साखर कारखाना निवडणुकीने गटबाजीला ऊत

file photo
file photo
Published on
Updated on

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. त्या पाठोपाठ बाजार समित्या निवडणुका सुरू होणार आहेत. मार्च महिन्यातील सुनावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे भवितव्य स्पष्ट होईल; मात्र साखर कारखान्यांच्या निवडणुकीतून राजकीय ध्रुवीकरणाला सुरुवात झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने हे नेत्यांचे आर्थिक गड आहेत. त्यावरील कब्जा टिकविण्यासाठी आणि कब्जा मिळविण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक जीव तोडून मेहनत घेत आहेत. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. साम, दाम, दंड, भेद वापरून जिंकणे हे एकमेव उद्दिष्ट निवडणुकीत असते. त्यामुळे कोणी काही प्रलोभन दाखविले यापेक्षा आणि त्यावर तक्रार करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा हात ढिला सोडण्यातच भूषण मांडले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर आता कुंभी-कासारी साखर कारखान्यापासून जिल्ह्यातील निवडणुका सुरू झाल्या आहेत.

काका-पुतण्यांचे सुरुवातीला सख्य आणि नंतर वैर हे राज्याच्या राजकारणातील चित्र येथेही अनुभवायला मिळत आहे. जिल्हा काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्या विरोधात त्यांचे एकेकाळचे सहकारी गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी दंड थोपटले होते. त्यांनी पी. एन. पाटील यांच्या विरोधात आपला पुतण्या व कुंभी-कासारीचे चेअरमन चंद्रदीप नरके यांना दोन वेळा आमदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या निवडणुकीत काका-पुतण्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. अरुण नरके यांनी आता पुतण्याचा हात सोडून पी. एन. पाटील यांना साथ देण्याचे ठरविले आहे. येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीच्या द़ृष्टीने या राजकीय ध्रुवीकरणाला महत्त्व दिले जात आहे. आगामी काळात आ. पी. एन. पाटील अध्यक्ष असलेल्या भोगावती साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. कुंभी-कासारीचे मतदान होण्यापूर्वीच चंद्रदीप नरके यांनी त्यांच्या विरुद्ध शड्डू ठोकला आहे. त्यामुळे विधानसभेपूर्वी आणखी एका आखाड्यात नरके-पाटील सामना रंगणार आहे.

छत्रपती राजाराम कारखान्यात महादेवराव महाडिक विरुद्ध सतेज पाटील या पारंपरिक विरोधकांत फड रंगणार आहे. त्याची सुरुवात ब वर्ग सभासद संख्येच्या दाव्यावरून सुरू झाली आहे. बिद्री कारखान्यात मेहुणे -पाहुणे यांच्यातील आखाडा गाजणार आहे. गेले काही वर्षे 'बिद्री'चे अध्यक्ष के. पी. पाटील व त्यांचे मेहुणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यातील छुपा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. बिद्री कारखान्याच्या माध्यमातून याला तोंड फुटणार आहे. के. पी. पाटील यांचे काही काळचे निकटवर्ती प्रकाश आबीटकर यांनी के. पी. पाटील यांना पराभूत करून दोनवेळा आमदारकी मिळविली आहे. आता तिसर्‍यांदा त्यांच्यात संघर्ष होणार आहे. राष्ट्रवादीकडे तिकिटासाठी मेहुणे आणि पाहुणे असे दोन पर्याय आहेत. त्यापैकी कोणता पर्याय ते स्वीकारणार त्यावर तिथली विधानसभेची लढाई अवलंबून असेल; मात्र साखर कारखान्याच्या माध्यमातून सुरू झालेला संघर्ष आणि गटातटातील लढाई विधानसभेपर्यंत अधिक तीव्र होणार आहे.

लोकसभा वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आव्हाने -प्रतिआव्हानांची भाषा सुरू झाली आहे. खा. संजय मंडलिक व खा. धैर्यशील माने हे दोघेही सध्या शिंदे गटात आहेत. त्यांना आव्हान देण्याची भाषा सुरू झाली आहे. मंडलिक यांच्या विरोधात चेतन नरके दंड थोपटणार काय की हसन मुश्रीफ यांनी जाहीर केल्याप्रमाणे व्ही. बी. पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार होणार, याकडे लोकांचे लक्ष आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मात्र धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी यांच्यातील लढाई निश्चित आहे. शेट्टी यांनी पराभवाचा वचपा काढण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभेचा निकाल विधानसभेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर वार्तापत्र

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news