सातारा : फायरिंगची बंदूक सापडेना.. स्टेटस् वॉर थांबेना

सातारा : फायरिंगची बंदूक सापडेना.. स्टेटस् वॉर थांबेना
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा :  सातार्‍यातील नटराज मंदिर परिसरात भरदिवसा फायरिंग करुन अर्जून यादव उर्फ राणा याचा खून करणार्‍या टोळीला बेड्या ठोकल्या. मात्र पोलिसांना अद्याप त्याप्रकरणातील बंदूक सापडलेली नाही. दुसरीकडे भुईंज, वाईमधील पोरांमध्ये याच प्रकरणातील अनेक इन्स्टासाठी रील्स तर व्हॉट्सअप स्टेटसचा पाऊस पडत आहे. यामुळे सातारा पोलिसांना जणू ओपन चॅलेंज केले जात आहे.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला चॅलेंज देण्याच्या घटना सर्रास घडल्या असून अद्याप त्या थांबायच्या नाव घेईनात. पहिली गंभीर घटना सातार्‍यातील नटराज मंदिर परिसरात फायरिंगची आहे. मुळात या घटनेची सर्व पार्श्‍वभूमी वाई, भुईंज शहर आहे. एकेकाळी हे सर्वजण एकमेकांना घास भरवणारी पोरं. चार, पाच मोठी टाळकी पण त्यांनी इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप व फेसबुकवर चमकोगिरी करत लहान पोरांना आपलेसे केले.

त्यातूनच एकमेकांविरुध्द गटतट निर्माण होवून खटकाखटकी होवू लागली. यातूनच एकमेकांना संपवण्यासाठी हे तयार झाले पण सुपीक डोक्यात स्वत: समोर न राहता चेले बनलेल्या बारक्या पोरांना हाताशी धरुन त्यांची ढाल करत त्याचा खूबीने वापर करण्यास सुरुवात झाली. राणाचा मर्डर हा कोल्ड ब्लडेड मर्डरचे उदाहरण आहे. जी बारकी पोरं आहेत त्यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी बेताची. त्यामुळे आपल्याला भाई काही कमी पडू देत नाही. खायला खच्चून मिळते, यामुळे भाईचा शत्रू तो आपला शत्रू. हे गणित त्यांच्या डोक्यात बसवले गेले.

मर्डरची पहिली स्टेप झाल्यानंतर कोणी काय बोलायचे व शेवटपर्यंत त्याच मुद्यांवर कसे ठाम रहायचे ही स्टोरी ठरलेली. त्यानुसार आतापर्यंत होत आहे. कारण पोलिसांना अद्याप फायरिंग झालेली बंदूक मिळालेली नाही. शहर पोलिसांना त्यात यश नाही. घटनास्थळी पुंगळ्या व मृतदेहामध्ये सापडलेल्या गोळ्या या असल्यातरी बंदूक सापडणे, शोधणे हे तितके महत्वाचे आहे. राणाच्या मर्डरप्रकरणी संशयितांची पोलिस कोठडी आज संपत आहे. यामुळे पुढे आणखी कोठडी वाढवून मिळणार की त्यांची रवानगी जेलात होणार हे काही तासात स्पष्ट होईल.

दरम्यान, अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहातून पुन्हा चौकशीसाठी ताबा घेतला जाईल. यामुळे बंदूक सापडणार की नाही? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. राणाच्या हत्येनंतर संशयित आरोपींच्या आपण कसे पाठीशे आहे? हे दाखवण्यासाठी वाईतील काही बहाद्दर सक्रीय आहेत. यासाठी सोशल मीडियावर तसे स्टेटस ठेवले जात आहेत. एवढ्यावरच न थांबता तक्रारदार कुटुंबिय ज्या परिसरात राहतात तेथे फटाके उडवणे, आरडाओरडा करत जाणे, असे प्रकार घडत असल्याचे वास्तव आहे.

त्या पोरांची उचलबांगडी सुरु… 

वाईतील हत्याकांड प्रकरणात वाई पोलिस सतर्क झाले आहेत. सोशल मीडियावर जे कोणी आक्षेपार्ह स्टेटस ठेवत आहे त्यांच्यावर पोलिस वॉच ठेवून आहेत. पोलिसांकडे बहुतेक पोरांचे मोबाईल नंबर मिळाले आहेत. पोलिस स्वत: लक्ष ठेवून असतानाच जे माहिती देतील त्याची खातरजमा करुन अशा पोरांची लिस्ट बनवून त्यांची उचलबांगडी केली जात आहे. प्रसंगी संशयितांचा एफआयआर दाखल करण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिस सतर्क असतानाच संबंधितांची जे माहिती देतील त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सातार्‍यातील बकासूर गँग…

सातारा शहरात दोन दिवसांपूर्वी बकासूर गँगच्या नावाने काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ही टोळी अचानक सक्रीय होवून धुडगूस घालू लागली होती. मात्र ते दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने आता त्यांची लवकर सुटका होणार नाही. मात्र या टोळीची रील्स, व्हिडीओ व्हायरल होत असल्याने शाहूपुरी पोलिस सतर्क झाले आहेत. जे या टोळीमध्ये आहेत त्यांना पाठींबा देत आहेत त्यांचा डाटा एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे येत्या काही दिवसात या टोळीला पोलिस सरळ करतील अशी, अपेक्षा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news