वर्षा उसगावकरांच्या वक्तव्यावर मासळीविक्रेत्या संतप्त

वर्षा उसगावकरांच्या वक्तव्यावर मासळीविक्रेत्या संतप्त

भाईंदर; पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री वर्षा उसगावकारांनी एका ऑनलाईन मासेविक्रेत्या कंपनीचे अ‍ॅपद्वारे प्रमोशन करण्यासाठी केलेल्या जाहिरातीत आपल्याला मासळी खाण्यास आवडतात पण त्या निवडता येत नाहीत. त्यामुळे कोणती मासळी शिळी व कोणती मासळी ताजी, याची माहिती नसल्याने अनेकदा मासळीविक्रेत्या महिला आपली फसवणूक करीत असल्याचे वक्तव्य त्यांनी जाहिरातीत केले. यावरून मासळी विक्रेत्या महिला प्रचंड संतापल्या आहेत.

गोवा या परराज्यातून आलेल्या उसगावकर यांनी महाराष्ट्रातील कष्टकरी मासळी विक्रेत्या महिलांचा अपमान करणे अपेक्षित नाही. सिनेसृष्टीत ज्येष्ठ अभिनेत्री असलेल्या उसगावकर यांच्याकडून दुसर्‍या व्यावसायिक क्षेत्रातील महिलांचा अपमान करणे अतिशय दुर्दैवी बाब आहे. यातून गरिबांच्या प्रती उसगावकर यांची असलेली मानसिकता प्रखरपणे दिसून येते, अशी खंत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या महिला अध्यक्षा नयना पाटील यांनी व्यक्त केली आहे.

अनेक मासळी विक्रेत्या महिलांचे पती स्वतः मच्छीमार असून त्यांच्या स्वत:च्या मासेमारी नौका असताना त्या खराब मासळी का विकतील? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे. ऑनलाइन मासळी विक्री करणारे कोणत्या बोटीने, कोणत्या समुद्रात मासेमारी करतात. हेच ऑनलाईन कंपनीवाले मच्छीमारांकडूनच मासळी खरेदी करीत असल्याने त्यांच्याकडील मासळी ताजी कशी असेल, यावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ऑनलाईन मासळी विक्रेत्या कंपन्यांनी आपला व्यवसाय जरूर वाढवावा पण आपल्या फायद्यासाठी मच्छीमारांना व मासळी विक्रेत्या महिलांना बदनाम करू नये. तसे करण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड इशारा पाटील यांनी दिला आहे. उसगावकरांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा संपूर्ण राज्यात निषेध व्यक्त करण्यात येत असून त्यांनी केलेल्या जाहिरातीवर राज्य शासनाने तात्काळ बंदी घालावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असेही त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news