नुकसानीची भरपाई देणारा फायर इन्श्युरन्स म्हणजे काय?

नुकसानीची भरपाई देणारा फायर इन्श्युरन्स म्हणजे काय?

आज दुकान, घर, व्यवसाय, कार्यालय, कारखाना यांसाठी फायर इन्श्युरन्स हा काळाची गरज ठरत आहे. फायर इन्श्युरन्स म्हणजे काय?
फायर इन्श्युरन्स हा वास्तविक विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यातील करार आहे. या कराराच्या आधारावर विमाधारक कंपनीला हप्ता भरतोे आणि त्या बदल्यात विमा कंपनी मालमत्तेला सुरक्षा कवच प्रदान करते. फायर इन्श्युरन्स हे एक प्रकारे मालमत्तेला संरक्षण देणारी योजना असून फरक एवढाच की, यात केवळ आगीमुळे झालेल्या नुकसानीला आर्थिक कवच प्रदान करण्याचे काम करते.

अग्निविम्याची वैशिष्ट्ये

फायर इन्श्युरन्स दोन घटकांच्या आघाडीवर महत्त्वाचा आहे. विमा योजनेनुसार आगीमुळे झालेल्या मालमत्तेची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून दिली जाते म्हणून विमा उतरवताना चल-अचल मालमत्तेची संपूर्ण माहिती विमा कंपनीला देणे गरजेचे आहे. ज्या कार्यालयाचा, घराचा विमा उतरवत आहोत, तेथील मालमत्तेची संपूर्ण माहिती आणि मूल्यांकन एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडून करून घ्यावे. त्यामुळे दावा करताना ही कृती उपयुक्त ठरू शकते.

फायर इन्श्युरन्स उतरवताना संबंधित घर किंवा कार्यालय विमा योजनेच्या निकषात बसणारे असावे आणि त्याची अनिवार्यतादेखील सांगता येणे आवश्यक आहे. दाव्याची रक्कम ही विमा कवचएवढी असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर आगीमुळे हेाणारे नुकसान भरून काढण्यासाठी विमाधारक हा कंपनीकडे दावा करू शकतो. विमा कंपनीदेखील दुर्घटनेची पडताळणी करते आणि आगीमुळेच हानी झाली आहे की नाही, याची खातरजमा करते. अर्जात नमूद केलेल्या मालमत्तेची आगीत हानी झाली आहे का? याबाबत विमा कंपनीचे अधिकारी चाचपणी करतात.

दाव्याच्या वेळी आवश्यक कागदपत्रे फायर इन्श्युरन्समध्ये क्लेम करताना काही कागदपत्रे गरजेची असून, त्याशिवाय दावा मंजूर होऊ शकत नाही. विमाधारकाने भरलेला अर्ज आणि त्याची स्वाक्षरी. याशिवाय अग्निकांडात हानी झालेल्या वस्तूंची माहितीदेखील विमा कंपनीकडे असणे आवश्यक आहे. अग्निकांडामुळे झालेल्या नुकसानीचे फोटो किंवा वर्तमानपत्रातील बातम्यांच्या कात्रणांचा देखील संदर्भ हा दाव्यांस जोडता येऊ शकतो. तसेच अग्निशमन विभाग आणि पोलिस विभागाचा रिपोर्ट देखील द्यायला हवा. या सर्व गोष्टी विमा प्रमाणपत्रांशी देखील जोडणे आवश्यक आहे.

पॉलिसीमध्ये कवच कशाला मिळते?

अग्निविमा पॉलिसीची व्याप्ती अधिक आहे. यात दुर्घटनेमुळे आग लागण्याव्यतिरिक्त वीज पडणे, स्फोट होणे, पाण्याची टाकी फुटणे, गॅस सिलिंडरचा स्फोट आदी कारणांमुळे झालेले नुकसान, विमा उतरवलेले घर आणि बाजूच्या घराचे नुकसान, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करणार्‍या व्यक्तीची हानी झाल्यास त्याची भरपाई आदीं गोष्टींचा यात समावेश असतो.

जोखीम कवच आणि हप्ता अन्य विमा पॉलिसीप्रमाणेच फायर इन्श्युरन्समध्ये विमा कवचची रक्कम ही महत्त्वाची आहे. विमा कवच अचल संपत्ती आणि त्यातील सामानाच्या मूल्यांकनावर आधारित असते. अर्जदाराकडे एकापेक्षा अधिक मालमत्ता असेल, तर सर्वांचे मूल्यांकन करायला हवे. या आधारावरच जोखमीची रक्कम निश्चित होते. त्यानुसार हप्ता आकारला जातो. प्रत्येक प्रकारच्या विमा पॉलिसीतील दावे निकाली काढण्यासाठी ऑनलाईन सुविधा आहे. अर्थात, क्लेम करणार्‍या व्यक्तीला आपल्या बँक खात्याची माहिती विमा कंपनीकडे अपडेट करणे गरजेचे आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत आगी लागण्याच्या घटनांची संख्या वाढते. अशा दुर्घटनांमध्ये होणार्‍या जीवितहानीची भरपाई होऊ शकत नाही; परंतु आपण फायर इन्श्युरन्स अर्थात अग्निविमा उतरवला असेल, तर आगीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई मिळू शकते.

– प्रसाद पाटील

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news