सांगली : पूरग्रस्त भत्त्याचे 34.48 लाख परत जाणार !

सांगली : पूरग्रस्त भत्त्याचे 34.48 लाख परत जाणार !

सांगली, पुढारी वृत्तसेवा : लाभार्थी नाव, बँक खाते क्रमांक, आयएफएस कोड यातील तफावतीमुळे पूरग्रस्त 1 हजार 876 लाभार्थींच्या भत्त्याचे 34.48 लाख रुपये पडून आहेत. संबंधित लाभार्थींनी 25 जुलैपर्यंत बँक पासबुक व आधारकार्डची छायांकित प्रत महापालिकेच्या मंगलधाम कार्यालयात सादर करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. मुदतीत माहिती सादर न झाल्यास अनुदानाची रक्कम शासनाकडे जमा होणार आहे.

2019 मध्ये आलेल्या महापुराचा महापालिका क्षेत्रातील 40 हजार नागरिकांना फटका बसला. महापुराने बाधित झालेल्या कुटुंबांना प्रति प्रौढ व्यक्ती 60 रुपये आणि लहान मुलेमुली यांना 45 रुपये प्रतिदिन याप्रमाणे निर्वाह भत्ता रक्कम शासनाकडून प्राप्त झाली होती. बाधीत झालेल्या कुटुंबापैकी 1 हजार 876 लाभार्थींचे नाव, बँक खाते क्रमांक यामध्ये तफावत आढळली. त्या लाभार्थींना तहसीलदार कार्यालयामार्फत निर्वाह भत्ता अनुदान वाटप केले नाही. संबंधित लाभार्थी यांची यादी महापालिका मुख्यालय इमारत तसेच प्रभाग समिती कार्यालय 1 ते 4 तसेच महापालिकेच्या लिंकवर उपलब्ध करुन दिली आहे.

संबंधित लाभार्थी यांनी त्यांचे बँक पासबुक व आधारकार्डची छायांकित प्रत 25 जुलैअखेर महापालिकेच्या मंगलधाम इमारतीतील आपत्ती व्यवस्थापन विभाग कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथे जमा कराव्यात. प्राप्त कागदपत्रांची माहिती तहसीलदार कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे, असे उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले. नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले, संबंधित 1 हजार 876 लाभार्थींची नावे महापालिका मुख्यालय, प्रभाग समिती कार्यालय अथवा लिंकवर उपलब्ध करण्याबरोबरच संबंधित पूरग्रस्त भागात फलकावर प्रसिद्ध करावीत.

चारदा आवाहन; आता शेवटचा प्रयत्न

लाभार्थी नाव, बँक अकाऊंट नंबर, आयएफएस कोड नंबर न जुळणे यामुळे संबंधित लाभार्थींच्या बँक खात्यावर पूरग्रस्त भत्त्याची रक्कम जमा होऊ शकली नाही. कागदपत्रे सादर करण्याबाबत यापूर्वी चारदा आवाहन केलेले आहे. तरिही लाभार्थींनी कागदपत्र सादर न केल्याने संबंधितांच्या बँक खात्यावर भत्त्याचे अनुदान वर्ग होऊ शकले नाही. यावेळी कागदपत्रे सादर न झाल्यास रक्कम शासनाकडे परत जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news