शहांचा शंखनाद अन् उद्याचे महाभारत…

शहांचा शंखनाद अन् उद्याचे महाभारत…

मुंबईच्या आजच्या 'कुरुक्षेत्रा'वर उद्या महाराष्ट्राचे महाभारत लढले जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऐन गणेशोत्सवात शंखनाद करून या महायुद्धाची नांदी दिली. जोपर्यंत मुंबई ताब्यात येत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र ताब्यात येणार नाही, असे शहा यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा, असे आदेशच त्यांनी दिले. हीच सुरुवात असेल तर प्रत्यक्ष लढाईला तोंड फुटेल तेव्हा काय स्थिती असेल याची तूर्त कल्पना आपण करू शकतो. कोणतीही भीडभाड न ठेवता अमित शहा यांनी शिवसेनेला ललकारले. त्यांचे टार्गेट होते उद्धव ठाकरे. शिवसेना आज एक अत्यंत छोटा पक्ष म्हणून शिल्‍लक आहे. शिवसेनेची ही अवस्था उद्धव यांच्यामुळेच झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून उद्धव यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला.

जे विश्‍वासघाताचे राजकारण करतात त्यांनी मग प्रामाणिक राजकारणाची अपेक्षा करू नये, असा इशाराच शहा यांनी देऊन ठेवला. त्याचा अर्थ आता शिवसेनेला संपवण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच टाकले जातील. सारी आयुधे वापरली जातील. साम-दाम-दंड नीतीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. याच बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिवसेनेला पराभूत करण्याची ही अखेरची लढाई समजा… यात एक मोठा विरोधाभास आहे. एकीकडे शिवसेना ही आता छोटा पक्ष म्हणून शिल्‍लक आहे असे सांगायचे, मराठी माणसाच्या हक्‍कांसाठी मुंबईत एक संघर्ष पर्व उभे करणारी शिवसेना 'पेंग्विन सेना' झाली आहे असे हिणवायचे आणि दुसरीकडे त्याच पेंग्विन सेनेचा पराभव करण्यासाठी थेट दिल्‍लीहून महाराष्ट्रावर स्वारी करायची हे कसे? खरी मेख आहे ती याच प्रश्‍नात.

'उठाव'दार नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत पन्‍नास आमदारांनी बंड केले आणि महाराष्ट्रात सत्तांतर घडवले म्हणून शिवसेना संपली असे घडलेले नाही. महाराष्ट्राला जखडून टाकणार्‍या कोरोना महामारीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेले काम आणि शिंदेशाहीच्या बंडानंतर ठाकरेंच्या पाठीशी एकवटलेला शेवटच्या शाखेपर्यंतचा शिवसैनिक यामुळे शिवसेना अधिक जोमाने उभी ठाकताना दिसते. सेनेपासून एरव्ही चार हात दूर राहणारा एक मोठा वर्ग या पडझडीच्या काळात सेनेच्या जवळ जाताना दिसतो आहे. कवी, लेखक, कलावंत मातोश्रीवर जाऊन आले. नाही म्हटले तरी शिवसेनेचा लोकाश्रय विस्तारला. तो मराठी आणि हिंदुत्वाच्याही पलीकडे वाढला. आमचे हिंदुत्व हे पंच पळी अन् कर्मकांडाचे नाही, असे उद्धव सतत सांगत आले. पक्षफुटीच्या काळात तर प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचा विचार त्यांनी अधिक जोरकस मांडला. त्याचा एक परिणाम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली म्हणून सेनेने हिंदुत्व सोडले अशी एक आवई उठवली गेली ती हवेतच विरली.

सेनेच्या हिंदुत्वाचे सिंहासन रिकामे झाले म्हणून भगवी शाल पांघरून त्यावर नव्या हिंदुहृदयसम्राटाची म्हणा की हिंदूजननायकाची प्रतिष्ठापना करण्याचा आचरटपणा देखील फसला. संभाजी ब्रिगेडसारखी मराठा संघटना शिवसेनेसोबत आता उभी राहिली. राज्यभर मोठी सदस्य संख्या असलेल्या मराठा सेवा संघानेही शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीला पाठिंबा जाहीर केला. पहिल्या लाँग मार्चचे प्रणेते जोगेंद्र कवाडे मातोश्रीवर जाऊन आले. आंबेडकरी चळवळीतील धारदार कार्यकर्त्या-वक्त्या प्रा. सुषमा अंधारे तर सेनेतच दाखल झाल्या आणि आज त्या उपनेत्या आहेत. दलित पँथरचे एक संस्थापक आणि लेखक अर्जुन डांगळेदेखील अन्य कवी कलावंतांसोबत 'मातोश्री'वर जाऊन आले. या मंडळींना कोणतीही लाभाची पदे ठाकरे आज देऊ शकत नाहीत किंवा देण्यासारखे ठाकरेंकडे काही नसताना माणसे जमत आहेत. शिवसेना संपलेली नाहीच. बंडाळीची कात टाकून ती अधिक जोमाने उभी राहू शकते हे अमित शहा जाणत असावेत. मुंबईच्या गणपती दौर्‍यात म्हणूनच त्यांनी 'छोटा पक्ष' म्हणून शिल्‍लक उरलेल्या शिवसेनेला पराभूत करण्यासाठी मोठा शंखनाद केला.

