सातारा : पुढारी वृत्तसेवा
देशपातळीवर करण्यात आलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षणात सातारा जिल्ह्यात खासगीपेक्षा सरकारी शाळांमधील मुलांची कामगिरी चांगली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे सर्व्हेक्षणात सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला. सर्व विषयात मुलींची संपादणूक मुलांपेक्षा अधिक दिसून आली.
राष्ट्रीय शैक्षणिक सर्व्हेक्षण व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्यातील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणातून काय साध्य केले हे पाहण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण दि.12 नोव्हेंबर 21 रोजी घेण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील सरकारी, अनुदानित, खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील 46 शाळामधील तिसरीचे 972, पाचवीचे 46 शाळामधील 1147, आठवीचे 80 शाळामधील 956 व दहावीचे 64 शाळामधील 673 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये मराठी, गणित, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र, इंग्रजी विषयांतील ज्ञान विविध प्रश्नांच्या आधारे तपासण्यात आले. सर्व्हेक्षणातून विद्यार्थ्यांची प्रत्येक विषयामधील संपादणूक समजून घेण्यात आली. राष्ट्रीय स्तरावर तिसरीच्या विद्यार्थ्यांना 59 टक्के, पाचवी 49 टक्के, आठवी 41.9 टक्के, दहावी 37.8 टक्के, तर राज्य स्तरावर तिसरीच्या विद्यार्थ्यांना 63.4 टक्के, पाचवी 51.8 टक्के, आठवी 42.6 टक्के, दहावी 38.3 टक्के तर जिल्हा स्तरावर तिसरीच्या विद्यार्थ्यांना 63.3 टक्के, पाचवी 57.3 टक्के, आठवी 46.1 टक्के, दहावी 42.3 टक्के संपादणूक प्राप्त केली आहे. विषयनिहाय संपादणूकमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर मराठी 53 टक्के, गणित 43 टक्के, परिसर अभ्यास 60 टक्के, विज्ञान 39 टक्के, सामाजिक शास्त्र 43 टक्के, इंग्रजी 50 टक्के संपादणूक प्राप्त केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील सर्व्हेक्षणात सर्वच इयत्तांमधील सर्व विषयात मुलींची संपादणूक मुलांपेक्षा अधिक असून खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांपेक्षा सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संपादणूक अधिक असल्याचे दिसून आले. शहरी भागातील शाळामधील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील शाळामधील विद्यार्थ्यांची संपादणूक अधिक असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांची संपादणूक वाढीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षण विभाग जिल्हा परिषद व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
शैक्षणिक सर्व्हेक्षण, शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण, विविध सराव चाचण्यांचे आयोजन, कृती पत्रिकांची निर्मिती व वापर, पालक कार्यशाळा, शिक्षण परिषदांचे आयोजन, केंद्र संसाधन गटांची विषयनिहाय निर्मिती व मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांमुळे सातारा जिल्हा गुणवत्तेमध्ये अग्रेसर असल्याचे दिसून येतो. ज्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांची संपादणूक तुलनेने कमी दिसत आहे त्या विषयांवर अधिक लक्ष केंद्रीत करुन संपादणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
ज्योती मेटे, प्राचार्य डाएट, सातारा