वरळीतील ‘कोल्हापूर भवना’त शाहू संग्रहालय उभारणार

वरळीतील ‘कोल्हापूर भवना’त शाहू संग्रहालय उभारणार

Published on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे उल्लेखनीय कार्य तरुण पिढीला समजावे, यासाठी मुंबईतील वरळी येथे भव्य व प्रशस्त असे 'कोल्हापूर भवन' बांधणार आणि या भवनात छत्रपती शाहू संग्रहालय उभारणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत गुरुवारी रात्री केली. ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिस्तंभ अनावरणप्रसंगी गिरगावातील खेतवाडी येथे बोलत होेते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा गिरगावातील पन्हाळा लॉज या बंगल्याच्या ठिकाणी हा दहा फूट उंचीचा घडीव दगडी (कातळ) स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. स्मृतिस्तंभ अनावरणवेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार मालोजीराजे, खासदार अनिल देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, राजर्षी शाहू शताब्दी समितीचे अध्यक्ष वसंतराव मुळीक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे मुंबईत 6 मे 1922 रोजी निधन झाले. त्या ठिकाणी स्मृतिस्तंभ उभारावा, अशी शाहूप्रेमींची मागणी होती. त्यामुळे या स्मृतिस्तंभासाठी कोल्हापुरातून घडीव दगड गिरगावात आणण्यात आले. पन्हाळा लॉजच्या जागेवर हा स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध होते. सहा महिन्यांपूर्वी समितीने माझी भेट घेऊन स्मृतिस्तंभ उभारण्याची इच्छा व्यक्‍त केली. मी तत्काळ त्याला मान्यता दिली व स्मृतिस्तंभासाठी मुंबई महापालिकेला सांगितले. स्मृतिस्तंभ उभारण्याचे कार्य घडविणे हे देवाच्या हातात होते. ते कार्य माझ्या हातून घडले, हे मी माझे भाग्य समजतो. आज इतिहासाचा अभ्यास कोणी करीत नाही. आजही छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव घेतले जाते. मात्र, आज काहीजण इतिहास विसरत चालले आहेत, असे सांगत आजच्या तरुणाईला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य समजावे, यासाठी वरळी येथे 'कोल्हापूर भवन' लवकरच उभारू. या भवनमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे संग्रहालय असणार आहे. हसन मुश्रीफ म्हणाले, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना रयतेचे राजे म्हणून ओळखले जाते. 1902 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षण दिले. त्यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे.

मालोजीराजे म्हणाले, आजचा दिवस हा ऐतिहासिक क्षण आहे. उद्या, शुक्रवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व मुंबई महापालिकेच्या सहकार्यातून हा स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. मी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा खापर पणतू, तर आदित्य ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे याचे पणतू आहेत. आजचा क्षण दोघांसाठी भाग्याचा आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कार्य केले. जगात व देशात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना ओळखले जाते. उद्या होणार्‍या कोल्हापुरातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी यावे, असे मी आमंत्रण देतो. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, जीवनातील महत्त्वाचा आजचा प्रसंग आहे. प्रबोधनकार ठाकरे व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे अतिशय चांगले संबंध होते. संसद व विधान भवनाच्या प्रांगणात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या कार्याचा विचार आपणाला पुढे न्यायचा आहे. मी आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की, मुंबईत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे. समिती अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी समिती उपाध्यक्ष बबन रानगे, हर्षल सुर्वे, प्रताप नाईक-वरुटे, मुंबई संयोजक चंद्रकांत पाटील, प्रज्ञा जाधव आदी उपस्थित होते.

शिवाजी महाराजांचा पोवाडा गायिला

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा या ठिकाणी कोल्हापुरातील शिवशाहीर दिलीप सावंत यांनी गायिला. यानिमित्त गिरगाव परिसरात भगवे ध्वज लावण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र शाहूमय वातावरण होते. या स्मृतिस्तंभ लोकार्पण सोहळ्यास शाहूप्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.

…असा आहे स्मृतिस्तंभ

मुंबई महापालिकेने या स्मृतिस्तंभाची निर्मिती केली आहे. स्तंभाची उंची 10 फूट असून, त्याचा आराखडा तयार करण्यासाठी कोल्हापूरच्या सह्याद्री इतिहास संस्थेचे साहाय्य घेण्यात आले. हा स्मृतिस्तंभ बेसॉल्ट दगडापासून बनविण्यात आला आहे. त्यावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा आणि अखेरच्या क्षणी शाहू महाराजांनी उच्चारलेले वाक्य कोरण्यात आले आहे. गिरगाव येथे महानगरपालिकेतर्फे स्मृतिस्तंभाच्या पायाचे काम करण्यात आले.

राजर्षी शाहू विचार जागर यात्रेची सांगता

कोल्हापुरातून 3 मे रोजी राजर्षी शाहू विचार जागर यात्रेला सुरुवात झाली, या यात्रेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचे फलक लावण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी 5 वाजता ही जागर यात्रा मुंबईतील गिरगाव येथे आली. या ठिकाणी या यात्रेची सांगता झाली. गेले तीन दिवस प्रमुख शहरांतून ही यात्रा आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news