सातारा : रामराजेंची माढ्यातून लोकसभेसाठी चाचपणी?

सातारा : रामराजेंची माढ्यातून लोकसभेसाठी चाचपणी?
Published on
Updated on

फलटण, पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. रामराजे नाईक निंबाळकर यांची माढा लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. शनिवारी एका कार्यक्रमात आ. रामराजे ना. निंबाळकर व माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे एकत्र आल्याने पुढील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आ. रामराजे ना. निंबाळकर हे उमेदवार असतील का, अशी चर्चा सुरू आहे.

फलटण संस्थानचे अधिपती असलेले रामराजे ना. निंबाळकर हे विधान परिषदेचे दीर्घकाळ सभापती होते. सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते नेते आहेत. रामराजेंनी माढ्यातून लोकसभा लढवावी, यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार व अजित पवार उत्सुक आहेत. त्यामुळे रामराजेंनीही आता त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. यासंदर्भात आ. रामराजे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, कारूंडे येथे होणार्‍या चैतन्य जल प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मला निमंत्रण देण्यात आले होते ते स्वीकारूनच तिथे गेलो होतो. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कायमच मार्गदर्शन मला लाभत आलेले आहे.

आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठीसुद्धा विजयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शन मला नक्कीच मिळेल. रामराजेंच्या या सूचक विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 2009 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवून प्रचंड मताने ते लोकसभेवर गेले. मात्र, गत निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीकडून भाजपकडे गेली आहे. भाजपचे उमेदवार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव केला होता.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघावर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सज्ज झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून पुढील निवडणुकीत रामराजेंच्या उमेदवारीचा विचार केला जाईल, अशी चर्चा माढा मतदारसंघात आहे. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आ. रामराजे ना. निंबाळकर यांची निवड करण्यात आलेली होती. त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना रामराजेंची उपस्थिती दिसत आहे. त्यामुळे राज्यानंतर आता देशाच्या राजकारणात रामराजे दिसतील, अशाही चर्चा सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news