सातारा : पेठ रचनेचा साक्षीदार होणार इतिहासजमा

सातारा : पेठ रचनेचा साक्षीदार होणार इतिहासजमा
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा शहरातील पेठ रचनांचा एकमेव साक्षीदार असलेला पेठ बुधवार असा लिहलेला बोर्ड काही दिवसांमध्ये इतिहासजमा होणार आहे.
सातारा शहराची काही महिन्यांपूर्वी हद्दवाढ झाल्यानंतर मोठ्या भागाचा शहरात समावेश झाला आहे. यानंतर भविष्यात याचा आणखी विस्तार होऊन सातार्‍याची प्रवेशद्वारे बदलणार आहेत. याच सातार्‍यात 60-65 वर्षापूर्वी पेठांची रचना करण्यात आली. त्यावेळी नगरपालिकेने या पेठांची नावे असलेले लाकडी बोर्ड तयार करून ते पेठ सुरू होणार्‍या घरांवर लावले होते. त्यामधील पेठ रचनांचा एकमेव साक्षीदार असलेला पेठ बुधवार असा लिहलेला बोर्ड काही दिवसांमध्ये इतिहासजमा होणार आहे.

पेठेची हद्द सुरू होणार्‍या घरांवर त्या-त्या पेठेचे नाव असलेला एक बाय अडीच फूट असा लाकडी बोर्ड तयार करून तो लावला होता. यानंतर शहराचा विस्तार वाढला, जुने वाडे, जुनी घरे पाडून त्या जागी टोलेजंग अपार्टमेंट उभी राहिली. या स्थित्यंतरात शहराच्या पेठ रचनेचा एक भाग असलेले लाकडी बोर्ड नामशेष झाले. मागील काही वर्षांपर्यंत शहरात असे केवळ दोनच बोर्ड अस्तित्वात होते. त्यामध्ये 'रामाचा गोट' अशी अक्षरे कोरलेला एक बोर्ड आणि 'पेठ बुधवार' (आता आपण उच्चार करतो तसे बुधवार पेठ नव्हे) असे दोनच बोर्ड टिकून होते. 'रामाचा गोट' हा बोर्ड इतिहासजमा झाल्यानंतर केवळ पेठ बुधवार हा एकमेव बोर्ड आपले अस्तित्व टिकवून होता. ज्या घरावर हा बोर्ड लावण्यात आला होता त्या घराच्या जागी आता इमारत उभी राहत असल्याने हा बोर्डही आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.

सातारा शहरातील सर्वात मोठी पेठ अशी ओळख असलेल्या शनिवार पेठेचे टोक असलेल्या घरावर असलेला हा तत्कालीन नगरपालिका प्रशासनाचा अविभाज्य घटक येत्या काही दिवसातच इतिहासजमा होणार आहे.

लाकडी बोर्डमुळे पेठेची हद्द समजणे सोपे

सातारा शहर रचनेचा शेवटचा साक्षीदार असलेल्या या लाकडी बोर्डची त्या अर्थाने उपयुक्तता संपुष्टात आली असली तरी कोणे एके काळी याच लाकडी बोर्डमुळे बुधवार पेठ नेमकी कुठे सुरू होते आणि शनिवार पेठ नेमकी कुठे संपते हे कळत होते. सध्या पेठांची नावे हा केवळ सरकारी दप्तराचा एक भाग झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news