वर्ल्डकपची तयारी योग्य ट्रॅकवर

वर्ल्डकपची तयारी योग्य ट्रॅकवर

नवी दिल्ली : भारताने नुकतीच इंग्लंडमध्ये टी-20 आणि वन-डे मालिका जिंकून मर्यादित षटकांच्या सामन्यात आपली दादागिरी दाखवून दिली आहे. दोन्ही मालिकेत मिळवलेेल्या विजयाबरोबरच वर्ल्डकपच्या द़ृष्टीने भारतासमोर असलेले पाच मोठे प्रश्न मिटले आहेत. गेल्या काही महिन्यांत भारतीय संघ व्यवस्थापनात बदल झाले आहेत. रोहित शर्माकडे नेतृत्व आणि प्रशिक्षकपदी राहुल द्रविड आहेत. आता भारताचे लक्ष्य आहे ते ऑक्टोबर 2023 मध्ये होणारी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा जिंकण्याचे. भारतीय क्रिकेट संघाला 2011 नंतर आयसीसी वर्ल्डकप जिंकता आला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत 11 वर्षाचा वर्ल्ड जेतेपदाचा दुष्काळ संपवेल अशी इच्छा आहे.

चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला

भारताने 2007 पासून दोन वर्ल्डकप जिंकले आहेत. यात एक वन-डे आणि टी-20 वर्ल्डकपचा समावेश आहे. या दोन्ही स्पर्धेत युवराज सिंग मालिकावीर ठरला होता आणि तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत असे. आतापर्यंत टीम इंडिया युवराजची जागा कोण घेईल याचा शोध घेत होते. या काळात 18 खेळाडूंना चौथ्या क्रमांकावर संधी दिली. पण, युवराजच्या जवळपास कोणी जाऊ शकले नाही. आता इंग्लंड दौर्‍यात याचे उत्तर मिळाले. सूर्यकुमार यादवने 3 टी-20 सामन्यांत 171 धावा केल्या. यात एका शतकाचादेखील समावेश होता.

ऑलराऊंडर हार्दिकमुळे संघाला बळकटी

हार्दिक पंड्याच्या पाठीची दुखापत बरी होत नव्हती. या सर्व प्रकारानंतर हार्दिकने कठोर मेहनत घेतली. आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आणि पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवले. या कामगिरीनंतर भारतीय संघात निवड झालेल्या हार्दिकने टी-20 आणि वन-डे मालिकेत कमाल करून दाखवली. इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये 6 विकेटस्सह धमाकेदार फलंदाजी त्याने करून दाखवली. हार्दिक संघात परतल्याने मधळी फळी मजबूत झाली आहे. वर्ल्डकपसाठी भारताला त्याच्यापेक्षा उत्तम ऑलराऊंडर मिळू शकत नाही.

विराटला मिळाला बॅकअप

इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत विराट कोहली संघात नव्हता. त्याच्या जागी दीपक हुड्डाला संधी मिळाली. दोन वेळा क्रमांक 3 वर आणि एकदा सलामीला येत दीपकने 3 सामन्यांत 179 धावा केल्या. दीपक फलंदाजी सोबत फिरकी गोलंदाजी देखील करतो. जर विराट फॉर्ममध्ये परतला नाही तर त्याच्यासाठी संघातील स्थान टिकवणे अवघड होईल. त्यामुळे विराटचा फॉर्म जरी परत आला तरी संघासाठी फार मोठा चिंतेचा विषय नसेल, त्याचा बॅकअप तयार आहे.

रोहित आल्यानंतर

गेल्या वर्षी टी-20 वर्ल्डकपनंतर रोहितला वन-डे आणि टी-20चे कर्णधारपद देण्यात आले. काही दिवसांनी विराटने कसोटीचे कर्णधारपद सोडले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सात मालिका खेळल्या आहेत आणि त्या सर्व मालिका टीम इंडियाने जिंकल्या. रोहितने 4 टी-20, 2 वन-डे आणि 1 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. रोहितला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे आणि पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत तो पुन्हा संघाचे नेतृत्व करेल. याचा अर्थ रोहित टी-20 वर्ल्डकपवर फोकस करत आहे.

पंतचा परिपक्वपणा वाढला

इंग्लंड दौर्‍यावर विकेटकीपर ऋषभ पंत शानदार फॉर्ममध्ये आहे. गेल्या एका वर्षात पंतने तीनही फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम फलंदाजी केली आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटीत शतक, वन-डेत शतकी खेळी केली. 1 जुलै 2021 मध्ये 36 सामन्यांत 1 हजार 287 धावा केल्या. कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकेल अशी पंतची फलंदाजी आहे. तो आता आपल्या विकेटचे महत्त्व ओळखून जबाबदारीने खेळ करीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news