रोम : मेंदूची शस्त्रक्रिया सुरू असताना अन्य भागांना धक्का लागू न देणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे असे भाग सक्रिय ठेवणे गरजेचे असल्याने अनेक रुग्णांना त्यांच्या आवडीचे काम, विशेषतः गाणे, वाद्यवादन आदी करण्यास किंवा टी.व्ही.वर चित्रपट पाहण्यास सांगितले जात असते. इटलीतही आता अशीच एक शस्त्रक्रिया झाली आहे. त्यावेळी मेंदूवर शस्त्रक्रिया सुरू असताना रुग्ण सॅक्सोफोन हे वाद्य वाजवत होता.
जीझेड नावाच्या 35 वर्षांच्या रुग्णावर रोमच्या पेडिया इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये ही ब्रेन ट्यूमरवरील यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्या रुग्णाला डिस्चार्जही मिळाला. हा रुग्ण स्वतः एक संगीतकार आहे. त्याच्या मेंदूमध्ये गाठ होती आणि डॉक्टर ती ऑपरेशन करून काढणार होते. मात्र, त्याला पूर्णपणे भूल देता येणार नव्हती.
ज्या भागाचे ऑपरेशन होते तितक्याच भागाला भूल देऊन अन्य भाग सक्रिय ठेवला जाणार होता, जेणेकरून रुग्णाच्या मेंदूच्या नसांना नुकसान होणार की नाही हे समजू शकले असते. ही शस्त्रक्रिया तब्बल नऊ तास सुरू राहिली. या नऊ तासांमध्ये हा तरुण सॅक्सोफोन वाजवत राहिला. जीझेडने सांगितले की त्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्याला भीती वाटण्याऐवजी शांतता वाटत होती. त्याने सॅक्सोफोनवर 1970 च्या काळातील 'लव्ह स्टोरी' या चित्रपटातील तीन गाणी वाजवली.