‘वंदे भारत’मुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना : पंतप्रधान नरेेंद्र मोदी

‘वंदे भारत’मुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना : पंतप्रधान नरेेंद्र मोदी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : 'वंदे भारत' रेल्वे गाड्या, मुंबई आणि पुण्यासारख्या देशाच्या आर्थिक केंद्रांना आपल्या श्रद्धास्थानांशी जोडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. केंद्र आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्यामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत आहे. नजीकच्या काळात डबल इंजिनमुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या वेळच्या केंद्रीय अर्थसंकल्पात इतिहासात पहिल्यांदाच पायाभूत सुविधांसाठी दहा लाख कोटींची तरतूद करण्यात आली असून त्याचा लाभ महाराष्ट्राला देखील होणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन वंदे भारत या एक्स्प्रेस गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करण्यात आला. तसेच मुंबईतील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगदा अशा
दोन प्रकल्पांचेही त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते.

रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन राष्ट्राला समर्पित करतांना अत्यंत आनंद होत आहे, असे उद्गारही त्यांनी काढले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

मोदी म्हणाले, आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी, विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक दळणवळण व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज पहिल्यांदाच एकाच वेळी दोन वंदे भारत गाड्या सुरू झाल्या आहेत. या वंदे भारत गाड्या, मुंबई आणि पुण्यासारख्या देशाच्या आर्थिक केंद्रांना आपल्या श्रद्धास्थानांशी जोडणार आहे. या गाड्या महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रेला मोठी चालना देतील. या गाड्यांमुळे शिर्डीत साईबाबांचे दर्शन, नाशिकचे रामकुंड, त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीला जाण्यासाठी नवी वंदे भारत गाडी अत्यंत सोयीची ठरणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ किंवा आई तुळजाभवानीचे दर्शन खूप सुलभ होणार आहे. ही वंदे भारत ट्रेन आजच्या आधुनिक होत असलेल्या भारताची अतिशय रुबाबदार प्रतिमा आहे. ही भारताची गती आणि व्याप्ती या दोन्हीचे प्रतिबिंब आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मुंबईतील जनतेचे जीवन अधिक सुलभ करणारे प्रकल्प देखील येथे सुरू झाले आहेत हे पाहून मला आनंद होत आहे. आज ज्या उन्नत मार्गिकेचे उद्घाटन होत आहे तो मुंबईच्या पूर्व-पश्चिम भाग जोडणीची गरज पूर्ण करेल. मुंबईतील लोक बर्‍याच काळापासून या सुविधेच्या प्रतीक्षेत होते. दररोज दोन लाखांहून अधिक गाड्या या मार्गिकेचा वापर करून प्रवास करू शकणार आहेत. यामुळे लोकांच्या वेळेची देखील बचत होणार आहे. आता या मार्गिकेमुळे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील उपनगरी भाग एकमेकांना अधिक उत्तम प्रकारे जोडले जाणार आहेत. कुरार येथील अंडरपास देखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांच्या विकासावर भर

21 व्या शतकातील भारतासाठी नागरिकांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात सुलभ करणार्‍या सार्वजनिक वाहतूक सेवेतील सुधारणांच्या गरजेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. आधुनिक गाड्या, मेट्रोचा विस्तार तसेच नवीन विमानतळ आणि बंदरे सुरू करण्यामागे हीच विचारसरणी आहे, असे त्यांनी सांगितले. या विचारसरणीला अर्थसंकल्पाने बळ दिले आहे. कारण पहिल्यांदाच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 10 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रेल्वेचा वाटा 2.5 लाख कोटी आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रासाठी रेल्वे अर्थसंकल्पातही अभूतपूर्व वाढ केली आहे आणि दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील संपर्क यंत्रणा वेगाने पुढे जाईल अशी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

सरकार प्रत्येक कुटुंबाला बळ देईल

या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला बळकटी मिळाली आहे, पगारदार आणि व्यावसायिक या दोघांच्याही गरजा या वर्षीच्या अर्थसंकल्पात मांडल्या आहेत. 2014 पूर्वी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांवर कर आकारला जात होता, परंतु सध्याच्या सरकारनेच या वर्षीच्या अर्थसंकल्पात कर आकारणीसाठी सुरुवातीला 5 लाख रुपये आणि आता 7 लाख रुपये अशी उत्पन्न मर्यादा केली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये ज्यांनी 20 टक्के कर भरला ते आज शून्य कर भरतात, असे सांगत केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला बळ देईल आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव निधी : मुख्यमंत्री शिंदे

आमचे युती सरकार सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आले असून, केंद्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा आम्हाला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 13 हजार 500 कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखो प्रवाशांना फायदा मिळेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे जाहीर झाले आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ही देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. पंतप्रधानांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते, त्यानंतर मुंबईत मेट्रोची त्यांनी सुरुवात केली आणि आता वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. अशाच रीतीने एमटीएचएल, मेट्रोचे इतर मार्ग, मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित केले जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सिंचन, रस्ते प्रकल्प, गृहनिर्माण, कृषी, स्टार्टअप अशा सर्व क्षेत्रांत राज्याला या केंद्रीय अर्थसंकल्पातून खूप काही मिळाले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा जो निर्धार पंतप्रधानांनी केला आहे, त्यात महाराष्ट्रही आपले एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी कठोर प्रयत्न करेल.

केंद्रीय अर्थसंकल्पातून राज्यासाठी रेल्वेसाठी 13 कोटींची तरतूद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना या वेळच्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 13 हजार कोटींची तरतूद केल्याबद्दल आभार मानले. राज्यातील 124 रेल्वे स्थानकांचा या माध्यमातून विकास केला जाणार असून छत्रपती शिवाजी टर्मिनसचही रूप पालटणार आहे. वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून राज्यातील भाविकांना मोठी सुविधा मिळाली आहे. वंदे भारत ट्रेन हे एक आश्चर्यच आहे. कोणी कल्पनाही केली नसेल की, भारतात अशा प्रकारच्या रेल्वे गाड्या बनवल्या जाऊ शकतात आणि चालवले जाऊ शकतात. रेल्वेच्या सुरुवातीला नाना शंकरशेठ यांनी मुंबईतील रेल्वे गाडी सुरू करण्यासाठी भूमिका बजावली होती. त्यांचे हे योगदान कोणाला विसरता येणार नाही. त्याप्रमाणे भारताच्या इतिहासामध्ये रेल्वेच्या आधुनिकीकरण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव इतिहासात कोरले जाईल, असे उद्गार फडणवीस यांनी काढले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news