शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा अन्वयार्थ

शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा अन्वयार्थ

महाराजांनी या समारंभाचे ऐतिहासिक महत्त्व चिरकाल राहावे, यासाठी राज्याभिषेकापासून शिवशक सुरू केला. शक सुरू करणे म्हणजे सामान्य बाब नाही. शक सुरू करणे म्हणजे नवे युग सुरू करणे. या राज्याभिषेकाने नवे युग सुरू झाले आहे.

कृष्णाजी अनंत सभासद हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आद्य चरित्रकार. मराठ्यांचा राजा रायगडावर 'छत्रपती' झाला, हे पाहण्याचे भाग्य लाभलेला. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायगडावर झालेल्या सोहळ्याचा खरा अर्थ समजलेला हा मराठी बखरकार आहे. तो म्हणतो : "या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मर्‍हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला, ही गोष्ट कांही सामान्य जाली नाही." ही खरोखरच असामान्य गोष्ट होती. शतकानुशतकांतून एखाद्या समाजाच्या इतिहासात असा एखादा वैभवशाली दिवस येतो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आलेला हा असा वैभवशाली दिवस होता. या युगात सर्वत्र मुसलमान राजे. आम्हा हिंदूंना राजे होता येणारच नाही, अशा न्यूनगंडाने पछाडलेल्या हिंदू समाजात महाराजांनी राज्याभिषेक करून नवचैतन्य निर्माण केले.

राज्याभिषेकाची आवश्यकता देवगिरीच्या यादवांनंतर महाराष्ट्रातील खरेखुरे राजेपद नाहीसे झाले होते. निजामशाही व आदिलशाही या दक्षिणेतील शाह्यांत व उत्तरेकडील मोगल बादशाहीत अनेक हिंदूंना 'राजा' हा किताब असे; पण हे सर्व नावानेच राजे असत. जावळी, पालवण, शृंगारपूर जहागिरीच्या प्रमुखानांही 'राजे' असे म्हणत. खुद्द महाराजांचे वडीलही 'राजे' पद लावीत. परंतु, त्यांची सत्ता मुसलमान राजासारखी नव्हती. ते मुसलमान राजांचे सेवक होते.

आदिलशहाच्या द़ृष्टिकोनातून महाराज म्हणजे आपल्या जहागिरदाराचा बंडखोर पुत्र, आपल्या राज्यातील एक बंडखोर, लुटारू मनुष्य होते. कुतूबशहा, मोगल, पोर्तुगीज, इंग्रज या सर्वांचाही महाराजांकडे बघण्याचा द़ृष्टिकोन याहून फारसा वेगळा नव्हता. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्रातील मोरे, सुर्वे, दळवी, निंबाळकर इत्यादी मराठे महाराजांना आपल्यासारखेच एक आदिलशहाचे सेवक समजत होते. महाराजांना राज्याभिषेकाने हे दाखवून द्यायचे होते की, प्रस्थापित मुसलमान राजवटीविरुद्ध बंडखोरी करण्याची पायरी महाराजांनी ओलांडली असून, त्यांनी 'मराठी राज्याची' स्थापना केली आहे व ते मोगल बादशहासारखे सार्वभौम सत्ताधीश बनले आहेत.

