सातारा जिल्ह्यात घरच्या घरी कोरोना बाधित ठणठणीत

Treatment at home is always good
Treatment at home is always good

सातारा ; विशाल गुजर : देशासह राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला असून जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्क्यांवर असला तरी जिल्हावासीयांना घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही.

'पुढारी'ने याची गांभीर्यता पडताळून पाहण्यासाठी कोरोना आकडेवारीचे 'टेक्निकल अ‍ॅनालिसिस' केले असता प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र दिसून आलेे. गेल्या 12 दिवसांत जिल्ह्यात 4 हजार 826 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील फक्त 184 जण हॉस्पिटलमध्ये दाखल असून पैकी केवळ चौघे व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे एकूण बाधितांपैकी अवघे 3.81 टक्के रुग्ण अ‍ॅडमिट होत असून अनेक बाधित हे घरच्या घरी ठणठणीत होत आहेत.

ओमायक्रॉन आला, ओमायक्रॉन आला आता पॉझिटिव्ह रेट वाढू लागला. मात्र, 'पुढारी'ने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेतील आकडेवारीचा धांडोळा घेतला असता परिस्थिती पहिल्या किंवा दुसर्‍या लाटेइतकी भीषण नसल्याचे चित्र आहे. तरीही जिल्हावासीयांनी कोरोना नियम पाळणे अत्यंत गरजेचे व आवश्यक बनले आहे.

जिल्ह्यात पहिल्या लाटेत रोज 20 ते 30 जणांचे बळी जात होते. पहिली लाट संपल्यानंतर एप्रिल-मे मध्ये दुसरी लाट आली. या लाटेत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने धुमाकूळ घातला. रोज 40 ते 50 जणांचे बळी गेल्याने स्मशानभूमी दिवसरात्र जळत होती. सिव्हील आणि स्मशानभूमी परिसरात नातेवाईंकांच्या आक्रोशाने परिसर हेलावून जात होता. त्यामुळे जिल्ह्यावर जणू काही मृत्यूचे सावट निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. आता ओमायक्रॉनने जिल्ह्यात एन्ट्री केली आहे. ओमायकॉनचे 13 बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ओमायक्रॉनच्या विषाणूमुळेच तिसरी लाट आली आहे. त्यामुळे गेल्या 12 दिवसांमध्ये रोज पॉझिटिव्हीटी रेटमध्ये वाढ होत आहे. शुक्रवारी 981 बाधित आढळले तर पॉझिटिव्हीटी रेट 18.41 टक्के राहिला. मोठया प्रमाणात बाधित येत असले तरी त्यातील 95 ते 97 टक्के लोकांना घरीच क्वारंटाईन केले जात आहेत. आतापर्यंत वयोवृध्द असणार्‍या 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रूग्ण गंभीर होत नसल्याने घरच्या घरीच उपचार केले जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे आता अवघ्या 7 दिवसातच रूग्ण बरे होवू लागले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. एवढ्या मोठया प्रमाणात रूग्ण आले तरी हॉस्पिटल आणि कोरोना सेंटर बर्‍यापैकी रिकामीच आहेत.

जिल्ह्यात एकूण 4 हजार 597 बेडस् आहेत. त्यापैकी 184 बेडच उपयोगात असून तब्बल 4 हजार 413 बेड रिक्त आहेत. या सर्व आकडेवरून सातारा जिल्ह्यातील परिस्थिती तशी गंभीर नसल्याचे चित्र आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी गर्दी करणे टाळावे. तसेच कोरोना त्रिसूत्रीची कडक अंमलबजावणी करावी. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून पूर्व तयारी केली जात आहे. बाधितच होवू नये यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे.

गत काही दिवसांमध्ये हजारोंच्या संख्येने बाधित आढळले असले तरी गृहविलगीकरणात बरे होणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे.तिसर्‍या लाटेत बाधितांना सौम्य लक्षणे दिसत आहेत. त्यामागचे कारण म्हणजे वेगाने झालेले लसीकरण. नागरिकांचा पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी कल वाढवला आहे. त्यामुळे लक्षणे सौम्य दिसत आहेत. पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहेत. लसीकरणावर प्रशासनाकडून भर दिला जात असून राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. – डॉ. सुभाष चव्हाण जिल्हा शल्य चिकीत्सक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news