सांगली : पुढारी वृत्तसेवा – सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत आज राज्य सरकारने आदेश दिले. बँकेतील नोकर भरतीतील घोटाळा, कर्ज वाटपातील अनियमितता, बँकेच्या कामकाजातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात बँकेत झालेली नोकर भरती गैरव्यवहार संदर्भातील मुद्दा चव्हाट्यावर आला होता. त्यावेळी काही संचालकांनी बँकेच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी सरकारकडे केली होती. त्याप्रमाणे चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. मात्र त्यानंतर अचानक चौकशीला स्थगिती देण्यात आली. आत्ता शिंदे फडणवीस सरकारच्या काळात आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा बँकेच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्या संदर्भात महिन्यापूर्वी सहकार मंत्र्यांना त्यांनी निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन आता राज्य सरकारने सहकार विभागाला कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बँकेचे पदाधिकारी संचालक यांच्यात एकच खळबळ उडाली आहे.