क्षत्रियांच्या अस्तित्वाबद्दलच शंका

अकबराच्या काळात कृष्ण नृसिंह शेष या धर्मपंडिताने 'शुद्राचार शिरोमणी' नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यामध्ये त्याने या कलियुगात जगात क्षत्रियच नाहीत, असा सिद्धांत सांगितला होता आणि त्याचाच प्रभाव हिंदुस्थानातील सर्व प्रजाजनांवर पडला होता. महाराष्ट्रातील काही ब्राह्मण पंडितही त्यास अपवाद नव्हते. महाराजांनी राजाभिषेकाचा विचार बोलून दाखविताच त्यांनी दोन मूलभूत प्रश्न उपस्थित केले. 1) या जगात क्षत्रिय आहेत काय? 2) असतीलच तर महाराज क्षत्रिय आहेत काय? जसा प्रश्न तसेच त्यावर उत्तर शोधणे आवश्यक होते. खुद्द महाराजांना आपण क्षत्रिय आहोत, असे मनापासून वाटत असूनसुद्धा त्यांनी कुणाही पंडिताच्या मनात काही किल्मिष राहू नये, यासाठी आपल्या पदरी असणारे बाळाजी आवजी, केशवभट पुरोहित, भालचंद्रभट इत्यादी पंडितांचे एक शिष्टमंडळ उत्तरेतील जयपूर, अंबर, काशी इत्यादी ठिकाणी पाठवले. या शिष्टमंडळाने जयपूरच्या राजघराण्यातून सिसोदिया कुलाची शिवाजी महाराज याच वंशातील आहेत, हे सांगणारी वंशावळ प्राप्त केली आणि रजपूत राजांच्या दरबारी होणार्‍या राज्याभिषेक समारंभाची शास्त्रीय माहिती जमा केली. पुढे हे शिष्टमंडळ काशीला गेले; तेथे हिंदू जगतामध्ये प्रसिद्ध असलेल्या गागा भट्ट या महापंडिताला त्यांनी महाराजांच्या वतीने राज्याभिषेकाचे आध्वर्यत्व स्वीकारण्याची विनंती केली आणि ती त्यांनी मानली.

गागा भट्टास पाचारण

विश्वेश्वर ऊर्फ गागा भट्ट यांचे मूळ घराणे महाराष्ट्रातील पैठण या गावचे होत. या घराण्यात अनेक महापंडित होऊन गेले होते. खुद्द गागा भट्ट हा हिंदू जगतामधील एक सर्वश्रेष्ठ पंडित समजला जात असे. अशा महान पंडिताला महाराजांनी राज्याभिषेकासाठी पाचारण केले होते. खुद्द गागा भट्ट अनेक वेळा दक्षिणेत धर्मशास्त्र निर्णयासाठी येऊन गेला होता व महाराजांशी त्याचा चांगला परिचय होता. बाळाजी आवजीचे शिष्टमंडळ परतल्यानंतर महाराजांनी गोविंद भट्ट खेडकर यास गागा भट्टाला आणण्यास पाठवले. गागा भट्ट आल्यानंतर आपल्या अलौकिक विद्वत्तेने व बुद्धिचातुर्याने त्याने ज्या मंडळींनी राज्याभिषेकास विरोध केला होता, त्यांच्या शंकांचे निरसन करून समाधान केले आणि समारंभाच्या पुढच्या तयारीस तो लागला.

राज्याभिषेक सोहळा

6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांवर राज्याभिषेक झाला. तत्पूर्वी, सुमारे महिनाभर निरनिराळ्या देवदेवतांचे दर्शन व विविध धार्मिक विधी चालूच होते. त्यामध्ये तुलापुरुषदानविधी, उपनयन संस्कार, समंत्रक विवाह इत्यादींचा समावेश होता. मुख्य कार्यक्रम अत्यंत सुशोभित करण्यात आलेल्या राजसभेत झाला. राज्यारोहणासाठी अत्यंत मौल्यवान असे 32 मण वजनाच्या सोन्याचे व अष्ट रत्नजडीत स्तंभांचे सिंहासन तयार केले गेले होते. शिवचरित्रकार सर जदुनाथ सरकार यांनी म्हटले आहे की, 32 मण म्हणजे 14 लक्ष रुपयांचे सोनं झाले. रत्नांची किंमत त्याशिवाय. हे सिंहासन तयार करीत असता शिवाजींच्यासमोर दिल्लीचे मयुरासन असावे.
महाराजांनी या सोहळ्यावर अपार दानधर्म केला. विद्वान पंडित, ब्राह्मण, संत-महंत, तडीतापसी इत्यादींना मुक्त हस्ते दाने दिली. 24 हजार होन केवळ दक्षिणेवर खर्च झाले. एकट्या गागा भट्टास 7 हजार होन दक्षिणा देण्यात आली. राज्याभिषेकानंतर पुढे बारा दिवस हा दानधर्म सुरू होता. सभासदाच्या म्हणण्याप्रमाणे, एक करोड बेचाळीस लाख होन महाराजांनी या सोहळ्यावर खर्च केले. 'न भूतो न भविष्यती' असा हा राज्याभिषेक झाला.

