संधिवात का होतो?

संधिवात का होतो?

सांधे व सांध्याच्या आसपासच्या पेशी, स्नायू व मांसपेशी यांच्या आजारांना इंग्रजीमध्ये 'मस्क्युलेस्केलेटल' आजार असे म्हटले जाते. जगभरात केलेल्या संशोधनामध्ये याचे प्रमाण 15 ते 50 टक्के जनसंख्येमध्ये आढळून येते. 'मस्क्युलेस्केलेटल' आजारापैकीच एक महत्त्वाचा आजार म्हणजे संधिवात होय. (संधिवात/आथ्राइटिस). एकट्या भारतामध्येच संधिवाताचे जवळपास 18 करोड रुग्ण आहेत आणि एवढे रुग्ण असूनसुद्धा सामान्य जनतेला संधिवात या आजाराबद्दल क्वचितच माहीत असेल.

उलट समाजामध्ये संधिवात आणि संधिवाताचे उपचार याबद्दल भलतेच गैरसमज पसरले आहेत. संधी म्हणजे सांधा आणि वात म्हणजे त्यामध्ये येणारी सूज, संधिवाताला इंग्रजीमध्ये Arthritis असेही संबोधतात. संधिवात हा कोणताही आजार नाही, हे एक लक्षण आहे. ज्याप्रमाणे ताप येणे हे एक लक्षण आहे आणि ताप बर्‍याच आजारांमध्ये येऊ शकतो. जसे डेंग्यू, टीबी कोरोना इत्यादी आजार त्याचप्रमाणे संधिवात हा 100 पेक्षाही जास्त आजारांमध्ये आढळून येतो. ज्याप्रमाणे ताप आल्यावर सर्वांना पॅरोसिटेमॉल हे औषध दिले जाते हे सर्वांना माहीतच आहे. पण ताप कशामुळे आला आहे, त्या आजाराचे निदान करून त्यासाठी आजाराचे औषध देणे गरजेचे असते. त्याच पद्धतीने संधिवात नेमका कोणत्या आजारामुळे झाला आहे, याचे निदान करून त्या आजाराची औषधे आपणास रुग्णाला द्यावी लागतात. तर अशा संधिवाताच्या आजाराबद्दल जाणून घेऊया.

संधिवात कोणाला होतो?

संधिवात हा 20 ते 50 वयोगटातील व्यक्तींना होतो. साधारणतः याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते; पण काही संधिवात (उदा. पाठीच्या मणक्याचा संधिवात) पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. जरी संधिवाताचे प्रमाण 20 ते 50 वयोगटात अधिक असले तरी तो लहानांपासून वृद्धापर्यंत कोणालाही होऊ शकतो.
संधिवाताचे नेमके कारण अज्ञात आहे; परंतु अनुवंशिकता, वातावरण, व्यसन या घटकांमुळे संधिवाताचे आजार होऊ शकतात, असे विविध संशोधनांमध्ये दिसून आले आहे.

संधिवाताचे काही प्रकार हे विषाणू संसर्गामुळे होतात, त्याला इंग्रजीमध्ये पोस्टव्हायरल आथ्राइटिस असे म्हणतात. असे संधिवात काही आठवड्यांमध्ये आपोआप बरे होऊ शकतात; परंतु जर संधिवाताची लक्षणे 6 आठवड्यांपेक्षा अधिक काळ असतील तर तो दुर्धर आजार समजला जातो व असा संधिवात औषधोपचार केल्याशिवाय बरा होऊ शकत नाही.

संधिवात हा फक्त सांध्याचा व हाडांचा आजार आहे का?

संधिवाताच्या आजारामध्ये शरीरातील इतर अवयवांमध्ये देखील सूज येऊ शकते. हे आजार इतके घातक असतात की त्यामध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीरातील कोणताही अवयव बाधित होऊ शकतो. याच अनुषंगाने संधिवाताच्या आजाराची काही लक्षणे जाणून घेऊयात.
केस गळणे, चेहर्‍यांवर लालसर रॅश/चट्टे येणे, तोंडामध्ये अल्सर/व्रण येणे, डोळे लाल होणे, डोळ्यामध्ये अथवा तोंडामध्ये कोरड पडणे, थंडीमध्ये हाता-पायांची बोटे पांढरी- निळी होणे, सोरियासिस आजार (त्वचारोग),
अत्यंत थकवा जाणवणे, सांधे दुखणे, सुजणे किंवा सकाळी उठल्यावर सांधे आखडणे, हाता-पायाच्या बोटांमध्ये वाकडेपणा येणे, स्नायू वा मांसपेशींमध्ये कमजोरी येणे, ज्यामुळे बसून उठणे, जीने चढणे, इ. त्रास होतो.

संधिवातावर उपचार शक्य?

मधुमेह व रक्तदाबाप्रमाणेच संधिवाताचे एकदा निदान झाल्यास आयुष्यभर औषधोपचार करावे लागतात. सांधे, स्नायू शरीरातील इतर अवयव यांना इजा होण्यापूर्वी वेळीच उपचार सुरू केल्यास संधिवातावर पूर्ण नियंत्रण मिळवणे शक्य असते.
संधिवाताच्या रुग्णांना आयुष्यभर स्टेरॉईडस् औषधे घ्यावी लागतात का?
तर नाही, काही मोजके अपवाद वगळता रुग्णांना आयुष्यभर स्टेरॉईडस् घ्यावयाची गरज नसते.
संधिवाताच्या औषधांनी किडनी/मूत्रपिंडे खराब होतात का?

हा समाजामध्ये पसरलेला मोठा गैरसमज आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधे घेतल्यास आपल्या किडनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. याउलट स्वतःच्या मर्जीनुसार वारंवार वेदनाशामक औषधे घेतल्याने मात्र कालांतराने किडनी निकामी होण्याचा धोका असतो.

संधिवाताचे उपचार न केल्याने काय होईल?

काही संधिवात सौम्य स्वरूपाचे तर काही घातक असतात; परंतु कोणत्याही प्रकारचा संधिवात असो, त्याचे उपचार न केल्यास शरीरातील अवयव, सांधे, स्नायू हे हळूहळू निकामी होऊ लागतात. कालांतराने खालील लक्षणे शरीरामध्ये आढळू शकतात.
हाता-पायांची बोटे वाकडी होणे – ज्यामुळे साधा पाण्याचा भरलेला ग्लाससुद्धा पकडायला रुग्णास त्रास होऊ शकतो. दैनंदिन कामांसाठी रुग्ण इतरांवर अवलंबून राहतो. हृदयविकार, पक्षाघात, रक्तवाहिन्यांचे आजार, हाताच्या पायांच्या बोटांचा गँगरिन अशी लक्षणे आढळून येतात.

हाडे मृदू होणे, सहजासहजी हाडे फ्रॅक्चर होणे, मानसिक आजार व मानसिक संतुलन बिघडणे, नैराश्य येणे. संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की, संधिवात उपचार न केलेल्या व्यक्तींचे आयुष्य सरासरी 10 वर्षांनी कमी होते.

कोल्हापूर हृमॅटोलॉजी सेंटर,  शॉप नं. 7, क्रिस्टल प्लाझा, कोल्हापूर.
मो. 7507860077

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news