वारी २०२२ : रिंगण… ‘तुका म्हणे वृद्ध होती तरुण’

निर्मल दिंडी
निर्मल दिंडी

वाखरी : माऊलींच्या पालखी सोहळ्यात शिस्तबद्ध वारीचा अनुभव येतो. एका सुरात एका तालात वारकरी चालत असतात. आळंदी ते पंढरपूर असा सुमारे 240 किलोमीटरचा प्रवास कसा संपतो तेच कळत नाही. सतत चालत असताना मग मनोरंजनासाठी काही तरी हवंच ना! रिंगण आणि उडीचे खेळ त्यासाठीच तर असतात ना! चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण. त्यानंतर पुरंदावडे, खुडुस फाटा, ठाकूरबाबाची समाधी आणि वाखरी येथील गोल रिंगण आनंद आणि उत्साह वाढवतातच आणि कंटाळही घालवतात.

वारीतील एकसुरीपणा घालविण्यासाठी आणि मनोरंजनासाठी महत्त्वाचा 'रिंगण' सोहळा पालखीबरोबर पार पाडला जातो. रिंगणात रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात. मानाचे दोन अश्व हे प्रशिक्षित असतात. एका अश्वावर कुणीच आरूढ होत नाही. त्याला 'माऊलीचा अश्व' म्हणतात. दुसर्‍या अश्वावर एक कानडी घोडेस्वार आरूढ होतो. माऊलीचा अश्व सुमारे एक किलोमीटरवरून पळत येऊन रथात असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना मान टेकवून नमस्कार करतो.

रथाला प्रदक्षिणा घालतो आणि चोपदाराने आदेश दिला की, पुन्हा पळत जातो. हा क्षण पाहण्यासाठी लाखो वारकरी डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत असतात. ठरावीक संकेतानंतर हे अश्व गोल फेर्‍या घालून रिंगण घालतात किंवा समांतर उभ्या राहिलेल्या वारकर्‍यांमधून एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे धावतात. अश्वाला स्पर्श करण्यासाठी वारकरी आसुसलेले असतात. मानाच्या अश्वाची रिंगणे झाली की, वारकरी त्या रिंगणात उतरून झिम्मा-फुगडी, विविध प्रकारच्या उड्या, लेझीम, भारुडे असे सामुदायिक खेळ खेळतात. खेळात भाग न घेतलेले वारकरी बाहेरच्या गोलात उभे राहून हा मनोरंजनाचा कार्यक्रम पाहतात. पालखीच्या मुक्कामात गावोगावी अशी रिंगणे होतात.

पावसाच्या सरी वारकर्‍यांना शूचिर्भूत करतात, तर कधी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढतात. दरमजल करीत साधारणत: 16 ते 17 दिवस चालत, रात्रीचा गावोगावी मुक्काम करीत, भजन-कीर्तनात रममाण होत दोन्ही पालख्यांचे सर्व वारकरी एकादशीच्या अगोदर वाखरी या गावी एकत्र होतात आणि एकादशीच्या दिवशी सर्व भक्तजन पंढरपुरात झुंबड उडवतात.

एकादशीच्या दिवशी वारकरीच नव्हे, तर बहुतेक सर्व लोक उपवास करतात. त्यासाठी उपवासाचे पदार्थ केले जातात. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या वारीचे सार्थक आणि पुण्य पदरात पडल्याचे समाधान मिळवायचे असते. पंढरपूरच्या मंदिरात आणि आसपासच्या परिसरात माणसांचा महापूर लोटतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठोबा-रखुमाईची महापूजा होते. विठ्ठलाच्या आरतीने पूजेची सांगता होते. दिवसभर हा परिसर भजन-कीर्तनाने दुमदुमून निघतो. चंद्रभागेचे वाळवंट भक्तांनी फुलून जाते.

'आजि संसार सुफळ झाला गे माये
देखियले पाय विठ्ठोबाचे
सो मज व्हावा, तो मन व्हावा
वेळोवेळा व्हावा पांडुरंग'

असे म्हणत वारकरी कृतकृत्य होतात. पुढच्या वर्षीच्या आषाढी एकादशीची स्वप्ने पाहत संसाराकडे वळतात.

सतीश मोरे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news