कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ग्राहकांना शाखेतच मोफत इन्स्टा रूपे डेबिट कार्ड देण्याची सुविधा सुरू आहे. त्याप्रमाणे वैयक्तिक अनुदानाच्या विविध शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांनाही इन्स्टा रूपे कार्ड देण्याचा निर्णय संचालकांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी दिली. याचा लाभ जिल्ह्यातील 1 लाख 19 हजार लाभार्थ्यांना होणार आहे. तसेच या योजनांमधील अंगठा करणार्या लाभार्थ्यांनाही बायोमेट्रिक पद्धतीने सुविधा दिली जाणार आहे.
आ. मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रीय वृद्धापकाळ, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, देवदासी, कलाकार मानधन आदी शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांचे अनुदान जिल्हा बँकेमध्ये जमा होत असते. या खातेदारांना डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे बँकेत होणारी गर्दी कमी होण्यास तसेच ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यात मदत होणार आहे. शून्य बॅलन्सवर लाभार्थ्यांचे खाते उघडले जाते. या इन्स्टा रूपे डेबिट कार्डचा खर्च बँक स्वत:च्या निधीमधून करणार आहे.
शासकीय वैयक्तिक अनुदान लाभार्थ्यांमध्ये अंगठा करणार्यांना बँकेकडून बायोमेट्रिक सुविधाही दिली जाणार आहे. खातेदारांना बायोमेट्रिक पद्धतीने त्यांच्या गावातील शाखेत पैसे देण्याची सोय केली जाणार आहे.
शासकीय योजनांच्या लाभ मिळणार्या खातेदारांनी नजीकच्या बँकेच्या शाखेकडे कार्ड मागणीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.