जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात पहिल्यांदाच लागलेला लिथियमच्या मोठ्या साठ्यांचा शोध देशासाठी जॅकपॉटसारखा आहे. प्रचंड जागतिक मागणीमुळे लिथियमला 'पांढरे सोने' म्हटले जाते. इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल फोनमधील बॅटरी बनवण्यासाठी लिथियमचा वापर केला जातो. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क फॉर क्लासिफिकेशनअंतर्गत मौल्यवान इंधन आणि खनिज ठेवींचे वर्गीकरण केले जाते. जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडलेले लिथियमचे साठे जी-4 श्रेणीतील आहेत. लिथियम हे पर्यावरणपूरक पद्धतीने जीवनाला अनुकूल बनवण्यास उपयुक्त असल्याने अलीकडील काळात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले आहे. याचे कारण आज संपूर्ण जग जीवाश्म इंधनाला पर्यायाच्या शोधासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.
यासाठी सौरऊर्जा, पवनऊर्जा, मिथेन, हायड्रोजन, इतकेच नव्हे तर समुद्राचे पाणी यासारख्या अनेकविध पर्यायांचा इंधनासाठी वापर करून पाहिला जात आहे. या प्रयत्नांमधून तूर्त तरी विद्युतऊर्जेचा इंधन म्हणून वापर केला गेल्यास तो अधिक प्रभावी आणि व्यवहार्य ठरतो, असे दिसून आले आहे. विशेषतः, दळणवळणाच्या क्षेत्रात वाहनांसाठी विद्युतऊर्जेचा वापर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, त्याचे सकारात्मक फायदे समोर येताहेत. आज भारतात इलेक्ट्रिक कार, दुचाकी, बसेस यांची संख्या वेगाने वाढत आहे. येत्या काळात देशातील पेट्रोल-डिझेलवर चालणार्या बहुतांश वाहनांच्या जागी विद्युत वाहने धावताना दिसू शकतात, असे सध्याचे वातावरण आहे.
विद्युत वाहनांमध्ये ही ऊर्जा तयार करण्यासाठी ज्या बॅटरीचा वापर केला जातो त्यामध्ये लिथियम हा महत्त्वाचा घटक असतो. याखेरीज मोबाईल, सोलार पॅनेलमध्ये लिथियम धातूचा वापर अनिवार्य आहे. लिथियम आयन बॅटरीशिवाय या वस्तू तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळेच लिथियम-आयन बॅटरी बनवणार्या संशोधकाला या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते. आजघडीला भारतात मोठ्या प्रमाणावर लिथियमची आयात केली जाते. 2020 पासून भारत लिथियम आयातीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. यापैकी 80 टक्के भाग चीनकडून मागवला जातो.
आत्मनिर्भर बनण्यासाठी अर्जेंटिना, चिली, ऑस्ट्रेलिया, बोलिव्हिया आदी देशांकडून लिथियम खरेदी करण्याचा भारताचा विचार आहे. अनेकांना हे माहीत नसेल की, युक्रेन आणि रशिया युद्धाच्या कारणांपैकी लिथियम हे एक महत्त्वाचे कारण होते. कारण, युक्रेनच्या जमिनीत 'व्हाईट गोल्ड' अर्थात लिथियमच्या खाणी विपुल प्रमाणात आहेत. तेथील लिथियमचा योग्य वापर झाला; तर युक्रेन हा लिथियम निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनू शकतो, असे सांगितले जाते. भारतात अलीकडील काळात लिथियमची गरज वाढत असली, तरी इतर देशांवरच अवलंबून राहावे लागत होते. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील साठ्यांचे महत्त्व लक्षात येते. विशेषतः, चीन आणि भारतामध्ये तणावाचे संबंध कायम असताना काश्मीरमध्ये लिथियमचा साठा मिळणे ही देशासाठी चांगली गोष्ट आहे.
देशात लिथियमचा प्रचंड साठा मिळाल्याने औद्योगिकीकरण आणि विकासाला नवी दिशा मिळणार, हे स्पष्ट आहे. तथापि, मोठ्या लिथियमसाठ्याच्या शोधासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे मोबाईल फोन आणि लॅपटॉप उद्योगालाही बळ मिळेल, हे नक्की. सुमारे सहा दशलक्ष टन एवढा मोठा साठा उपलब्ध झाल्याने देशातील इलेक्ट्रिक कार उद्योगात उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे देशाला डिझेल आणि पेट्रोल वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी भारताने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास मदत होईल.
