सांगली : हळदीच्या बाजारपेठेला चालना मिळणार

सांगली : हळदीच्या बाजारपेठेला चालना मिळणार

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात हळदीवर अडत्यांकडून आकारण्यात येणारी जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा मार्केट यार्डातील अडते आणि खरेदीदार यांना दिलासा मिळाला आहे. परिणामी, हळदीची आवक वाढणार आहे. यातून बाजारपेठेला आणखी चालना मिळणार आहे.

दरम्यान, मार्केट यार्डात गेल्या सप्ताहात गूळ, सोयाबीन आवकेत वाढ झाली. बेदाणा आणि मिरची आवक घटलेली आहे. बहुतेक शेतमालाचे दर स्थिर राहिले.

या ठिकाणी स्थानिक हळद मोठ्या प्रमाणात आवक होते. बहुतेक हळद ही शेतकर्‍यांची असते. हळदीवर जीएसटी लावण्याचा निर्णय सरकारने सन 2017 मध्ये घेतला. त्यानंतर जीएसटी हटवण्यात यावा, या मागणीसाठी बाजार समिती, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स यांनी प्रयत्न केले. अखेर त्याला या सप्ताहात यश आले.

मार्केट यार्डात गुळामध्ये कोल्हापुरी रव्याची 6 हजार 106 क्विंटल इतकी आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत 2 हजार 885 क्विंटलने आवक जास्त राहिली. कोल्हापुरी भेलीची आवक 31 हजार 989 क्विंटल झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत 3 हजार 835 क्विंटलने जास्त आहे. कमाल दर 3 हजार 264 रुपये राहिला. बेदाण्याची आवक घटली आहे. सप्ताहात 12 हजार 327 क्विंटल आवक झाली. गेल्या सप्ताहापेक्षा 1 हजार 833 क्विंटलने आवक कमी आहे. मात्र, प्रति क्विंटलचा किमान दर 4 हजार रुपये तर कमाल दर 20 हजार 400 रुपये मिळाला.

दरम्यान, या सप्ताहात सोयाबीनची आवक 400 क्विंटल झाली. कमाल दर 7 हजार रुपये राहिला. त्याचप्रमाणे परपेठ हळदीची 2 हजार 130 क्विंटल आवक झाली. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत 2 हजार 862 क्विंटलने कमी आहे. हळदीचा कमाल दर 7 हजार 187 रुपये प्रतिक्विंटल राहिला. राजापुरी हळदीची 9 हजार 108 क्विंटल आवक झाली. कमाल दर 10 हजार 450 रुपये प्रति क्विंटल राहिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news