नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना भवन लवकरच शिंदे गटाच्या ताब्यात जाणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे शिवसेना भवनाची चावी त्यांना देतील, असा दावा अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.
शिवसेनेच्या नावाने हे भवन आहे. शिंदे यांच्याकडे सर्वाधिक आमदार, नगरसेवक पदाधिकारी आहेत. तो गटच खरा आहे. त्यामुळे साहजिकच शिवसेना भवनावर शिंदे गटाचाच हक्क असेल. बहुमत एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. शिवसेना भवनाची चावी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याशिवाय ठाकरे यांच्याकडे आता दुसरा पर्याय राहिलेला नाही, असे राणा म्हणाले. मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरूनही ठाकरे-शिंदे गटात राडा झाला आहे. त्याचा संदर्भ देत रवी राणा म्हणाले, महापालिकेतील सर्व कामे टक्केवारीतून केली जात होती. महापालिकेवर सध्या प्रशासक आहे. त्यामुळेच कार्यालयाला टाळे ठोकले आहे. आता तेथील टक्केवारीचे काम थांबेल.
राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून फारकत घेतली आहे. सोनिया गांधींचे विचार त्यांनी स्वीकारले. त्यामुळेच कट्टर शिवसैनिक त्यांच्यापासून दूर गेल्याचे ते म्हणाले. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी मात्र शिवसेना भवन ताब्यात घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. 'मातोश्री'वर फ्रीजच्या खोक्यातून नोटांची बंडले जात होती. स्वतः दीपक केसरकर यांनीच त्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आम्ही जरूर करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.