चालू दशकाच्या अखेरीस देशातील इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनात 30 टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज आहे. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने ज्या भागात हा मोठा शोध लावला आहे, तिथे लोकांची वस्ती नाही, त्यामुळे विस्थापनाच्या संकटाला तोंड द्यावे लागणार नाही. अशा परिस्थितीत लिथियमचा शोध देशाच्या विकासासाठी परिवर्तनकारी परिणाम देऊ शकेल, असा विश्वास आहे. यासोबतच लिथियम उत्पादक देशांच्या यादीत सामील झाल्यामुळे स्वावलंबी भारताची प्रतिष्ठाही वाढेल.
भारताची हरित आणि पर्यावरणपूरक उद्दिष्टे साध्य करण्यास हा शोध उपयुक्त ठरणारा आहे. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेसाठी रोजगार आणि विकासाच्या द़ृष्टीने हे यश बहुआयामी असेल. त्यामुळे कुशल, अकुशल आणि अर्धकुशल कामगारांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. पुढील टप्प्यातील दोन अभ्यासांतून खरी परिस्थिती अधिक स्पष्ट होईल, यात शंका नाही; पण या कामगिरीमुळे देशासह या राज्याच्या समृद्धीचे नवे दरवाजे उघडणार आहेत.
आजघडीला बोलिव्हियामध्ये 21 दशलक्ष टन लिथियमचा साठा आहे. याखेरीज अर्जेंटिनामध्ये 17 दशलक्ष टन, ऑस्ट्रेलियामध्ये 6.3 दशलक्ष टन आणि त्याच्या शेजारी चीनमध्ये 4.5 दशलक्ष टन लिथियमचा साठा आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडलेला साठा त्यातुलनेने कमी असला, तरी लिथियमच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार जम्मू आणि काश्मीरव्यतिरिक्त राजस्थान आणि गुजरातच्या ब्राईन पूल आणि ओडिशा आणि छत्तीसगडच्या मीका परिसरात लिथियम खनिज शोधण्याच्या प्रयत्नात आहे.
काश्मीरमधील या शोधाचे श्रेय देशातील भूवैज्ञानिकांना जाते. कारण, वर्षानुवर्षे त्यांच्याकडून याचा शोध घेतला जात होता. 2021 मध्ये कर्नाटकातही लिथियम सापडले होते; मात्र त्याचे प्रमाण कमी होते. जम्मू आणि काश्मीरमधील शोधही अद्याप पहिल्या टप्प्यात आहे. त्याचे खाणकाम अधिक व्यापक करण्यासाठी वेळ लागणार आहे. तथापि, देशासाठी आणि जम्मू-काश्मीरच्या विकास आणि समृद्धीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, यात शंकाच नाही. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, रियासी हा जिल्हा पर्यावरणीयद़ृष्ट्या संवेदनशील असणार्या हिमालयीन प्रदेशात आहे. त्यामुळे लिथियमच्या उत्खननासाठी होणार्या खाणकामात पर्यावरणाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.
शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य जवळ येत असल्याने आपल्याला लिथियमच्या आयातीवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था आणि परिसंस्था या दोन्हींच्या विचारांतून याकडे पाहिले पाहिजे. जगात आतापर्यंत ज्या देशांमध्ये लिथियम मोठ्या प्रमाणात सापडले आहे त्या देशांमध्ये खाणकामामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय संकटाविरुद्ध जनक्षोभ वाढला आहे. तेथे खनिज संपत्तीचे लोकशाहीकरण आणि लोकसहभागाची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात उद्याच्या भविष्यात खाणकामामुळे स्थानिक लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ नये आणि त्याचबरोबर पर्यावरणावर होणारे परिणाम कमीत कमी राहतील, यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लिथियमच्या शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते, हेही विसरता कामा नये. फ्रेंडस् ऑफ द अर्थ (एफओई) च्या अहवालानुसार, एक टन लिथियम तयार करण्यासाठी सुमारे 2.2 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. जगातील सर्वात जास्त लिथियमचा साठा असलेल्या चिली या देशात लिथियमच्या खाणकामामुळे पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे.
कोणत्याही प्रकारचे खाणकाम पर्यावरणासाठी हानिकारक असते, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. कारण, ते पाणी, माती, हवा प्रदूषित करते. परिसंस्थेवर परिणाम होतो. परंतु, खाणकोळसा किंवा इतर जीवाश्म इंधनांच्या तुलनेत लिथियम उत्खनन फायदेशीर म्हणावे लागेल. कारण, ते पुनर्वापर ऊर्जेच्या श्रेणीत येते. म्हणजेच एकदा लिथियम काढून त्याची बॅटरी बनवली की, ती चार्ज करून पुन्हा पुन्हा वापरता येते. त्यामुळेच लिथियमचे साठे हा भारतासाठी जॅकपॉट म्हणावा लागेल.
रंगनाथ कोकणे