सोलापूर : विशाल फटे याने जमवलेली माया शोधण्याचे आव्हान?

सोलापूर : विशाल फटे याने जमवलेली माया शोधण्याचे आव्हान?

सोलापूर : गणेश गोडसे : शेअर मार्केटमध्ये अशक्यप्राय 30-35 टक्क्यांच्या परताव्याचा भूलभुलय्या निर्माण केलेल्या बिग बुल विशाल फटे याने कोट्यवधी रुपयांची माया जमविली. त्यातून त्याने आलिशान गाडी, बार्शीत बंगलाही उभारला. काही मालमत्ता घेतल्या. पण स्थावर आणि बँक बॅलन्स पाहता चार-पाच कोटींच्या घरातच त्याची संपत्ती दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर फटेने जमवलेल्या व गायब केलेल्या संपत्तीच्या चौकशीचे आव्हान निर्माण झाले आहे.

दुसरीकडे आतापर्यंत आलेल्या फसवणुकीतील तक्रारींचा आकडा 22 कोटी रुपयांवर गेला आहे. पण पोलिस चौकशीतील आकडा संपतीच्या दहावा भागही नाही. मग त्याने जमविलेले गुंतवणुकीचे 22 कोटी रुपये गेले कुठे, हा पोलिसांसमोर यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. अजुनही तक्रारींचा ओघ सुरूच आहे. तर तक्रारी न आलेल्या रकमा वेगळ्याच आहेत. पोलिसाच्या चौकशी त्यादिशेने जाऊन किमान तक्रारींनुसार गुंतवणूकदारांचे पैसे वसूल करून ते परत मिळण्याची अपेक्षा तक्रारदार गुंतवणुकदार बाळगून आहेत.

आयती माया गोळा करण्याची चटक लागलेल्या विशाल फटेने नेट कॅफेतून सुरू केलेल्या शेअर मार्केटचा गोरखधंदा हळूहळू चांगलाच बस्तान बसविणारा ठरला. जेथे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून महिन्याला चार-पाच टक्के व्याज मिळणेही मुश्किल असताना त्याने 30-35 टक्क्यांचे आमिष दाखविले.

सुरुवातीला त्याने काही लोकांना तसे पैसे दिल्याने लोकांनी आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवला. वास्तविक तो शेअर मार्केटमधील तज्ज्ञ नव्हता कि त्याने यासंदर्भातील कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. शिवाय तो आपल्या गुंतवणुकीतून एवढे पैसे कसे परत देणार, तो त्यासाठी कोठे गुंतवणूक करतो, याच्या खोलातही कुणीच गेले नाही.

एवढेच नव्हे तर तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो का? त्याची कार्यपद्धती कशी? या खोलातही त्याच्या जवळचे गुंतवणूकदार मित्र गेले नाहीत. जर कोणी विचारले तर त्याला फटे अशी उत्तरे द्यायचा की समोरचा चिडीचूपच व्हायचा. प्रसंगी ठेवी परत नेऊन संबंधितांशी व्यवहार तोडायची धमकीही द्यायचा. त्या कारणाने तसेच वारेमाप व्याज मिळू लागल्याने कोणी त्याला आडेवेडे घेतले नाहीत. यामुळे त्याचे धाडस अधिकच वाढत गेले.

विशाल फटे याने अलका शेअर सर्व्हिसेस, विशालकासह विविध तीन कंपन्यांच्या नावे गुंतवणूकीला बळ यातूनच मिळत गेले. त्याचे मुख्यालय बार्शीतच होते. 30-32 संगणक, लोकांवर संभाषणाद्वारे प्रभावासाठी विशिष्ट गणवेशात मुलींची नियुक्ती, कार्यालयातील टापटिपपणा अशा कारभाराने अनेकजण भुलले. अखेर जानेवारीत त्याच्या या सर्व फसवणुकीच्या कारभाराचा भांडाफोड झाला. पोलिसांत तो हजर झाला.

या फसवणुकीच्या आता 110 च्या आसपास तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये सुमारे 22 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अर्थात, ही केवळ लोकांची गुंतवणुकीचीच रक्कम आहे. ती पोलिसांनी पुराव्यांसह खातरजमा करुन निश्चित केली आहे.

दरम्यान, फसवणूक झालेल्या अनेकजणांनी घरे, शेतजमिनी गहाण टाकून, विकून, प्रसंगी कर्जे काढून त्याच्याकडे गुंतवणूक केली आहे. आता फटेची मालमत्ता सील केली आहे. त्यातील कार्यालयही भाड्याचे आहे. दोन बंगले, दोन अलिशान गाड्या अन् बँकेत केवळ दोन कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. वडिलोपार्जित थोडीफार सोडली एकूण चार-पाच कोटी रुपयांची मालमत्ता असेल. तर मग अन्य 17-18 कोटींच्या रकमा त्याने कुठे गुंतविल्या आहेत? का बेनामी काही कारभार केला? या शोधाचे आव्हान पोलिस यंत्रणेने समोर आहे. त्याआधारेच फसवणूक झालेल्यांना किमान मुद्दल तरी मिळण्याचा अपेक्षा गुंतवणूकदार बाळगून आहेत.
(समाप्त)

बेनामी स्रोत, बदनामीच्या भीतीने बड्यांच्या रकमा नामानिराळ्याच…

विशाल फटेच्या या फसवणुकीच्या जाळ्यात अनेक राजकीय व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टरांसह उद्योगपतीही अडकले आहेत. त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमांचाही यामध्ये समावेश आहे. विशाल फटेने गाशा गुंडाळल्याने त्यांचेही धाबे दणाणले आहेत. पण त्यातील कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नसल्याची चर्चा आहे. यातील अनेकजणांचे बेनामी स्रोत तर काही जण बदनामीच्या भीतीने गप्पच असल्याचे दिसून येत आहे. त्या तक्रारी आल्यास फसवणुकीचा आकडा कित्येकपट वाढण्याचीही शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news