सांगली : पावसाने दैना; उपनगरांमध्ये रस्ते चिखलमय

सांगली : पावसाने दैना; उपनगरांमध्ये रस्ते चिखलमय
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली शहर व परिसरात गुरुवारी रात्रभर व शुक्रवार सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाला. दुपारपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाने दैना उडाली आहे. उपनगरे, विस्तारित भागातील रस्ते चिखलमय झाले. मोकळे प्लॉट, सखल भागात तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. तातडीने उपाययोजना न केल्यास ऐन पावसात मोठी दैना उडणार हे या पावसाने दाखवून दिले आहे.

शहर, परिसरात गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पावसास सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. सांगलीत 68.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सलग पावसामुळे शहर व परिसरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. ड्रेनेजची व्यवस्था नसलेल्या भागात पाणी रस्त्यावर साचून होते. अनेक ठिकाणी ड्रेनेजसाठी खोदाई केलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून डबकी साचली होती.

'स्टॉर्म वॉटर'चा डीपीआर कधी?

शामरावनगरमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले. काही ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने पाण्याला मार्ग काढून दिला जात होता. मात्र बर्‍याच ठिकाणी पाणी साचून राहिले होते. सखल मोकळ्या भागाला लहान-लहान तळ्याचे स्वरूप आले. हे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच नागरिकांची दैना उडाली आहे. स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचा 'डीपीआर' केव्हा तयार होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आप्पासाहेब पाटील नगरमध्येही रस्त्यावर पाणी साचून राहिले होते.

उपनगरे व विस्तारित भागात या पावसाने दैना उडवून दिली. कच्चे रस्ते चिखलमय झाले. या रस्त्यावरून वाहने बाहेर काढताना नागरिकांची मोठी कसरत झाली. गुंठेवारी भागाची तर दैना उडाली. मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साचले होते. या पाण्यामध्ये डासांची पैदास होणार आहे. त्यामुळे या भागाला आता डासांच्या उच्छादाचा प्रश्न भेडसावणार आहे.

गुंठेवारी तसेच मुरुमीकरणाची गरज असलेल्या सुमारे 20 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे मुरुमीकरण होणार होते. हे मुरुमीकरण झाले असते तर गुंठेवारी, विस्तारित भागाचे हाल कमी झाले असते. विस्तारित भागात सुमारे आठ कोटींच्या रस्ते डांबरीकरणाचे कार्यारंभ आदेश रखडले आहे. ते वेळेत निघाले असते व रस्त्यांचे काम झाले असते तर नागरिकांना दिलासा मिळाला असता.
पावसाळ्यापूर्वी मुरुमीकरण व डांबरीकरणाची गरज आहे. ड्रेनेजसाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण गरजेचे आहे. महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

कच्चे रस्ते चिखलात; डांबरी रस्ते धरले मुरुमीकरणासाठी

महानगरपालिकेचे सभागृह नेते विनायक सिंहासने म्हणाले, महानगरपालिकेच्या स्थायी समितीत दि. 28 जानेवारी 2022 रोजी गुंठेवारी भागात तसेच कच्चे रस्त्यांच्या ठिकाणी मुरुमीकरणाचा ठराव झालेला आहे. 2 कोटी 91 लाख 22 हजार 800 रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. प्रत्यक्षात हे काम अद्याप सुरू नाही. मुरुमीकरणासाठी धरलेले काही रस्ते डांबरी आहेत. काही रस्ते खडीकरण झालेले आहेत. सारा सावळागोंधळ दिसत आहे. नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. कच्च्या रस्त्यांचे मुरुमीकरण रखडले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news