सातारा : अबब! डोस न घेताच लसीचे प्रमाणपत्र

सातारा : अबब! डोस न घेताच लसीचे प्रमाणपत्र
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात कोरोना डोस न घेताच लसीचे प्रमाणपत्र दिल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. लसीकरणाबाबतच्या अनेक घटना बुचकळ्यात टाकण्यासारख्या घडत आहेत. कुणाला डोस न घेताही लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळते, तर कुणाला सेकंड डोस घेतल्यानंतरही लस घेतली नसल्याबाबत मेसेज व फोन येऊ लागले आहेत.

याबाबत दै. 'पुढारी'कडे अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांच्या मुळापर्यंत गेल्यानंतर मात्र धक्कादायक वास्तव समोर आले. जिल्ह्यातील जवळपास 550 तक्रारींचा पाढा प्रशासकीय यंत्रणेकडे वाचला गेल्याचे स्पष्ट झाले. सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे हा सावळागोंधळ उडाल्याचे जिल्हा लसीकरण विभागाकडून सांगण्यात आले.

सातारा जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 11 लाख 22 हजार 498 जणांचे लसीकरण झाले असून, त्यात पहिला डोस 8 लाख 47 हजार 191 जणांनी घेतला आहे, तर 2 लाख 75 हजार 307 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. डोसच्या पुरवठ्याबाबत आजही अनेक अडचणी आहेत. पुरेशी लस उपलब्ध होत नाही.

मात्र, सुरू असलेल्या लसीकरणाबाबत सावळा गोंधळ असल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. विशेषत: लसीकरणाचे दोन्ही डोस झाल्यानंतर प्रमाणपत्र ऑनलाईनद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. लसीचा पहिला व दुसरा डोस घेतल्यानंतर संबंधित लसीकरण केंद्र याबाबतचे छापील प्रमाणपत्र ऑनलाईनवर अपलोड करते.

या प्रमाणपत्रात एक क्यूआर कोड देण्यात आलेला असतो. त्याची ई कॉपी मिळवण्यासाठी संबंधिताला स्कॅन करावे लागते. हे प्रमाणपत्र कोविन पोर्टलवरून किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपवरून डाऊनलोड करण्याची सोय आहे. लस घेतल्याचा अधिकृत दाखला म्हणून हे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते. या प्रमाणपत्राबाबत सातारा जिल्ह्यातून मोठ्या तक्रारी आता समोर येताना दिसत आहेत.

याबाबत काही तक्रारदारांनी दै. 'पुढारी'कडे धाव घेतली. त्यांनी लसीकरण प्रमाणपत्राबाबत झालेल्या सावळागोंधळाची कहाणी कथन केली. त्यातील एकेक किस्से भन्नाट आहेत. तक्रारींचे स्वरूप व्यापक जाणवल्यानंतर संबंधित यंत्रणेकडे याबाबतची माहिती घेतली. त्यावेळी यंत्रणेनेही तक्रारींबाबत दुजोरा दिला. जिल्ह्यात अशा प्रकारच्या सुमारे 550 तक्रारी असल्याचे या यंत्रणेकडून सांगण्यात आले.

लस न घेताच लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याची तक्रार सातार्‍यातील उज्ज्वला पाटील यांनी प्रतिनिधिक स्वरूपात दै.'पुढारी'कडे केली. त्याचवेळी सातार्‍यातील सौ. अर्चना कदम यांनीही आपल्याबाबत असाच प्रकार घडल्याचे सांगितले. या तक्रारदारांनी लस घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन केले होते. मात्र, संबंधित वेळेत त्यांना केंद्रावर जाऊन लस घेता आली नाही.

मात्र, सायंकाळी त्यांच्या मोबाईलवर लस घेतल्याचा अधिकृत मेसेज आला.त्यामुळे या तक्रारदारांनी कोविन अ‍ॅपवर जाऊन याबाबतची पडताळणी केली. तेव्हा मात्र लस घेतल्याचे प्रमाणपत्र यंत्रणेकडून अपलोड केल्याचे निदर्शनास आले. लस न घेताही लस मिळाल्याचे प्रमाणपत्र पाहून हे तक्रारदार चक्रावून गेले. त्यांनी तडक दै.'पुढारी'कडे येऊन गार्‍हाणे मांडले. त्यानंतर अनेकांनी अशाच तक्रारी केल्या.

