व्हीआयपींच्या सुरक्षिततेची जबाबदारी महिला कमांडोंच्या हाती

व्हीआयपींच्या सुरक्षिततेची जबाबदारी महिला कमांडोंच्या हाती

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : देशात प्रथमच व्हीआयपींच्या सुरक्षिततेची जबाबदारी महिला कमांडोंच्या पथकाकडे दिली जाणार आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) हे पथक असून, ते आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा यांना सुरक्षा पुरविणार आहे.

सीआरपीएफच्या अशा या पहिल्याच पथकात 32 महिला कमांडोंचा समावेश आहे. सध्या या पथकाकडे दिल्लीतील व्हीआयपींच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपविली जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या महिला कमांडोजना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा, काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्या संरक्षणासाठी तैनात केले जाणार आहे.

हे सर्व नेते हाय रिस्क प्रोफाईलमध्ये येतात. त्यामुळे त्यांना अद्ययावत संरक्षणव्यवस्था पुरवली गेली आहे. याशिवाय झेड प्लस सुरक्षाप्राप्त इतर एक डझनभर व्हीआयपींच्या सुरक्षिततेची जबाबदारीही याच महिला कमांडोजकडे असेल.

जानेवारीपासून ड्यूटी

सूत्रांच्या माहितीनुसार, या महिला कमांडोजनी त्यांचे 10 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणात व्हीआयपींच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडणे, हत्यारांशिवाय लढणे, शरीराची झडती घेणे, विशेष शस्त्रास्त्रे चालवणे या प्रशिक्षणाचा समावेश होता. जानेवारीपासून या महिला कमांडोजना तैनात केले जाणार आहे.

अशी असेल जबाबदारी

पुरुष कमांडोजप्रमाणे सर्व हत्यारे, संरक्षण उपकरणे आणि गॅझेट्सही या महिलांकडे असेल. व्हीआयपींच्या घराचे संरक्षण करणार्‍या टीममध्ये या महिला तैनात असतील. गरज पडल्यास या व्हीआयपींबरोबर कमांडोंना पाच राज्यांत होणार्‍या निवडणुकांमध्ये प्रचारावेळीही पाठवले जाईल. याशिवाय घरी येणार्‍या व्हिजिटर्सची झडती घेणे, सर्व सुरक्षा व्यवस्था पाहणे अशा जबाबदार्‍या त्यांच्यावर असतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news