सांगली : गायी चोरणार्‍या टोळीला अटक; बुधगावमधील प्रकार

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : बुधगाव (ता. मिरज) येथे देवाला सोडलेल्या गायींची चोरी करणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील पाच जणांच्या टोळीला ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी पलायन केले. त्यांच्या ताब्यातून टेम्पो जप्त केला आहे. गायींची सुटका करून त्यांना सोडून दिले आहे.

अटक केलेल्यांमध्ये अरविंद अर्जुन तांबे (वय 36, रा. शिरभवी रोड, घायटी, ता. सांगोला), दीपक रंगनाथ जावीर (40, तिसंगी, ता. पंढरपूर) व रवि नागनाथ चंदनशिवे (38, सोलापूर) यांचा समावेश आहे. याप्रकरणी बुधगावचे माजी शिवसेना शहरप्रमुख सतीश खांबे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पळून गेलेल्या संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक सोलापूर जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहे. बुधगाव येथे देवाला सोडण्यात आलेल्या गायींची संख्या खूप मोठी आहे. या गायी गावातून फिरत असतात. ग्रामस्थही त्यांना चारा तसेच अन्य खाद्यपदार्थ खायला घालतात. शुक्रवारी पहाटे संशयितांची टोळी बुधगावात दाखल झाली. तिघेजण टेम्पोतून, तर अन्य दोघे दुचाकीवरून आले होते. बनशंकरी मंदिरजवळ गायी बसल्या होत्या. यातील दोन गायी त्यांनी चोरून त्या टेम्पोत भरल्या. हा प्रकार एका ग्रामस्थाने पाहून आरडाओरड केली.

मंदिर परिसरातील लोक जागे झाले. या सर्वांनी तिघांना टेम्पोसह पकडले. ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांचे पथक तातडीने दाखल झाले. संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून टेम्पो जप्त केला. गायींना सोडण्यात आले. पळून गेलेल्या दोन संशयितांच्या शोधासाठी नाकाबंदी करण्यात आली. पण त्यांचा सुगावा लागला नाही.

गेल्या अनेक महिन्यापासून जिल्ह्यातील जनावरे चोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. विशेषत: गोठ्यात बांधलेल्या गायी लंपास केल्या जात आहेत. ग्रामस्थांमुळे ही टोळी सापडली. त्यांच्याकडून जनावरे चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निरीक्षक गायकवाड यांनी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news