एकीकडे लस न घेता असे प्रमाणपत्र मिळत असताना दुसरीकडे वेगळेच किस्से घडले आहेत. पहिला व दुसरा डोस घेतल्यानंतरही आपला दुसरा डोस घेतला गेला नसल्याचे मेसेज व फोन संबंधित नागरिकांना आले आहेत. या तक्रारीही दै. 'पुढारी'कडे प्राप्त झाल्या आहेत. मंगळवारपेठ सातारा येथील रघुवीर महाजनी यांनी 2 मार्च व 28 एप्रिल या दिवशी लसीचे दोन्ही डोस घेतले.

मात्र, तरीही त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी फोन व मेसेजही आले. त्यांनी संबंधित फोनवर माझा दुसरा डोस झाला असल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतरही दुसरा डोस घेण्याबाबत महाजनी यांना फोन करण्यात आले. त्यांनी पहिला डोस घेतला, त्यावेळी त्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. दुसरा डोस घेतल्यानंतरही त्यांना पहिलाच डोस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले. असाच प्रकार राजेंद्र कदम यांच्याबाबतही घडला आहे. याच स्वरूपाच्या अन्य तक्रारीही झाल्या आहेत.

आता लस न घेताच सर्वसामान्य लोकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळू लागले तर काय करायचे? एका बाजूला लस न घेताच प्रमाणपत्र दिले गेले आहे. संगणकावर त्याची तशी नोंद केली आहे. त्यामुळे त्यांना आता दुसरा डोस मिळत नाही. डोस मिळाला नाही तर काय करायचे?

तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेशी दै.'पुढारी'ने संपर्क साधला. त्यावेळी अशा तक्रारी आल्या असल्याची कबुली त्यांच्याकडून देण्यात आली. लसीचे डोस घेतल्यानंतर त्याची नोंदणी संगणकावर करण्याची जबाबदारी संबंधित केंद्रावरील डेटा ऑपरेटरची असते. त्याने याबाबतची अचूक माहिती अपलोड करणे क्रमप्राप्त असते. या प्रक्रियेत त्रुटी राहिल्यास प्रमाणपत्राबाबत सावळा गोंधळ होऊ शकतो. संबंधित सॉफ्टवेअरमध्ये पहिल्यापासूनच प्रॉब्लेम असल्याचे लसीकरण विभागाचे नोडल ऑफिसर डॉ. प्रमोद शिर्के यांनी सांगितले.

एका मोबाईल नंबरवरून चार-चार जणांचे रजिस्ट्रेशन होते. काहीजण चुकीचा मोबाईल नंबरही देतात आणि लसीचा लाभ घेतात. त्यामुळे दुसर्‍याच व्यक्तीला एसएमएस जात असल्याचे या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासूनच सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम आहे. अनेकांना लस न घेताच लस घेतल्याचे एसएमएस आले आहेत, तर काहींना लस घेऊनही एसएमएस आले नाहीत. याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यांची शहानिशा सुरू आहे. याबाबत जि. प. आरोग्य विभागाकडून शासनाच्या आरोग्य विभागास अशा घटना सर्टिफिकेटसह मेल केल्या आहेत.
– डॉ. प्रमोद शिर्के,
नोडल ऑफिसर, जिल्हा लसीकरण विभाग

तिसरा डोस घ्यायचा का?

काही दिवसांपूर्वी दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांनादेखील पुन्हा डोस घेण्याबाबतच्या सूचना प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील सावळागोंधळ समोर आला आहे. अनेकांना डोस न घेताच प्रमाणपत्र पाठविण्यात आले. त्यामुळे असे नागरिक बुचकळ्यात पडले. लस तर घेतली नाही अन् प्रमाणपत्र मिळाले. आता खरोखरच लस घ्यायला गेल्यानंतर ती मिळणार का? या विवंचनेत हे नागरिक पडले आहेत. तर, ज्यांना दोन्ही डोस घेतल्यानंतरही दुसरा डोस घेण्यासाठी मेसेज व फोन आले आहेत. त्यांना प्रमाणपत्र मिळणार कसे? मग तिसरा डोस घ्यायचा का, म्हणजे प्रमाणपत्र मिळेल. अशा शंकांनी भंडावून सोडले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news