संभाजीराजे : मराठा आरक्षणासोबत बहुजन समाजासाठी लढा

संभाजीराजे : मराठा आरक्षणासोबत बहुजन समाजासाठी लढा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाची बाब सध्या न्यायप्रविष्ट असली तरी 70 टक्के गरीब मराठा समाजाच्या हिताच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आझाद मैदानावरील उपोषणाला मिळालेले बळ हे शिवशाहूंच्या विचारांचे बळ होते. याच जोरावर मराठा आरक्षणाचा लढा शेवटपर्यंत घेऊन जाऊ तसेच बहुजन समाजासाठीही लढा उभारू, असा निर्धार खासदार संभाजीराजे यांनी व्यक्‍त केला.

आझाद मैदानावर संभाजीराजे यांनी केलेल्या उपोषणानंतर मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या. या लढ्यानंतर गुरुवारी खा. संभाजीराजे यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. शिवाजी चौकातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर भवानी मंडपामध्ये झालेल्या विजयोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले; तर पुणे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनीही उपोषणातून मान्य झालेल्या मागण्यांचे मराठा समाजाला होणारे फायदे सांगितले. इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी करवीरवासीय व उपस्थितांच्या वतीने मनोगत व्यक्‍त करताना मराठा समाजाला आर्थिक मागासलेपणातून मुक्‍तीसोबत बौद्धिक मागासलेपण दूर करण्यासाठी एकत्रित येण्याची गरज व्यक्‍त केली. याचे नेतृत्व संभाजीराजे व संयोगिताराजे यांनी करावे, अशी विनंती केली.

खासदार संभाजीराजे यांनी मनोगतामध्ये आंदोलनाची गरज व पुढील दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, मी शिवशाहूंच्या गादीचा वारसदार असलो तरी मन स्वच्छ आणि हेतू शुद्ध घेऊन निघाल्याने कोल्हापूरने मला साथ दिली. करवीरकरांनी आपली ताकद माझ्या मागे उभी केल्याने राज्यभरातून या आंदोलनाला प्रतिसाद मिळत गेला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज सधन असल्याचे मत मांडले असले तरी ते केवळ 30 टक्के मराठा समाजाबद्दलचे मत होते. मात्र, माझा 70 टक्के मराठा बांधव आज गरिबीचे जीवन जगतो आहे. त्यांच्यासाठी मराठा आरक्षण, शैक्षणिक सवलती, वसतिगृहे, नोकर्‍यांची गरज आहे. यासाठी उपोषणाचा निर्णय घेतला.

आग्य्राहून सुटका…

उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी प्रकृती खालावल्याने निर्धार कायम राखण्यासाठी शिवचरित्राचे वाचन सुरू केले. यातील आग्य—ाहून सुटका या प्रकरणाने खरी प्रेरणा दिल्याची आठवण यावेळी खा. संभाजीराजे यांनी सांगितली.

यावेळी संयोगिताराजे, मधुरिमाराजे, माजी आमदार संजय घाटगे, अंबरिश घाटगे, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, डॉ. मंजुश्री पवार, व्ही. बी. पाटील, वीरेंद्र मंडलिक, गणी आजरेकर, फत्तेसिंह सावंत, मारवाडी समाजाचे ईश्‍वर परमार, प्रीतम ओसवाल, नरेंद्र ओसवाल, भरत ओसवाल यांच्यासह विविध तालीम संस्था, तरुण मंडळे, समााजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उपोषणाचा निर्णय ही आतून आलेली हाक

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने समाजात रोष होता. आंदोलनाची पुढील दिशा काय हे समजेना. रस्त्यावरची लढाई न करता कायदेशीर लढाईचा मार्ग होता. पण, मराठा समाजाच्या पदरात काहीच पडताना दिसत नसल्याने फेब्रुवारी महिन्यात मी बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला. ही माझ्या मनातून आलेली हाक होती. मराठा बांधवांच्या पाठबळामुळेच याला यश आल्याची भावना यावेळी खा. संभाजीराजे यांनी व्यक्‍त केली.

भव्य मिरवणुकीने स्वागत

ढोल, ताशे, हलगी, तुतारी वाद्यांसह लेझीम पथके, वारकरी, शिवकालीन युद्धकला, हत्ती, घोडे अशा लवाजम्यासह छत्रपती शिवाजी चौकातून सायंकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व करवीरकरांच्या अलोट गर्दीत ही मिरवणूक जुना राजवाड्याकडे मार्गस्थ झाली. या मार्गावर दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती. मार्गावर फुलांच्या पायघड्या, रांगोळ्यांची आरास करण्यात आली होती. तसेच नागरिकांनी पुष्पगुच्छ, हारतुरे देऊन खासदार संभाजीराजेंचे आभार व्यक्‍त केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news