file photo
file photo

सांगली : दोन दिवसाच्या मुलीचा खून; आईला जन्मठेप

Published on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : स्वतःच्या दोन दिवसाच्या मुलीचा खून केल्याबद्दल सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय 30, रा. करगुट्टी- यलापूर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) हिला जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सांगली येथील जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश एच. एल. मनवर यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.

खटल्याची पार्श्वभूमी अशी – सुमित्रा जुट्टी ही कर्नाटकातील महिला 17 ऑक्टोबर 2020 रोजी सांगली येथील शासकीय रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तिथे तिने मुलगीला जन्म दिला. मुलगी जन्माला आल्यापासून ती नाराज होती. तिने दि. 18 रोजी रात्री नवजात बालकाचा दुपट्याने गळा आवळून खून केला. रोशनी शिंदे या महिलेने मुलीचा खून करताना सुमित्राला पाहिले होते.

याप्रकरणी शासकीय रुग्णालयातील डॉ. मधुकर जाधव यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी तपास करून सुमित्रा हिच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले.

यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रोशनी शिंदे, डॉ. मधुकर जाधव, रुपाली बजंत्री, शारदा जुट्टी, शब्बीर हुजरे, डॉ. खोत, अश्‍विनी चौगुले, श्रद्धा आंबळे व तपास अधिकारी अमितकुमार पाटील यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. पैरवी कक्षातील हवालदार वंदना मिसाळ, शरद राडे, गणेश वाघ, सुप्रिया भोसले यांनी सरकार पक्षाला मदत केली.

न्यायालयाने उपलब्ध साक्षी पुरावे ग्राह्य धरून भा.द.वि. कलम 302 अन्वये दोषी ठरवून सुमित्रा जुट्टी हिला जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने ज्यादा शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news