सातारा : वहागावमध्ये एकाच शिवारात तीन वेगवेगळ्या बिबट्यांचे झाले दर्शन

सातारा : वहागावमध्ये एकाच शिवारात तीन वेगवेगळ्या बिबट्यांचे झाले दर्शन
Published on
Updated on

तासवडे टोलनाका , पुढारी वृत्तसेवा :  वहागाव (ता. कराड) येथील परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शेतकर्‍यांना एकाच रात्रीत वेगवेगळ्या तीन पूर्ण वाढ झालेल्या बिबट्यांचे दर्शन झाले आहे. त्यामुळे वहागाव परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत पसरली असून, शेतात एकटे जाण्यास शेतकरी घाबरत आहेत.

वहागाव, तळबीड, घोणशी आणि खोडशी या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी तळबीड परिसरात वस्तीवरील जनावरांवर बिबट्याने हल्ला केला होता. तर खोडशीतील नागरी वस्तीत घुसण्याचा प्रयत्न बिबट्याने केला होता. दरम्यान, वहागाव येथील सचिन पवार, सुभाष माने, अण्णासो पवार हे शेतकरी शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास तळे नावाच्या शिवारात शेतास पाणी पाजण्यास गेले होते. यावेळी सुभाष माने अण्णासो पवार हे शेतकरी एका बाजूला शेतास पाणी देत होते. तर त्या ठिकाणाहून दोनशे ते तीनशे फूट अंतरावर सचिन पवार हे शेतीस पाणी देत होते.

एकाच वेळी या तिन्ही शेतकर्‍यांना शेतात बिबट्यांचे दर्शन झाले. यावेळी सुभाष माने व अण्णासो पवार यांना दोन बिबटे दिसले. तर सचिन पवार यांना एका बिबट्याचे दर्शन झाले. यावेळी शेतकर्‍यानी आरडाओरडा केल्याने बिबटे शिवारातून निघून गेले. मात्र या परिसरातील शिवारात तीन बिबटे असल्याचे समजताच शेतकर्‍यांची पाचावर धारण बसली आहे.

वीज वितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. दिवसा ऐवजी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकर्‍यांना जीव धोक्यात घालून शेतात पाणी पाजण्यासाठी जावे लागत आहे. यापूर्वीही बिबट्याचे दर्शन झाले आहे. आता पुन्हा एकाच वेळी तीन बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वनखात्याने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

अनुचित प्रकारास वनविभागच जबाबदार असेल
बिबटे असल्याचे वनविभागास कळवल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी येतात आणि बिबट्याचे ठसे पाहून निघून जातात. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी साधा सापळा लावण्याची तसदी घेतली जात नाही. पूर्ण वाढ झालेले तीन बिबटे असल्याने या बिबट्यांनी जर जनावरे अथवा स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ यांच्यावर हल्ला केल्यास त्यास सर्वस्वी वनविभागच जबाबदार असणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news