कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात 40 हजार शेतकरी सभासदच नाहीत. केवळ हसन मुश्रीफ यांचे कुटुंबीय व कंपन्या अशा सतराच व्यक्ती सभासद हे मालक असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. 40 हजार शेतकर्यांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये घेऊन मुश्रीफ यांनी 40 कोटींचा अपहार केल्याचा घणाघातही घाटगे यांनी केला. यावेळी त्यांनी त्याची थेट कागदपत्रेच सादर केली.
मुश्रीफ वारंंवार सांगतात, सरसेनापती घोरपडे साखर कारखाना 40 हजार शेतकर्यांचा आहे. मात्र कागदपत्रांची तपासणी केली असता 40 हजार शेतकर्यांपैकी कोणीही सभासद नाही. उलट मुश्रीफ यांच्या पत्नी, मुले, मुलगी, सुना, जावई अशा कुटुंबातील सदस्यांसह त्यांच्या दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्या असे मिळून केवळ सतराच व्यक्ती
कारखान्याचे मालक आहेत. त्यांच्या नावे 94 कोटींचे शेअर्स आहेत. मग 40 हजार शेतकर्यांकडून जमा केलेली 40 कोटी रुपयांची रक्कम गेली कुठे, असा सवाल करून समरजित घाटगे म्हणाले, एकाही शेतकर्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार केल्यास आपण हवी ती शिक्षा भोगण्यास तयार आहे, असे म्हणणारे मुश्रीफ धादांत खोटे बोलत आहेत.
ज्या शेतकर्यांकडून पैसे घेतले आहेत, त्यांना कारखान्याने पावत्याही दिल्या आहेत. त्या पावत्या खोट्या आहेत का? प्रत्यक्षात कारखान्याच्या बॅलन्स शिट व शेअर्स स्टेटमेंट कागदपत्रावर हे पैसे कुठेच दिसत नाहीत. याचाच अर्थ मुश्रीफ खोटे बोलत आहेत. सरसेनापती घोरपडे साखर कारखाना आणि हे चाळीस हजार तथाकथित सभासद यांचा काडीमात्र संबंध नाही. हे रेकॉर्डवरून दिसून येते. याचाच अर्थ मुश्रीफ यांनी शेतकर्यांची सरळ सरळ फसवणूक केली आहे, असा आरोप घाटगे यांनी केला.
'घोरपडे'ची वार्षिक सभा 17 लोकांचीच झाली असेल
मुश्रीफ यांनी शाहू साखर कारखान्याबाबत केलेल्या प्रश्नांची उत्तरे आमच्या कारखान्याच्या वार्षिक अहवालात आहेत. नियमानुसार ताळेबंद समजण्यासाठी वार्षिक अहवाल देतो. त्यास वार्षिक सभेत मंजुरी देतो. कर्ज उभारणीस सभासदांची मंजुरी घेतो. मग सरसेनापती घोरपडे साखर कारखान्याचा वर्षिक अहवाल कुठे आहे? ताळेबंद कुठे आहे? त्याला सभासदांची मंंजुरी घेतली आहे का? 40 हजार सभासदांची वार्षिक सभा कधी झाली त्याचा पुरावा दाखवा. तुमच्या कुटुंबीय व अन्य कंपन्या सभासद असलेल्या 17 लोकांचीच वार्षिक सभा झाली असेल, असेही ते म्हणाले.
पाठीत खंजीर खुपसणारेच शिखंडी
शिखंडी म्हणणार्या मुश्रीफ यांनी विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक आणि बाबासाहेब कुपेकर यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे त्यांनी शिखंडी ही पदवी स्वत:लाच लावून घ्यावी, असेही घाटगे यांनी यावेळी सांगितले.