सत्तांतराचा विद्यार्थ्यांना फटका बसला अकरावी प्रवेशाची बोंब

सत्तांतराचा विद्यार्थ्यांना फटका बसला अकरावी प्रवेशाची बोंब
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तांतराचा विद्यार्थ्यांना फटका बसला असून शिक्षणमंत्रीच नसल्याने प्रक्रियेला विलंब होत असल्याची बाब समोर आली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. महाविद्यालयांकडून ऑनलाइन प्रवेशासाठी असलेल्या जागांची संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण झालेली नाही. त्यातच राज्य सरकार बदलल्यामुळे निर्णय घेण्यासाठी शिक्षणमंत्रीच उपलब्ध नाहीत. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेला उशिर होत असल्याचे दिसत आहे.

राज्यभरात मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने दरवर्षी होतात. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या प्रवेशाची माहिती मंत्रालय स्तरावरुन आदेश आल्यानंतर माध्यमिक शिक्षण संचालक जाहीर करतात. यंदा निकाल जाहीर होवून प्रवेशाची नोंदणी निम्या विद्यार्थ्यांनी केली. मात्र गुणवत्ता यादी आणि अन्य वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

यावर्षी केवळ राज्य मंडळाचे दहावीचे निकाल जाहीर झालेले आहेत. अन्य सीबीएसई आणि आयसीएसई व आयबी अन्य केंद्रीय मंडळाचे निकाल जाहीर झालेले नाहीत. यामुळे अकरावी प्रवेश कशा पद्धतीने करायचे याबाबत निर्णय झालेला नाही. अधिकारी स्तरावर केवळ जागांचे कारण देत प्रवेश प्रक्रिया पुढे जात असल्याचे कारणे सांगितली जात आहेत. दहावी राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाकडे केंद्रीय बोर्डाचे निकाल अद्याप जाहीर झाले नसल्याने त्यांना 10 टक्के जागा राखीव ठेवून पुढील प्रवेश प्रक्रिया सुरु ठेवण्यासंदर्भात एक प्रस्तावही गेल्याचे समजते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजिनामा दिला आणि सरकार गेले.
आता नवीन शिक्षणमंत्री येईपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया पुढेच ढकलली जाते की काय अशी शक्यता आहे. अधिकारी स्तरावर कोणीच निर्णय घेतलेले नाहीत. लवकरच अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा सुरु होईल, इतकीच माहिती देण्यात येत आहे. प्रवेशाचे वेळापत्रक आणि अर्जाचा भाग 2 भरण्यासंदर्भातील सूचना दिलेल्या नाहीत.

अकरावी प्रवेशाचे पुढील वेळापत्रक चार दिवसांत

याबाबत राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याशी संपर्क साधला असता अकरावीच्या एकूण उपलब्ध जागांची नोंदणी पूर्ण झाली असून विद्यार्थ्यांना लवकरच प्रवेश अर्जाचा भाग 2 आणि प्रवेशाचे पुढील वेळापत्रक येत्या चार दिवसांत जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले.

मुंबईत असलेल्या जागा

महाविद्यालय 1009
कला 48570
वाणिज्य 188740
विज्ञान 117920
एचएसव्हीसी 5005
एकूण 370235

प्रवेशासाठी अर्ज नोंदणी

नोंदणी 26504
फी भरलेले 208104
संकेतस्थळावर अंतिम केलेले अर्ज 124503
मार्गदर्शन केंद्रावर अंतिम केलेले अर्ज 62869
अकरावीची पुढील प्रक्रिया कशी असणार?

शून्य फेरी : सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार.याचदरम्यान व्यवस्थापन इनहाऊस आणि अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.

नियमित फेरी : शून्य फेरीनंतर तीन नियमित फेर्‍यांचे आयोजन. प्रत्येक फेरीवेळी कॉलेजपसंतीक्रम बदलता येणार.

विशेष फेरी : नियमित फेर्‍यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रवेश प्रतिबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीत संधी.

अतिरिक्त विशेष फेरी : एटीकेटी आणि प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त विशेष फेरी.

द्विलक्षी विषयांचे प्रवेश समांतर प्रवेश प्रक्रिया राबवून पूर्ण केले जाणार.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news