सातारा : अल्पवयीन गुन्हेगारीविरोधात ‘पुढारी’ची जनजागृती

सातारा : अल्पवयीन गुन्हेगारीविरोधात ‘पुढारी’ची जनजागृती
Published on
Updated on

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक खपाचे व निर्भीड तसेच प्रभावशाली दैनिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या 'पुढारी'चा 84 वा वर्धापनदिन आज रविवार दि. 1 जानेवारी रोजी दणक्यात साजरा होत आहे. यानिमित्ताने 'पुढारी'ने अल्पवयीन गुन्हेगारीच्या विरोधात जनजागृती मोहीम राबवण्याचा संकल्प केला असून अल्पवयीन गुन्हेगारांना संस्कारक्षम पुस्तके देऊन त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी जागृतीची मोहीम राबवली जाणार आहे. आजच्या वर्धापनदिनापासून हा विधायक उपक्रम वर्षभर राबवला जाणार आहे. त्यामुळे 'पुढारी'ला शुभेच्छा देण्यासाठी आज यायला तर लागणार आहेच पण येताना बुके आणणारच असाल तर त्याऐवजी संस्कारक्षम पुस्तके आणून 'पुढारी'च्या या सामाजिक उपक्रमात आपलाही खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन 'पुढारी'च्या वतीने करण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या दै. 'पुढारी'चा वर्धापनदिन आज रविवारी दणक्यात व जल्लोषात साजरा होत आहे. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र, राजपथ, सातारा येथे सायंकाळी 6 ते 8 या वेळेत साजर्‍या होणार्‍या स्नेहमेळाव्यात 'पुढारी'वर भरभरुन प्रेम करणार्‍या स्नेहीजणांची आगळी-वेगळी मैफील रंगणार आहे. 'पुढारी'ने सर्वच क्षेत्रावर प्रभाव कायम राखतानाच सेवाव्रती कार्याचा वास्तूपाठही घालून दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी वर्धापनदिनाच्या नयनरम्य स्नेहमेळाव्यात विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही असाच अनोखा व सामाजिक उपक्रम घेवून 'पुढारी' येत आहे.

सातारा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलांमध्ये वाढणार्‍या गुन्हेगारीचे भीषण वास्तव आता लपून राहिलेले नाही. अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. शिकण्या-सवरण्याच्या वयात हातात पेन, पुस्तके घेण्याऐवजी रिव्हाल्वर, चाकू, सुरे घेणार्‍या अल्पवयीन मुलांच्या भविष्याचे पुढे काय होणार? अशी चिंता सातारकरांना लागून राहिली आहे. म्हणूनच या गुन्हेगारीविरोधात 'पुढारी' जनजागृतीची मोहीम उघडत आहे.

'पुढारी'ने नेहमीच सामाजिक संवेदनशिलता जपण्याचे काम केले असून ही मोहीम हा त्याचाच एक भाग आहे. आजच्या स्नेहमेळाव्याला जिल्हावासिय मोठ्या उत्साहाने हजेरी तर लावणारच आहेत, 'पुढारी'सोबतचे जिवाभावाचे, आपुलकीचे ऋणानुबंध पुन्हा नव्याने गुंफणारच आहेत. फक्त येताना शुभेच्छा देण्यासाठी फुलांचे बुके आणण्याऐवजी संस्कारक्षम पुस्तके आणण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आपण आणलेली ही पुस्तके अल्पवयातच गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेल्या मुलांना संस्कारक्षम घडवण्यासाठी मोलाची भर घालणार आहेत.

वाचनीय, आदर्श व्यक्तीमत्वावरील अशी संस्कारक्षम पुस्तके गुन्हेगारीकडे प्रवृत्त होणार्‍या अल्पवयीन मुलांना त्यापासून निश्चितपणे रोखणार आहेत. 'पुढारी' वर्षभर हा विधायक व जनजागृतीचा उपक्रम राबवणार आहे. त्यामधून जमा होणारी संस्कारक्षम, आदर्श व्यक्तीचरित्रे असणारी तसेच थोरांची आत्मचरित्रे अशी पुस्तके अल्पवयीन मुलांसाठी वाटप केली जाणार आहेत. 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुण्यतिथीदिनी जिल्ह्यातील बालसुधारगृहे, अनाथाश्रम, वाचनालये आदी ठिकाणी ती दिली जातील. पुढारीचा हा उपक्रम अल्पवयीन मुलांच्या जडणघडणीत मोलाची भर घालणारा ठरेल.

पोलिस करमणूक केंद्रात स्नेहमेळावा

'पुढारी' वर्धापनदिन आनंद सोहळ्याचा निर्णायक क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपला आहे. रविवारी सकाळी सातारा कार्यालयात पुढारीचे संस्थापक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 ते 8 या वेळेत पुढारी कार्यालयासमोरील पोलिस करमणूक केंद्र, राजपथ सातारा येथे होणार्‍या स्नेहमेळाव्याचीही जय्यत तयारी झाली आहे. या स्नेहमेळाव्याला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन टीम 'पुढारी'ने केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news