सातारा : शिवसेना माझी आहे असं मी म्हणायचं का? : खा. उदयनराजे
सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सत्ता स्थापन करण्यासाठी स्वार्थासाठी एकत्र येतात त्यांना एकत्र ठेवण्यासाठी खूप मोठे कष्ट घ्यावे लागतात. परंतु जर एका विचाराने एकत्र येतात त्यांना कोणतीच वेगळी ताकद वापरावी लागत नाही. त्यामुळे शिंदे गट कायमस्वरूपी एकत्र राहणार असे दिसत आहे. लोकांनी ते आता स्वीकारले आहे.
काही गोष्टी वेळ आल्यावरच समोर येतील. प्रत्येकाला वाटतं सत्तेत राहावं. मात्र, सत्ता का गेली याचं आत्मचिंतन करण गरजेचं आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, मग शिवसेना माझी आहे असं मी म्हणायचं का? असा उपरोधिक सवाल खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी ठाकरे गटाला केला आहे.
खा. उदयनराजे भोसले यांनी कॅबिनेट मंत्री ना. दिपक केसरकर यांची पुण्यातील शासकीय विश्रामगृहावर शुक्रवारी भेट घेतली. दरम्यान, या बैठकीत विकास कामासंदर्भात चर्चा झाली. राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा. तसेच महाबळेश्वरातील पर्यटनाच्या विकासाबाबत ना. केसरकर यांची भेट घेतल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
खा. उदयनराजे म्हणाले, सातार्याने महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्यासंदर्भात जातीयवाद व्हायला नको असे म्हणून त्यांनी मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.