सांगोला तालुका दुष्काळाच्या छायेत

दुष्काळी यादी
दुष्काळी यादी

महूद : पुढारी वृत्तसेवा :  ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढा तालुक्याची जशी देशभर ओळख आहे, तशीच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादनासाठी सांगोला तालुका जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. परंतु सांगोल्याच्या डाळिंबाला जणू कुणाची नजर लागावी त्या पद्धतीने गेल्या काही वर्षांत तेल्या, मर आणि पिन होल बोरर नावाच्या रोगामुळे सांगोला तालुक्यातील डाळिंबाच्या बागा नामशेष झाल्या. आधीच डाळिंबामुळे उद्ध्वस्त झालेला सांगोला तालुक्यातील शेतकरी यंदा खरीप हंगामाकडे खुप आशेच्या नजरेने पाहत होता मात्र नारळी पौर्णिमा होऊन गेली तरीही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सांगोला तालुक्यातील शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला आहे.

नारळी पौर्णिमेला दर्यात नारळ पडला की, परतीच्या मान्सूनचा सांगोला तालुक्यात आणि सर्वच दुष्काळी भागात दमदार पाऊस सुरू होतो, अशी येथील शेतकर्‍यांची पारंपरिक भाबडी समजूत आहे. परंतु नारळी पौर्णिमा उलटली तरीही यंदा पाऊसाचे चित्र दिसेना झाल्याने सांगोला तालुक्यातील शेतकर्‍याना दुष्काळाचे गडद सावट दिसू लागले आहे.

खरीप हंगामाच्या सुरवातीला रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या रिमझिम पावसाच्या भरवश्यावर डाळिंबाने हुलकावणी दिलेल्या सांगोल्यातील शेतकर्‍यांनी मका, बाजरी, सूर्यफूल भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली होती. परंतु रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्वसु, पुष्य आणि आश्लेषा या हमखास पाऊस पडणार्‍या नक्षत्रात एकही दमदार पाऊस न झाल्याने रानातील ही उभी पिके आता पाण्याअभावी आता करपू लागली आहेत. आधीच डाळिंबाने भ्रमनिरास केल्याने सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांना यंदा भुसार शेती पिकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र पाऊसाने पाठ फिरवल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच अवस्था सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांची झाली आहे.

गतवर्षी झालेल्या पावसाची तुलना करता यंदा आजअखेर सर्वात कमी पाऊस झालेला तालुका म्हणून जिल्ह्यात सांगोला तालुक्याची नोंद झाली आहे. सुमारे 225 मि.मी. इतक्या सरासरी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र सांगोला तालुक्यात फक्त 162 मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. निम्मा पावसाळा उलटला, हमखास पाऊस पडणार्‍या नक्षत्रांनी दडी मारली, दरवर्षी मोठे आर्थिक उत्पन्न देणार्‍या डाळिंबासारखे हुकुमाचे पीक नामशेष झाले आणि खूप आशा असणार्‍या खरीप हंगामानेही मोठा अपेक्षाभंग केल्याने सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांची अवस्था दयनीय झाली आहे.

पावसाने जोरदार पुनरागमन न केल्यास दरवर्षीप्रमाणे यंदाही सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वाट्याला परंपरेने दुष्काळच येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

वरदायिनी माणगंगाही कोरडीच..!
सांगोला तालुक्यातील तब्बल 15 ते 20 गावांतून गेलेली आणि माणदेशाची वरदायिनी अशी ओळख असलेली माणगंगा नदीही यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरीही कोरडीच आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांसमोर शेतीच्या पाण्यासह जनावरांच्या आणि पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट उभे राहू लागले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news