सातारा : किल्‍ले अजिंक्यतारावरती सापडली तिजोरी

किल्ले अजिंक्यतार्‍यावर स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडलेली तिजोरी.
किल्ले अजिंक्यतार्‍यावर स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडलेली तिजोरी.
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : किल्‍ले अजिंक्यतारा वरती सापडली तिजोरी सापडली आहे.

किल्‍ले अजिंक्यतारा या स्वराजाची राजधानी असलेल्या किल्ल्यावर सुमारे 9 शतकांचा इतिहास आहे. परंतु, या गडाला वैभव लाभले ते छ. शिवरायांचे नातू व सातार्‍याचे संस्थापक छ. शाहू महाराज (थोरले) यांच्या काळात. याच अजिंक्यतार्‍यावर राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत एक लोखंडी तिजोरी आढळली आहे. जाणकारांच्या मते ही तिजोरी ब्रिटिशकालीन आर्म बॉक्स म्हणजे बंदुकांची काडतुसे ठेवण्यासाठी असावी असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. दरम्यान, अशाच दोन लोखंडी तिजोरी चौथर्‍यानजीकच्या ढिगार्‍यात असून, लवकरच त्या पेट्या बाहेर काढण्यात येणार आहेत.

राजा शिवछत्रपती परिवाराकडून सध्या जिल्ह्यातील चार ते पाच गडांवर स्वच्छता मोहीम सुरू आहे. दि. 11 रोजी या परिवारातील जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे व सदस्य किल्ल्यावरील मुख्य राजवाड्यानजीक स्वच्छता करीत असताना त्यांना एका चौथर्‍याचा एक भाग द‍ृष्टिक्षेपात आला.

उत्सुकतेपोटी या सदस्यांनी या चौथर्‍याची स्वच्छताही केली. याचदरम्यान चौथर्‍यानजीक असलेल्या मातीच्या ढिगार्‍याखाली असलेल्या लोखंडी पेटीचा काही भाग या सदस्यांना आढळला. सर्वांनी मिळून ही पेटी बाहेर काढली. त्यावेळी ही भक्कम बांधणीची पेटी अर्धवट 30 अंशाच्या कोनात उघड्या अवस्थेत होती आणि पेटी कौलांचे तुकडे व मातीने भरलेली होती. ही लोखंडी पेटी स्वच्छ केली असता तिची वेगळ्या अशा भक्कम बांधणीमुळे या पेटीचे नेमके प्रयोजन लक्षात येत नव्हते. 1818 मध्ये मराठेशाहीचा अस्त झाल्यानंतर किल्ले अजिंक्यतार्‍याचा ताबा ब्रिटीशांकडे आला आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत किल्ल्यावर ब्रिटीशांचा ताबा होता. याच कालावधीत किल्ल्याच्या संरक्षणासाठी असलेल्या ब्रिटीश फौजेकडील बंदुकीच्या काडतूसे ठेवण्यासाठी भक्कम अशा लोखंडी पेट्या खास आयात केल्या असाव्यात. या पेटीची बांधणी अत्यंत भक्कम अशा लोखंडी किंवा पोलादाच्या पत्र्यापासून केली असावी कारण दीडशे -दोनशे वर्षानंतरही या पेटीचा भक्कमपणा नजरेस येत आहे. शिवाय ही पेटी अंदाजे 100 ते 125 किलो वजनाची असावी असा अंदाज आहे.

मुंबई संग्रहालयाकडे पत्रव्यवहार…

अजिंक्यतारा येथील चौथर्‍यानजीक ढिगार्‍यात एक ब्रिटिशकालीन तिजोरी आहे. अजून एक तिजोरी असून, त्याठिकाणी आणखी काही ब्रिटिशकालीन वस्तू आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई येथील संग्रहालय संचालकाकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्याबाबत परवानगी आल्यास त्या परिसरात खोदकाम करून इतिहासकालीन वस्तू काढण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news