मुंबई महापालिकेच्या मागच्या दोन निवडणुकांची समीकरणे तपासली तर शिवसेना आणि भाजप हे दोनच पक्ष मुंबईत वाढताना दिसतात. मग ते युतीमध्ये असोत की नसोत. त्यातही भाजपची झेप मोठी दिसते. मुदत संपलेल्या या महापालिकेत 84 नगरसेवकांसह शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष. 82 नगरसेवकांसह भाजप दुसर्‍या क्रमांकावर आहे. दोनच जागांचा हा फरक फक्‍त 50 हजार मतांचा म्हणजे 0.5 टक्के मतांचा आहे. 2012 ला शिवसेनेला 17.34 टक्के मते मिळाली होती. 2017 ला स्वबळावर लढताना शिवसेनेने 28.29 टक्के मतांवर झेप घेत सत्ता राखली, पण या तुलनेत भाजपची घोडदौड सरस ठरते. 2012 ला फक्‍त 6.78 टक्के मतांवर असलेल्या भाजपने 2017 च्या निवडणुकीत तब्बल 27.28 टक्के मिळवली. मागच्या निवडणुकीत सर्व 227 वार्डांत प्रत्येकी 386 सरासरी मते नोटाला पडली. यात भाजपच्या 24 जागा या 380 पेक्षा कमी मतांनी पडल्या होत्या. म्हणजे मागच्याच निवडणुकीत भाजपने महापालिकेवर गेली पंचवीस वर्षे फडकत असलेल्या शिवसेनेच्या भगव्याला हात घातला होता, पण नोटाचा खेळ नडला.

शिवसेना-भाजपमध्येच झालेल्या या लढाईत दोन्ही काँग्रेसची मात्र किंचित घसरण झाली. काँग्रेसची मते 16.28 टक्क्यांवरून 15.93 टक्क्यांवर आली. राष्ट्रवादीची मते 5.5 टक्क्यावरून 4.75 टक्क्यावर घसरली. मोठा कार्यक्रम झाला तो मनसेचा. मनसेची मते 15.89 टक्क्यांवरून थेट 7.73 टक्क्यांवर घसरली. मनसेला 2012 मध्ये मिळालेल्या साडेनऊ लाख मतांपैकी निम्मी मते शिवसेना – भाजपकडे स्वबळावर वळती झाली. भाजपचा जो अश्‍वमेध दिल्‍लीतून निघाला तो रोखणार्‍या काहीच राज्यांमध्ये महाराष्ट्र येतो. त्यातही शिवसेनाच हा अश्‍वमेध रोखून आहे. या शिवसेनेला सोबत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी नवे आव्हान उभे करू शकतात. नाही म्हटले तरी विधानसभेची पन्‍नास टक्के मते या तीन पक्षांकडे आहेत. यातून शिवसेनेला कायमचे हटवल्याशिवाय मुंबईसह महाराष्ट्राचा राजपथ भाजपसाठी खुला होणार नाही. त्यासाठीच अमित शहा यांनी ऑपरेशन शिवसेना हाती घेतले. एकनाथ शिंदे यांना ताकद देत शिवसेनेला खिंडार पाडले. शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देत तूर्तास स्वतःकडे कमीपणा घेतला. खरी शिवसेना कुणाची असा प्रश्‍न निर्माण करत सेनेसमोर अस्तित्वाचा संघर्ष निर्माण केला. या प्रश्‍नाचे उत्तर घटनापीठ देईल तेव्हा देईल.

आमची युती शिंदे गटाशी आहे आणि तीच खरी शिवसेना आहे, असे जाहीर करत अमित शहा यांनी या सत्तासंघर्षाचा निकालही आपल्या पातळीवर देऊन टाकला; पण इतके मारूनही शिवसेना मरत नाही, उलट ती नव्या ताकदीने उभी ठाकते आहे म्हटल्यावर अमित शहा यांनी मुंबईत येऊन सेनेविरुद्ध शंखनाद केला. शहा हे खरे चाणक्य आहेत असे सारेच म्हणतात, पण परवाचा त्यांचा मुंबई दौरा पाहिला तर राजकीय अर्थशास्त्र घेऊन हा चाणक्य निघाल्याचे दिसते. तुटीतल्या बँका सधन बँका एक तर चालवायला घेतात किंवा विलीन करून घेतात. भाजपचा विस्तार याच पद्धतीने सुरू आहे. निरनिराळ्या पक्षातले स्वतःचा प्रभाव बाळगून असलेले नेते भाजपमध्ये दाखल झाले. शिवसेना फोडून एक गट वेगळा काढून सोबत घेतला. या गटाला उद्या एक तर विलीन व्हावे लागेल किंवा वेगळा पक्ष काढला तर तो भाजपचा तहहयात मित्रपक्ष राहील. मनसेकडे भाजपचे सारेच नेते जाऊन आले.

भाजप-शिंदे गट एकत्र येणे पुरेसे नाही. नव्या जोमाने उभ्या राहणार्‍या शिवसेनेचा पाडाव करायचा तर राज ठाकरे यांचीही नवनिर्माण सेना सोबत लागेल. ज्यांना सरळ मारता येत नाही त्यांना आपल्या सोबत, आपल्या तंबूत घेऊन संपवायचे, हा भाजपचा खेळ लक्षात आला म्हणून शिवसेना युतीतून बाहेर पडली. त्याच सेनेचा खात्मा करण्यासाठी खरे तर राजकीय गारद्यांची गर्दी जमवण्याची भाजपला गरज नाही. मुंबईत भाजपने शिवसेनेचा आधीच पराभव केला आहे. मराठी माणूस नडलाच नाही तर येत्या निवडणुकीत या पराभवाची औपचारिक घोषणा तेवढी होईल. या घोषणेत शिंदे गट आणि मनसे कुठे असतील? कदाचित कुठेच नसतील. भाजपच्या मुंबईतील विजयोत्सवाचे ते प्रमुख मराठी पाहुणे असू शकतात!

  • विवेक गिरधारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news