सातारा : पुढारी वृत्तसेवा
कृषिपंप थकबाकीतून मुक्त होण्यासाठी सरकारने लागून केलेल्या 'कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020' या योजनेची मुदत 31 मार्चला संपणार आहे. या योजनेचा सातारा जिल्ह्यातील 1 लाख 34 हजार 554 शेतकर्यांनी लाभ घेतला आहे. त्यातील 70 हजार 234 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. या योजनेसाठी अखेरचे 9 दिवस शिल्लक राहिले आहेत.
पुढील तीन महिन्यांमध्ये थकबाकीमुळे कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार नाही. तथापि, या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ 9 दिवस शिल्लक आहे. त्यामुळे योजनेत सहभागी होणार्या थकबाकीदार शेतकर्यांना जलदगतीने सहकार्य केले जात आहे. योजनेचे अखेरचे काही दिवस राहिल्याने या योजनेचा लाभ घेवून आपले वीज बिल कोरे करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 1 लाख 83 हजार 973 शेतकर्यांकडे एकूण 777 कोटी 95 लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील महावितरणकडून निर्लेखन तसेच व्याज व दंड माफी आणि वीज बिल दुरुस्तीनंतर समायोजनेतून या शेतकर्यांकडे आता 619 कोटी 64 लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील 50 टक्के रक्कम येत्या दि. 31 मार्च 2022 पर्यंत भरल्यास उर्वरित 50 टक्के थकबाकी म्हणजे 309 कोटी 82 लाख रुपये माफ होणार आहे व वीजबिल देखील संपूर्ण कोरे होणार आहे.
आतापर्यंत 1 लाख 34 हजार 554 शेतकर्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदवला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी 283 कोटी 98 लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकर्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी एकूण 202 कोटी 52 लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये 70 हजार 234 शेतकरी वीज बिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीज बिलासह सुधारित थकबाकीची 50 टक्के रक्कम असा एकूण 201 कोटी 63 लाखरुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी 107 कोटी 20 लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.