नवे युग सुरू झाले

राज्याभिषेकाने महाराष्ट्राच्या कार्यावर कळस चढविला गेला. घटनात्मकद़ृष्ट्या खर्‍या अर्थाने स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण होऊन त्याची घटना तयार झाली. अष्टप्रधान मंडळ हे या घटनेचे मुख्य अंग होते. अष्टप्रधानांपैकी काहींच्या नेमणुका यापूर्वीच झाल्या असल्या, तरी आता त्या संस्कृत नावानिशी राज्याचे एक अंग म्हणून स्थिर झाल्या. महाराजांनी पेशव्यास पंतप्रधान, मुजुमदारास अमात्य अशी संस्कृत नावे देऊन मराठीवरील पारशी भाषेचे अतिक्रमण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. खुद्द स्वतःसाठीसुद्धा विक्रमादित्य अशा प्रकारचे बिरूद न घेता ते छत्रपती असे घेतले. त्याचा अर्थ छत्र धारण करणारा राजा. या छत्राखाली सर्व प्रजेला न्यायाने व धर्माने वागविले जाईल, तिचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन या पदवीत आहे.

महाराजांनी शिवशक सुरू केला. शक सुरू करणे म्हणजे सामान्य बाब नाही. अखिल हिंदवी राजकारणात या राज्याभिषेकाने नवे युग सुरू झाले आहे. हेच महाराजांना या शकाच्या निर्मितीने घोषित करावयाचे होते. हा घटनात्मक बदल महत्त्वाचा आहे. तसेच स्वतंत्र राज्याचे चलनही स्वतंत्र असेच पाहिजे. म्हणून महाराजांनी आपल्या राज्याची नवी नाणी पाडावयास सुरुवात केली. तांब्याचा पैसा, शिवराई व सोन्याचा शिवराई होन ही महाराजांची नवी नाणी यावेळी प्रचारात आली.

महाराजांच्या राज्यकारभारात राज्याभिषेकाचे नवे पर्व सुरू झाले. धर्मशास्त्रानुसार जे कायदे योग्य होते, ते तसेच ठेवले गेले. काही नवे केले गेले. या कायद्यांचे स्वरूप मुलकी, लष्करी, धर्मविषयक व न्यायविषयक असे होते. पूर्वीची लेखनपद्धती मुसलमान धाटणीची होती. ती बदलून महाराजांनी मराठी धाटणीची लेखनपद्धती निर्माण केली. त्यासाठी महाराजांच्या आज्ञेने बाळाजी आवजी चिटणीस या हुशार चिटणीसाने लेखनप्रशस्ती नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच मराठी भाषेचा राज्यकारभारात अधिकाधिक पुरस्कार करण्यात आला. मराठी भाषेवरील पारशीचे अतिक्रमण दूर करण्यासाठी रघुनाथ पंडिताने महाराजांच्या आज्ञेवरून राज्यव्यवहारकोश निर्माण केला आणि राज्यभरातील पारशी नावांना संस्कृत नावे रूढ केली.

महाराज सर्व भूमिपुत्रांचे छत्रपती

त्या काळातील हिंदू राजनीतीनुसार धार्मिक विधींनी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ती त्या काळातील राजनैतिक गरज होती, हे लक्षात घेतले पाहिजे. वरवर पाहता महाराज हिंदूंचे राजे झाले असे वाटत असले, तरी ते केवळ हिंदूंचे राजे न राहता सर्व भूमिपुत्रांचे घटनात्मक राजे झाले. शिवाजीराजांने या भूमिपुत्रांच्या डोईवर संरक्षणाचे छत्र धरले. त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची आणि सार्वभौमत्वाची अस्मिता निर्माण केली हाच या ऐतिहासिक घटनेचा अन्वयार्थ.

logo
Pudhari News
pudhari.news