शाहू मिलमध्ये खासगीकरणातून उभारणार वस्त्रोद्योग प्रकल्प

शाहू मिलमध्ये खासगीकरणातून उभारणार वस्त्रोद्योग प्रकल्प

कोल्हापूर, सुनील सकटे : राजर्षी शाहू महाराज यांनी रोजगारनिर्मितीसाठी सुरू केलेली शाहू मिल गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. आता त्या जागेत खासगीकरणातून वस्त्रोद्योग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच रविवारी त्याला दुजोरा दिला.

हेरिटेजची जागा सोडून उर्वरित जागेत होणार्‍या या वस्त्रोद्योग प्रकल्पात सुमारे बाराशे लोकांना रोजगार मिळणार आहे. सन 1906 मध्ये शाहू महाराज यांनी ही मिल सुरू केली. त्याद्वारे राजर्षी शाहू छत्रपती यांनी कोल्हापुरात उद्योगाचा पाया रचला. या मिलमध्ये हजारो लोकांना रोजगार मिळाला. सुरुवातीस सुमारे पाच हजारांवर कामगारांचा उदरनिर्वाह या मिलवर चालत होता. मात्र, या मिलला 2001 पासून घरघर लागली. 2003 मध्ये मिल बंद पडली.

त्यावेळी सुमारे 774 कामगार या मिलमध्ये काम करीत होते. ही मिल सुरू करण्याची मागणी शाहूप्रेमी नागरिकांतून सातत्याने होत आहे. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने या जागेत राजर्षी शाहूंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासह गारमेंट पार्क उभारण्याची घोषणा केली होती. त्याचे संकल्पचित्रही तयार केले होते. मात्र, सत्तांतरांनंतर हा विषय मागे पडला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात शाहू स्मृती शताब्दीच्या निमित्ताने शाहू मिलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मिलचा भोंगा पुन्हा वाजवण्यात आला. त्यामुळे शाहू मिलच्या आठवणी ताज्या झाल्या.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडे वस्त्रोद्योग खाते सोपविण्यात आले. त्यामुळे शाहू मिलला ऊर्जितावस्था देण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. आता या जागेत राज्य सरकारकडून शाहू स्मारकासह वस्त्रोद्योग प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे. मिलची एकूण 24 एकर जागा आहे. त्यापैकी 11 एकर जागा हेरिटेजमध्ये येते. ती जागा सोडून उर्वरित जागेत शाहू मिलच्या नावाने रोजगारनिर्मितीसाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये वस्त्रोद्योग सुरू करण्यात येणार आहे. यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे. शाहू मिलचा भोंगा शहरवासीयांना पुन्हा एकदा ऐकू येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news