घातले नाही. दुसर्यांनी मंजूर करुन आणलेल्या कामांचे श्रेय लाटणे हा एकमेव कार्यक्रम सुरु होता.
एकमेकांची कामातून वाद, टेंडर घेण्यासाठी आणि बिले काढण्यासाठी त्यांच्यातील त्यांच्यात कुरघोड्या सुरु होत्या. नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन एकमेकांचे उणीदुणी काढण्याचेच त्यांनी काम केले. नगर विकास आघाडी नव्यांना की जुन्यांना संधी देणार, असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, लोकांना अपेक्षित असणारा उमेदवार आणि निवडणून येण्याची क्षमता असलेला उमेदवार दिला जाईल. संभाव्य उमेदवाराने केलेली कामे, त्याचा लोकसंपर्क यांचा विचार करुनच उमेदवारी ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगर विकास आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.