सकल संतांचे माहेर तीर्थक्षेत्र पंढरपूर

vitthal temple pandharpur
vitthal temple pandharpur
Published on
Updated on

सकल संतांचे माहेर पंढरपूर! कारण विठाई माऊली तिथे त्यांच्यासाठी अठ्ठावीस युगे उभी आहे. पंढरपूरला 'तीर्थराज' म्हणतात. श्री क्षेत्र पंढरपूरचे महत्त्व सांगणारी एक कथा अशी आहे. एकदा कार्तिक स्वामी ऋषीगणांसह कैलासावर येतात आणि भगवान शंकराला विचारतात की 'सर्वात श्रेष्ठ तीर्थक्षेत्र कोणते? भगवान शंकर म्हणतात, 'सकाळ-संध्याकाळ मी आणि पार्वती ज्याचे नाम जपतो.

देव सुद्धा झाडांच्या रूपाने जिथे राहतात. ते पंढरपूर सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये श्रेष्ठ आहे.' रोज माध्यान्ही सगळी तीर्थस्थाने चंद्रभागेमध्ये सुस्नात होऊन, विठ्ठलाचे चरणस्पर्श करतात. असं हे 'तीर्थराज' पंढरपूर! तिथे 'सावळे सुंदर रूप मनोहर' असा आनंद कंद परमात्मा पांडुरंग भक्तांसाठी गेली हजारो वर्षे त्यांची वाट पाहात उभा आहे.

ऋषी, मुनी, संत महात्मे, तुमच्या आमच्या सारखी साधी माणसे, नित्य वारी करणारे वारकरी यांच्यापासून ते देशी-विदेशी संशोधक,भक्तांपर्यंत सार्‍यांना या विठ्ठलाने वेड लावले आहे. या लोकप्रियतेचे कारण काय असावे असा विचार करताना असे लक्षात येते की त्याच्या कमालीच्या 'साधेपणा'वर सारे मोहीत झाले आहेत. हा देव अगदी साधा आहे. तो आपण रांधलेले आवडीने खातो. त्याला पंचपक्वान्ने लागत नाहीत. त्याला सोवळे ओवळे नाही. कर्मकांड नाही. काही दिले नाही तरी कोपत नाही. असा साधाभोळा विठ्ठल!

वारीची परंपरा निर्माण झाली आणि जाती-पातीतले, देवा-पंथातले भेद वारीत नष्ट झाले. सारे समतेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आले आणि पंढरपूरची वाट चालू लागले. विठ्ठलावर नितांत श्रद्धा, मुखामध्ये नाम आणि शुद्ध आचार ही त्रिसूत्री वारीचा पाया झाली आणि विठ्ठल प्रेमाची बुलंद इमारत उभी राहिली.

गेल्या दहा-बारा वर्षांत वारी बदलत आहे. लहानपणी बघितलेला वारकरी 'पडशीची वारी' करत होता. अगदी गरजेपुरते सामान पडशीत भरून एका खांद्याला पडशी आणि दुसर्‍या खांद्याला पताका इतकेच घेऊन पंढरपूरच्या वाटेला निघायचे. एखादा कपडा, दोन वेळचे जेवण करण्याइतपत शिधा बरोबर घ्यायचा. वाटेत तीन दगडांच्या चुलीवर रांधून गरजेपुरती भूक भागवायची. नामस्मरण करत, अभंग म्हणत वारीची वाटचाल करायची. आता वारीला निरनिराळ्या संस्था, स्वयंसेवक, समाजसेवक यांनी वेगळे रूप दिले आहे.

सकल वैष्णवजनांचा आनंदनिधान असलेला विठ्ठल पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभा आहे. विटेखाली उलटे कमळ आहे. ही वीट म्हणजे शापित इंद्र आहे. वृत्रासुराच्या शापामुळे तो वीट झाला आणि विष्णूस्मरण करत उद्धाराची वाट पाहत चंद्रभागेच्या तीरी पडला. देव पुंडलिकाच्या भेटीसाठी आला असताना पुंडलिकांनी तीच वीट दारी आलेल्या देवाला उभे राहण्यासाठी दिली. आणि देवाच्या पद्स्पर्शाने इंद्राचा उद्धार झाला, अशी कथा सांगितली जाते.

विठ्ठलाची मूर्ती समचरण आहे. चरणावर एक छोटासा खळगा आहे. ती मुक्तकेशीचा गर्वहरण केल्याची खूण आहे. मुक्तकेशी म्हणजे द्वापार युगातील चंद्रसेन नावाच्या राजाची मुलगी. ती अतिशय सुंदर होती. तिला स्वतःच्या सौंदर्याचा खूप गर्व होता. पण, विठ्ठलाचे सावळे सुंदर रूप पाहिल्यावर तिला स्वतःचा विसर पडला. ती त्याच्या दर्शनासाठी धावतच सुटली. धावताना तिचे केस मोकळे झाले म्हणून ती मुक्तकेशी. तिने विठ्ठलाचे चरण धरले. चरणावर आपला हात ठेवल्यानंतर तिची बोटे देवाच्या सुकुमार पावलांमध्ये रुतली आणि तिचे गर्वहरण झाले, असे म्हटले जाते.

देवाच्या पायात तोडे आहेत. दोन्ही पायांच्या मध्ये पितांबराचा सोगा आहे. कमरेला मेखला आहे. देवाने दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत. त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. तो द्विभूज आहे. डाव्या हातात शंख आहे. शंख हे ज्ञानाचे प्रतीक आहे. उजव्या हातात कमल पुष्प आहे. ते पावित्र्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे. आपल्याला भेटायला येणार्‍या भक्तांचे स्वागत करण्यासाठी त्याने ते हातात घेतले आहे. मनगटावर मणिबंध आहेत. दंडामध्ये बाजुबंद आहेत. डाव्या बाजूला अर्धांगी रुक्मिणीला बसायची जागा आहे. हृदयावर श्रीवत्सलांछन व श्रीनिकेतन आहे. गळ्यामध्ये कौस्तुभ मण्यांचा हार आहे. कानामध्ये मकर कुंडले आहेत. गाल फुगीर आहेत. अत्यंत सुंदर मुख असून एक विलक्षण स्मित त्याच्या चेहर्‍यावर आहे. त्याच्या या हास्यामध्ये भक्तांना गुंतवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे. द़ृष्टी समचरण आहे.

त्यामुळे पायावर मस्तक ठेवणार्‍या प्रत्येक भक्तांकडे त्याचे लक्ष आहे. मस्तकावर मुकुटासारखी टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा आहे. हरिहर ऐक्याची ही खूण आहे. अत्यंत मनोहारी अशा या मूर्तीच्या दर्शनाने सकल जन्माचे पातक फिटते अशी भाविकांची श्रद्धा आहे. सद्यपरिस्थितीत कोरोनामुळे आपल्याला आत्मचिंतन करण्यासाठी वेळ मिळाला आहे. हा कोरोनारूपी भस्मासुर जाऊन पुन्हा पहिल्यासारखी वारी भरावी. सार्‍यांनी नाचत, अभंग म्हणत, नामस्मरण करत पंढरपुरी जावे. आसुसलेल्या विठुमाऊलीची गळाभेट घ्यावी.. त्यालाच साकडं घालावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news